उद्योग हीच साधना !
‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित लेखमाला !
‘उद्योजकांचे स्वतःचे जीवन समृद्ध होईल, त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होईल, तसेच देशाच्या सर्वांगीण विकासालाही हातभार लागेल. याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. या अनुभवाची माहिती इतर उद्योजकांना मिळावी. याच अनुभवावर आधारित लेखमाला लिहावी’, असा विचार आला आणि त्यानुसार मी ही लेखमाला चालू केली. याविषयीची काही सूत्रे २८ सप्टेंबर या दिवशीच्या लेखात वाचली.
‘भारतीय संस्कृती ही ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ (संपूर्ण पृथ्वी कुटुंब आहे.), या उदात्त सूत्रावर आधारित आहे. ‘अहिंसा, सहिष्णुता आणि प्रत्येकाने स्वतःच्या कर्माला धरून साधना करावी’, असा हा हिंदु धर्म आपल्याला ऋषिमुनींपासून लाभला आहे, तरीही आपल्यावर वारंवार परकीय आक्रमणे झाली, पारतंत्र्यात गेलो आणि आपल्या वैभवाचा र्हास होत राहिला. हे जाणून घेतांना मन विषण्ण होते.
(भाग २)
लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि., ठाणे.
भाग १ : वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/961545.html

१. सुनीता भोसेकर यांचे ‘पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान भाग १ आणि २’ हे पुस्तक वाचतांना अस्वस्थता निर्माण होणे
मध्यंतरी मी वाचन करत असांना २ ग्रंथ सापडले. पहिला म्हणजे ‘पेरिप्लस ऑफ हिंदुस्थान भाग १ आणि २’ – सुनीता भोसेकर यांचे २ खंड असलेले हे पुस्तक. यात इसवी सन पूर्व १००० पासून ते १९४७ पर्यंत भारतात येणारे प्रवासी, राजदूत, युरोपातील मसाल्याच्या शोधात आलेले व्यापारी, चीन–इराण–रशियातून आलेले प्रवासी यांनी दिलेली भारताची वर्णने आहेत.

आपल्या स्वतःच्या लेखबद्ध नोंदी न्यून असल्या, तरी त्यांनी लिहिलेला इतिहास आपल्याकडे आहे. काही ताम्रपटांवर राजांनी घटना कोरल्या आहेत; पण सलग इतिहास नाही. त्या वर्णनातून भारताचे वैभव, ज्ञान, राजसत्ता, उद्योग-व्यवसाय, सामाजिक व्यवस्था, चालीरिती आणि संस्कृती यांचे अप्रतिम दर्शन घडते. आपल्या देशावर राज्य करणारे अत्यंत उज्ज्वल भारतीय राज्यकर्ते, तर मोगल आणि अखेरीस इंग्रज असे परकीय राज्यकर्ते अन् त्यांच्या सत्ताकाळाचेही सुंदर चित्रण या ग्रंथातून दिसते. ते वाचतांना अस्वस्थता निर्माण होते; कारण एवढे वैभव असूनही त्याचा र्हास झाला, एवढा समृद्ध देश पुन्हा पुन्हा परकीय आक्रमणांनी उद्ध्वस्त होत राहिला आणि हिंदुस्थानची सत्ता लयाला गेली.
२. भारतात लढाऊ वृत्ती नसल्यामुळे अराजक परिस्थिती निर्माण होणे
दुसरे पुस्तक वाचनात आले आणि ते म्हणजे रेश्मा कुलकर्णी – पाठारे यांनी अनुवादित केलेले, ‘अराजक’ (मूळ इंग्रजी पुस्तक The Anarchy, लेखक : विल्यम डॅलरिंपल). यात ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या कारभाराचे वास्तव उलगडले आहे. व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या या आस्थापनाच्या वेतनावर १ लाख सैनिक होते. त्यातील केवळ २ ते ५ सहस्रच ब्रिटीश होते, बाकी सारे भारतीय. या सैनिकांच्या बळावर त्यांनी मोगलांनाही पदच्युत केले आणि सत्ता हस्तगत केली. हळूहळू इंग्लंडच्या राणीने ही सत्ता हाती घेतली. जिथे सोन्याचा धूर निघत होता, अशा राष्ट्राला एक व्यापारी कंपनी गुलाम बनवते, तेथील उद्योगधंदे कोलमडतात, हे वाचतांना मन हेलावते. भारतात लढाऊ वृत्ती नसल्यामुळे अशी ही अराजक परिस्थिती निर्माण झाली होती.
३. अर्थव्यवस्थेत उच्च क्रमांक गाठण्यासाठी हिंदु संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा आधार आवश्यक !
आपण नुकताच ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला; पण स्वदेशीच्या तत्त्वाला दीर्घकाळ गांभीर्याने घेतले गेले नाही. स्वातंत्र्यानंतर आलेल्या शासनकर्त्यांनीही स्वदेशीवर ठोस पावले उचलली नाहीत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा मंत्र दिला आणि गेल्या २ दशकांत अर्थव्यवस्था, व्यापार, विचार अन् जीवनपद्धत यांत सकारात्मक पालट घडवून आणले. स्वातंत्र्यानंतर भारत जागतिक अर्थव्यवस्थेत १९ व्या क्रमांकावर होता; आज आपण ४ थ्या क्रमांकावर पोचलो आहोत आणि पुढील लक्ष्य तिसरा अन् दुसरा क्रमांक गाठणे आहे. हे स्वप्न साध्य करायचे असेल, तर हिंदु संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचा आधार घेणे आवश्यक आहे.

४. संपूर्ण जगाला सुसंस्कृत (आर्य) करण्याचे आणि जगावर राज्य करण्याची क्षमता हिंदुस्थानातच !
मी स्वतः गेली २० वर्षे ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. या अभ्यासातूनच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ‘भारताचे सामर्थ्य गुरुकुल शिक्षणपद्धत, न्यायदान, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र आणि विज्ञानशास्त्र यांत सामर्थ्य दडले आहे.’ जर परकीय आक्रमण झाले नसते, तर ‘कृण्वन्तो विश्वमार्यम् ।’, संपूर्ण जगाला सुसंस्कृत (आर्य) करण्याचे आणि जगावर राज्य करण्याची क्षमता हिंदुस्थानात होती. ‘गांधार, चीन, दक्षिण-पूर्व आशिया या सर्व भागांत हिंदु राजांचे राज्य होते. हिंदु राज्य आणि संस्कृती यांचे पुरावे विविध मंदिरे, वास्तू, राजवाडे यांच्या माध्यमांतून सगळीकडे आढळतात; पण त्याचे लिखित स्वरूपात जतन न झाल्याने, तसेच परकीय आक्रमणांमुळे लिखित स्वरूपातील कागदपत्रे नष्ट झाल्यामुळे आपण मागे पडलो’, याची खंत वाटते.
भारताला पुन्हा महाशक्ती होण्यासाठी आध्यात्मिक साधना आणि संस्कार यांची आवश्यकता !

आज मात्र भारताला संधी आहे. केंद्रशासित व्यवस्था, राज्य आणि केंद्र सरकार यांचे एकत्रित नेतृत्व अन् १४० कोटी लोकसंख्या या पार्श्वभूमीवर भारत पुन्हा महाशक्ती होऊ शकतो; पण यासाठी केवळ समृद्धी पुरेशी नाही, तर आध्यात्मिक साधना, तसेच संस्कार यांची जोडही आवश्यक आहे. अन्यथा युरोपातील अनेक राष्ट्रांप्रमाणे केवळ भौतिक सुखाकडे धाव घेतली, तर समृद्धीपासून व्यसनाधीनतेकडे वाटचाल होण्याचा धोका आहे, हे विसरूनही चालणार नाही. शेवटी ‘षड्रिपूंचे घोडे स्वैरपणे धावू लागले की, ते रथाच्या सारथीला पाताळात नेतील’, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.
– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई
५. श्रीकृष्णासारखे समर्थ नेतृत्व न मिळाल्याने भारताला परकीय आक्रमणांचा फटका बसणे !
हिंदु संस्कृतीची खरी शक्ती, म्हणजे श्रद्धा आणि तपश्चर्या, तर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हे कुटुंब आहे.) हे हिंदूंचे आद्यतत्त्व आजही तितकेच महत्त्वाचे आहे; पण संघटित न राहिल्यामुळे आपण वारंवार गुलाम झालो. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते, ‘आपले कर्म कर.’ त्यांनी अर्जुनाला युद्धासाठी प्रवृत्त केले; पण पुढील काळात भगवान श्रीकृष्णासारखे समर्थ नेतृत्व आपल्याला मिळाले नाही. त्यामुळे परकीय आक्रमणांचा फटका बसत गेला.
६. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेली साधना अंगीकारल्यास भारत महाशक्तीशाली राष्ट्र बनू शकतो !

सुख आणि आनंद यांतील भेद समजून घेणे पुष्कळ आवश्यक आहे. ‘सनातन संस्थे’ने सांगितलेल्या साधनेतूनच मला यांतील भेद समजला. ‘इंद्रियाद्वारे मिळणारे सुख’, हे क्षणभंगूर, तर ‘आत्म्याला मिळणारा आनंद शाश्वत’ आहे’, हे ज्ञान मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे विविध प्रकारे होणारे मार्गदर्शन, सत्संग आणि गुरुकृपायोगानुसार साधना यांतून झाले. जर साधनेचा हा मार्ग सर्वांसमोर पोचवता आला, तर भारताला पहिले महाशक्तीशाली राष्ट्र बनण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. भारत तरुणांचा देश आहे. तरुणांना जर ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि आध्यात्मिक साधनेची निकड कळली, तरच ते तसे करू शकतील अन्यथा त्यांचा र्हास होईल.
७. ‘हिंदु राष्ट्र’ जगातील क्रमांक १ चे राष्ट्र होण्यासाठी…
यामध्ये तरुण उद्योजकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. ‘उद्योग हीच साधना’, असे मी मानतो. उद्योग म्हणजे समष्टीसाठी साधना, तर नोकरी ही व्यष्टी साधना आहे. जितके अधिक उद्योजक निर्माण होतील, स्वदेशीचा मार्ग स्वीकारतील, तितकी अर्थशक्ती बळकट होईल. लोकशक्ती, सैन्यशक्ती आणि अर्थशक्ती या तिन्ही शक्ती जेव्हा आध्यात्मिक संस्कारांनी एकत्र येतील, तेव्हा भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ जगातील क्रमांक १ चे राष्ट्र होईल.
८. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ हे हिंदु राष्ट्र निर्मितीचे एक मोठे सकारात्मक पाऊल !

याच दृष्टीकोनातून गोवा येथे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ उभारले जाणार आहे. १४ विद्या आणि ६४ कला यांचे प्रतिनिधित्व करणारे हे संशोधन केंद्र असणार आहे. ‘हे हिंदु राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीने एक मोठे सकारात्मक पाऊल आहे’, असे मला वाटते. या विद्यापिठात आध्यात्मिक साधना, व्यवस्थापन, नेतृत्व, अभ्यासक्रम, विज्ञान आणि अध्यात्म यांचे एकत्रित संशोधन कसे होईल’, यावर कार्य होणार आहे. उद्योग, समाज आणि अध्यात्म यांची सांगड घालून येथे नवे नेतृत्व घडेल. या विश्वविद्यालयात सनातन संस्थेने दिलेला आध्यात्मिक मार्गच प्रेरणास्थानी असेल.
९. आध्यात्मिक साधना आणि ईश्वराचा आशीर्वाद यांच्या आधारे भारत महाशक्ती बनू शकतो !
आज भारताकडे महाशक्ती होण्याची शक्ती आहे; पण ती केवळ उद्योग, लोकशक्ती किंवा सैन्यशक्ती यांवर अवलंबून नाही. तिचा खरा आधार आहे, ‘आध्यात्मिक साधना आणि ईश्वरी शक्तींचा आशीर्वाद’; कारण कोणतेही कार्य करतांना ईश्वरी शक्तींचे पाठबळ अत्यंत महत्त्वाचे आहे.
या सर्वांचे एकत्रीकरण झाले, तरच आपण जगाचे नेतृत्व करू शकतो आणि भारत पुन्हा एकदा जगाचा अधिपती बनू शकतो. ‘यातील अर्थशक्तीच्या परिवर्तनाचा आरंभ उद्योजकांनीच करावा’, ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. ‘गोवर्धन पर्वताप्रमाणे भारताला महाशक्ती बनवण्यासाठी अर्थशक्तीची काठी उद्योजकांनी लावून धरली पाहिजे’, असे मला वाटते. यासाठी उद्योजकांनी स्वत:च्या कार्याला आध्यात्मिक साधनेची जोड दिली, तर वैयक्तिक प्रगतीसह राष्ट्रालाही बळकटी देता येईल अन् या संधीचे सोने त्यांनी नक्कीच करायला हवे.
म्हणूनच ‘उद्योग हीच साधना !’, या विचाराने प्रेरित होऊन उद्योजकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ‘उद्योजक साधनेच्या नियमांच्या बळावर प्रगतीची नवी क्षितिजे कशी गाठू शकतात आणि राष्ट्राला अधिक सक्षम कसे करू शकतात’, हे लेखमालेच्या पुढील भागात आपण जाणून घेऊ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– डॉ. रवींद्र प्रभुदेसाई, व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि., ठाणे.
भाग ३ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/966211.html
वाचकांना सूचनाया लेखाविषयी वाचकांनी अभिप्राय कळवण्यासाठी [email protected] या ई-मेलवर किंवा दू.क्र. (०२२) ६७०३५५५५ यावर संपर्क साधावा. |

‘सर्वधर्मसमभाव’ असे म्हणणार्यांचे फोलपण !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!