देवाच्या प्राप्तीसाठी एका क्षणात मायेचा त्याग करणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. पहिल्याच सत्संगात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची भावजागृती होणे अन् सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन होणे

‘वर्ष २००० मध्ये सौ. अंजली गाडगीळ (आताच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) आणि डॉ. मुकुल गाडगीळ (आताचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ ) बोईसर येथे रहात होते. त्यांच्या घरी श्री. रविकांत शहाणे यांनी सत्संग घेतला. त्या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या शेजार्‍यांनाही सत्संगाला येण्याचा निरोप दिला होता; मात्र कुणीही सत्संगाला आले नाही. केवळ श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. गाडगीळ दोघेच सत्संगाला होते. ‘तेव्हा हा सत्संग या दोघांसाठीच होता कि काय ?’, असे नंतर वाटले. सत्संग चालू असतांना सद्गुरु गाडगीळ यांची भावजागृती होऊन त्यांच्या डोळ्यांत भावाश्रू आले. त्यांना शहाणेकाकांच्या मागे सूक्ष्मातून काळा कोट घातलेली एक व्यक्ती दिसली. ‘ती व्यक्ती कोण आहे ?’, याविषयी सद्गुरु गाडगीळकाकांना ठाऊक नव्हते. त्यांनी त्या व्यक्तीला यापूर्वी कधी पाहिले नव्हते. नंतर शहाणेकाकांनी त्यांना तेव्हाचा ‘नामसंकीर्तनयोग’ (आताचे पालटलेले नाव ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’) हा ग्रंथ दाखवला. तेव्हा सद्गुरु गाडगीळ यांनी ग्रंथाच्या प्रारंभीच्या पानावर एक चित्र पाहिले आणि ते शहाणेकाकांना म्हणाले, ‘‘मी याच व्यक्तीला तुमच्या मागे उभे असलेले पाहिले.’’ तेव्हा शहाणेकाका म्हणाले, ‘‘अहो, हे तर प.पू. डॉक्टरांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) गुरु प.पू. भक्तराज महाराज आहेत.’’ हे ऐकून श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु गाडगीळ यांचा भाव दाटून आला.

२. सत्संग झालेल्या दिवशीच मध्यरात्री सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना एकाच वेळी अकस्मात् जाग येणे आणि त्यांना यापूर्वी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाले नसतांनाही दोघांचा पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय होणे

सत्संगानंतर सर्व आवरून झाल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु गाडगीळकाका दोघेही एका वेगळ्याच स्थितीत होते. मध्यरात्री दोघांनाही एकाच वेळी अकस्मात् जाग आली अन् दोघेही देवघराकडे गेले. कुणीतरी दैवी शक्तीने त्यांना उठवले होते. दोघांनी हात जोडून देवाला नमस्कार केला आणि एकमेकांकडे पाहिले अन् अंतरात्म्याने दिलेला निर्णय दोघांनी शब्दरूपात एकमेकांसमोर मांडला, ‘‘आता आपण नोकरी, घर, तसेच सर्वस्वाचा त्याग करून पूर्णवेळ साधना करूया.’’ दोघांचे विचारही एकरूप झाले होते. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ नेहमी म्हणतात, ‘‘माया, मोह, पैसा हे सर्व सोडलेच पाहिजे आणि सर्वकाही देवावर सोडले पाहिजे. आपण देवासाठी सर्व सोडल्यावर देवही आपल्यासाठी काय काय करतो !’, हे अनुभवण्यासारखे आहे. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु गाडगीळकाका यांना त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी थोडेफार ठाऊक होते; मात्र या दोघांनी त्यांना पाहिलेही नव्हते.

३. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ईश्वरी तत्त्वावर संपूर्ण श्रद्धा ठेवून पूर्णवेळ साधना करण्याचा ‘काळानुरूप’ घेतलेला निर्णय ! 

त्या वेळी त्यांच्या मनाला ‘आपले काय होईल ? काही चुकणार तर नाही ना ?’, अशा कोणत्याच तत्सम विचारांनी स्पर्शही केला नाही. केवळ त्या ईश्वरी तत्त्वावर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी एक क्षणाचाही विलंब न करता पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला. यालाच ‘काळानुरूप निर्णय घेणे’ म्हणतात. सर्व साधकांसाठी हे पुष्कळ शिकण्यासारखे आहे. आपण एका विचारामध्ये अनेक दिवस, मास घालवतो आणि आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ व्यर्थ घालवतो. त्याऐवजी भगवंतावर संपूर्ण श्रद्धा ठेवून जर तत्परतेने कृती केली, तर देव नक्कीच आपली काळजी घेणार नाही का ?

४. वरिष्ठांनी दाखवलेल्या प्रलोभनांना बळी न पडता सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी नोकरीचे त्यागपत्र देण्याचा निर्णय घेणे आणि वरिष्ठ अधिकार्‍यांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना साष्टांग नमस्कार घालणे 

सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी त्यांच्या वरिष्ठांना नोकरी सोडण्याविषयी सांगितले. तेव्हा त्यांचे वरिष्ठ अधिकारी ‘एवढ्या चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तीचे त्यागपत्र कसे स्वीकारायचे ?’, या विचाराने सद्गुरु डॉ. गाडगीळ यांना सोडत नव्हते. वरिष्ठ अधिकारी सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांना म्हणाले, ‘‘तुम्ही १५ दिवसच कामाला या. हवे तर ८ दिवसच या. इतर वेळी तुम्ही सेवा करा, तरीही आम्ही तुम्हाला पूर्ण वेतन देऊ.’’ नंतर ते म्हणाले, ‘‘काहीच नको. तुम्ही केवळ सही करण्यापुरते या. आम्हाला आपले मार्गदर्शन किंवा काही साहाय्य यांची आवश्यकता असल्यास तुम्ही या.’’ योगमायेने वेगवेगळ्या रूपात त्यांना भूल घालण्याचा प्रयत्न केला; मात्र सद्गुरु डॉ. गाडगीळ यांचा निर्णय पक्का होता. सद्गुरु डॉ. गाडगीळ त्यांच्या वरिष्ठांना म्हणाले, ‘‘मला कुठलाच मायेचा धागा नको आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकून वरिष्ठ अधिकारीही आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, ‘‘माझ्या नोकरीच्या कालावधीत मी तुमच्यासारखी प्रामाणिक आणि चांगली व्यक्ती पाहिली नाही. मी माझ्या आयुष्यात कधीच कुणाला नमस्कार केला नाही; पण आज मी तुम्हाला नमस्कार करतो’’, असे म्हणून त्यांनी सद्गुरु गाडगीळ यांना साष्टांग नमस्कार केला.

५. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी देवाच्या प्राप्तीसाठी केलेला त्याग अन् त्यांनी प्राप्त केलेली उच्च आध्यात्मिक स्थिती 

सद्गुरु डॉ. गाडगीळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या या उदाहरणांतून दिसून येते की, ‘आपण देवासाठी केलेला त्याग कधीच वाया जात नाही. आज त्या दोघांनीही अध्यात्मातील उच्च स्थिती प्राप्त केली आहे. त्यांची कन्या सौ. सायली करंदीकर (पूर्वाश्रमीची कु. सायली गाडगीळ) हिचा साधकाशीच विवाह झाला आहे आणि तीही आनंदात आहे. तीही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात अन्नपूर्णा कक्षात चांगल्या प्रकारे सेवा करत आहे. देवाने आणखी काय द्यायला हवे !

६. आपण विलंब न करता आणि आपल्या मन अन् बुद्धी यांचा अडथळा येऊ न देता संपूर्ण श्रद्धेने देवासाठी तत्परतेने कृती करायला हवी, तरच देवाची कृपा आपल्याला संपादन करता येईल आणि आपल्या आयुष्याचे सोने होईल !’

– एक साधक, पुणे (१४.४.२०१६)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक
  • सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.