
मुंबईची ‘जीवनरेखा’ म्हणून ओळखल्या जाणार्या लोकलगाडीमध्ये गेल्याच महिन्यात एका २२ वर्षीय युवकाची ‘जीवनरेखा’ कायमची तुटली. धावत्या गाडीमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून एक नराधमाने मयंक लोहार नावाच्या तरुणाची पोटात चाकू खुपसून निर्घृण हत्या केली. ही घटना घडत असतांना रेल्वेत अनेक प्रवासी उपस्थित होते. त्यांपैकी काहींनी या घटनेची छायाचित्रे काढली, तर काहींनी व्हिडिओ बनवले. हे करणार्यांनी त्यांचे भ्रमणभाष खिशात ठेवून संघटितपणे मारेकर्याला वेळीच पकडले असते, तर कदाचित् मयंक वाचलाही असता. मयंकचा खून करून आरोपी बिनधास्त उतरून चालत स्थानकाच्या बाहेर पडला. त्याला शोधण्यासाठी समस्त रेल्वे आणि शहर पोलीस यंत्रणा कामाला लागली. तो जात असतांना पाठीमागून त्याच्यावर झडप घालण्याचेही कुणाचे धैर्य झाले नाही. त्यानंतर दादर रेल्वेस्थानकावर रुळानजीक एक इसम एका महिलेला निर्दयपणे मारहाण करतांनाचा व्हिडिओही नंतर आला; मात्र कुणीही तिच्या साहाय्याला धावले नाही. या घटनेत त्याच्या हातात शस्त्रही नव्हते. या दोन्ही घटनांतून मुंबईकरांची भावनाशून्यता आणि संवेदनहीनता प्रकर्षाने दिसून आली. आपल्या डोळ्यांसमोर कुणाचा जीव जात असतांना वा एक अबला असाहाय्यतेने विव्हळत असतांना साहाय्याला धावून जाण्याविषयी कुणालाच का वाटले नाही ? भावना इतक्या बोथट का झाल्या आहेत ?
या वेळी वर्ष २०२३ मधील देहलीतील २ घटनांची प्रकर्षाने आठवण झाली. पियुष पाल हा मोटारसायकलचा अपघात होऊन घायाळ झाला. तो लोकांकडे साहाय्यासाठी याचना करू लागला; मात्र कुणीच त्याला साहाय्य केले नाही, उलट चोरट्यांनी त्याचा भ्रमणसंगणक आणि भ्रमणभाष चोरला. त्या वेळी पियुषच्या घरच्यांनी संपर्क केला; पण चोरांनी तो संपर्क न घेता भ्रमणभाष बंद करून ते पळाले. पियुषला रुग्णालयात नेईपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. या घटनेच्या काही दिवस आधी शहाबाद डेअरी परिसरात साक्षी नावाच्या एका १६ वर्षीय मुलीची साहिलने चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. रहदारी असूनही कुणीच साक्षीच्या साहाय्याला गेले नाही. समाज उदासीन होण्यासह त्याचे शौर्यही लोप पावले आहे. ‘पोलिसांची झंझट नको’, असेही समाजाला वाटते. त्यामुळे त्या वेळी आजूबाजूने अनेक जण गेले असतील; पण त्यांच्या या विचारांच्या रणकंदनावर त्यांच्यातील विवेकावर मात करताच आली नाही. शालेय जीवनात आपण ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’, अशी प्रतिज्ञा घेतो; मात्र संकटप्रसंगी स्वार्थीपणे वागतो. अशा प्रसंगी धैर्य अंगी येण्यासाठी आत्मबल वाढवणे आवश्यक आहे. इतरांना साहाय्य करण्याची वेळ येते, तेव्हाच आपल्यातील माणुसकीची खरी कसोटी लागते !
– श्री. जगन घाणेकर, घाटकोपर, मुंबई.

स्वतःचे कुटुंब टिकेल ?
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
गुरूंचे माहात्म्य अन् शिष्याची गुरुभक्ती
शिष्याला ईश्वरप्राप्तीकडे गतीमान करणारी गुरुकृपा !
‘काशीविश्वनाथ सुसज्ज महामार्गा’च्या विकासाआड येणारी याचिका उत्तरप्रदेश उच्च न्यायालयाकडून असंमत !