गुरुकुल शिक्षणपद्धत, सध्याचे व्यवसायाभिमुख शिक्षण आणि कर्मसिद्धांत

उद्योग हीच साधना !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या अनुभवावर आधारित लेखमाला !

‘उद्योग हीच साधना’ या लेखमालिकेच्या मागील दोन भागांत आपण उद्योजकांसाठी आध्यात्मिक साधना, तसेच हिंदु राष्ट्राच्या शंखनाद महोत्सवाच्या अनुभूतींविषयी थोडे चिंतन केले. लेखाच्या या भागात ‘गुरुकुल शिक्षणपद्धत, सध्याचे व्यवसायाभिमुख शिक्षण आणि कर्मसिद्धांत’ यांविषयी आपण जाणून घेऊया.

(भाग ३)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि., ठाणे.

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/963852.html

डॉ. रवींद्र प्रभुदेसाई

१. प्रथम सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘उद्योग ही साधना’, असा दृष्टीकोन देणे 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची सूक्ष्मातून मिळणारी प्रेरणा सतत आम्हाला लाभत असते. आतापर्यंत कोणत्याही आध्यात्मिक गुरूंनी किंवा संतांनी ‘उद्योग ही साधना आहे’, असा दृष्टीकोन दिला नव्हता, जो प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनातून आम्हाला प्राप्त झाला. त्यांनी दिलेल्या दैवी ज्ञानातून आम्हाला उद्योगातील निष्ठा, कर्मयोग आणि साधना यांचा खरा अर्थ समजला.

२. धर्मशास्त्रातील गृहस्थाश्रम आणि ब्रह्मचर्याश्रम यांचे महत्त्व

२ आ. गृहस्थाश्रम समाजरचनेचा मूलभूत पाया : आपल्या धर्मशास्त्रामध्ये ‘ब्रह्मचर्याश्रम’, ‘गृहस्थाश्रम’, ‘वानप्रस्थाश्रम’ आणि ‘संन्यासाश्रम’, या ४ व्यवस्था सांगितल्या आहेत. यांपैकी ‘गृहस्थाश्रम’ हा सर्वांत महत्त्वाचा मानला जातो; कारण तो आयुष्याचा सर्वांत मोठा कालावधी व्यापतो आणि समाजरचनेचा मूलभूत पाया ठरतो. लग्न, संसार आणि त्यातून पुढील पिढ्यांचा जन्म हे सर्व गृहस्थाश्रमातूनच घडते, तसेच ब्रह्मचर्याश्रम आणि वानप्रस्थाश्रम यांतील लोकांचे पालनपोषण, समाजातील व्यवहार, दानधर्म अन् अर्थव्यवहार ही दायित्वेसुद्धा गृहस्थाश्रमीच पार पाडतात; म्हणूनच ‘गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्त्व आहे’, असे आपल्या शास्त्रांमध्ये तसेच सनातन संस्थेच्या ‘अध्यात्म’ आणि ‘आध्यात्मिक शास्त्राचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.

२ आ. शिक्षणासाठी गुरुकुलपद्धत प्रचलित असणे : ‘ब्रह्मचर्याश्रम’ हा मुख्यतः शिक्षणासाठी ओळखले जात असे. पूर्वीच्या काळात शिक्षणासाठी गुरुकुलपद्धत प्रचलित होती. त्या काळात विद्यार्थी केवळ विषयज्ञानच नव्हे, तर सर्वांगीण शिक्षण घेत असत. चारित्र्य, शिस्त, संस्कार आणि आत्मज्ञान या सर्वांचा संगम त्या शिक्षणपद्धतीत होत असे. गुरु विद्यार्थ्यांच्या गुणकौशल्याच्या आधारावर त्यांना योग्य मार्गदर्शन करत असत.

उद्योगपतींना साधना सांगतानाचे प्रातिनिधिक छायाचित्र

३. औद्योगिक क्रांतीनंतर शिक्षण आणि व्यवसाय या दोन्हींमध्ये मोठे परिवर्तन होणे 

३ अ. समाजात व्यक्तीस्वातंत्र्याचे भयावह रूप दिसू लागणे : कलियुगात औद्योगिक क्रांतीनंतर शिक्षण आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. त्यानंतर समाजव्यवस्थेतही लक्षणीय पालट दिसून आले आहेत. पूर्वीची राजेशाही संपून लोकशाही पद्धत आली आणि ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला; मात्र त्याचे अवडंबर आणि अतिरेक इतका वाढला की, ज्या वयात मुलांमध्ये योग्य-अयोग्य याचा विचार करण्याची प्रगल्भता नसते, त्या वयातच ते अतीस्वातंत्र्याच्या नावाखाली चुकीच्या मार्गाकडे वळू लागले.

परिणामी आज अनेक ठिकाणी व्यसनाधीनता, जुगार आणि नैतिक अधःपतन या समस्या वाढतांना दिसत आहेत. विशेषत: अमेरिकेसारख्या देशांत व्यक्तीस्वातंत्र्याचे भयावह रूप दिसून येते. सुदैवाने भारतात ही प्रवृत्ती पूर्णपणे आलेली नाही; परंतु तिची चाहूल स्पष्टपणे जाणवते.

३ आ. पूर्वीची गुरुकुल आणि सध्याची व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धत

३ आ १. पूर्वीची गुरुकुलपद्धत : आता आपल्या शिक्षणपद्धतीकडे पाहिले, तर ती व्यवसायाभिमुख बनली आहे. आज सर्वकाही केवळ ‘पैशासाठी’ शिकवले जाते. ज्यातून पैसा मिळतो, तेच शिक्षण ‘योग्य’ आणि ज्यातून तात्काळ लाभ होत नाही, ते शिक्षण ‘निरुपयोगी’ अशी विकृत धारणा सिद्ध झाली आहे. पूर्वी गुरुकुलपद्धतीत असे नव्हते. तिथे प्रथम ‘मनुष्याचा सर्वोच्च विकास, म्हणजे त्यांच्या सद्गुणांचा विकास व्हावा’, या उद्दिष्टाने शिक्षण दिले जायचे आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांवर संस्कार केले जायचे. त्यानंतर राजकारण, राजनैतिक शिष्टाचार, समाजकारण आणि त्यांची वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून विद्यार्थ्यांची बुद्धी अन् व्यावसायिक कलागुण विकसित केले जात असत. तेव्हाच खर्‍या अर्थाने व्यावसायिकता घडत होती.

३ आ २. व्यवसायाभिमुख शिक्षणपद्धत : 

१. इंग्रजी भाषेच्या अट्टहासामुळे मुले पाश्चात्त्य विकृतीकडे वळणे : आज मात्र भाषेचे शिक्षण देतांनाही मर्यादा आणि मार्मिकता हरवतांना दिसते. मराठी, इंग्रजी, संस्कृत कोणतीही भाषा असो, तिचे मर्म समजून घेण्याची संस्कारयुक्त दृष्टी न्यून होत चालली आहे आणि त्यातही केवळ इंग्रजी शिकायचे, हा अट्टहास दिसून येतो. परिणामी मुले थेट पाश्चात्त्य विकृतीकडे वळू लागली आहेत. जिथे संस्कारांपेक्षा दिखाऊपणा, पैशाचे प्रदर्शन आणि भौतिक यश यांनाच अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येते. मुलांना पाश्चात्त्य गोष्टी शिकण्यावर अधिक भर दिल्यामुळे त्यांची भारतीय संस्कृतीशी नाळ हळूहळू तुटत चालली आहे. आजचे शिक्षण अधिकतर व्यवसायाभिमुख झाले असून विद्यार्थ्यांना केवळ पैसे कमवण्याचे मार्ग दाखवले जातात. त्यातून संस्कार, मूल्ये आणि मनुष्यत्वाचा विकास दुर्लक्षित राहतो.

२. संस्कृत भाषेच्या महत्त्वामुळे भाषिक शिक्षणातून संयम आणि संस्कार मिळत असणे : ‘भाषा’ ही केवळ पैसा किंवा नोकरी मिळवण्ो यांसाठीचे साधन नसून ती माणसाला माणसाशी जोडणारी, विचारांची देवाण-घेवाण घडवणारी, व्यवसाय, कलागुण आणि वैयक्तिक ओळख समृद्ध करणारे माध्यम आहे. पूर्वी भाषेच्या व्याकरणावर आणि शुद्धतेवर विशेष भर दिला जात असे. त्यासाठी संस्कृत भाषेला महत्त्व देण्यात आले; कारण संस्कृतमधूनच मराठी भाषेचा जन्म झाला. संस्कृतमधील विसर्ग, शब्दरचना, स्तोत्रांचे उच्चारण नीट केल्यास केवळ भाषेची शुद्धता नव्हे, तर विचारशक्ती आणि अभिव्यक्तीही सुधारते. अशा प्रकारे भाषिक शिक्षणातून मनुष्याची शिस्त, संयम आणि संस्कार यांची पेरणी केली जात असे.

३. आजचे पारंपरिक शिक्षण पदवी आणि पदव्युत्तर पदवी यांत अडकून पडणे : आज खर्‍या अर्थाने व्यवसायाभिमुख शिक्षण राहिलेले नाही. आजचे पारंपरिक शिक्षण ‘कला, विज्ञान आणि वाणिज्य’ या शाखांच्या पदव्या अन् पदव्युत्तर पदवी या चौकटीत अडकून राहिले आहे, ज्यातून लोकांना केवळ पोट भरता येते. आता संगणक आले आहेत. तंत्रज्ञानाला (टेक्नॉलॉजीला) महत्त्व प्राप्त झाले आहे आणि सर्व विषयांमध्ये त्याची व्याप्ती झाली आहे. याचे काही लाभ निश्चितच आहेत; पण तोटेही आहेत. याखेरीज कौशल्याधारित शिक्षण आणि औद्योगिक ज्ञान या क्षेत्रांतही आपली प्रगती झाली आहे, जी निश्चितच स्वागतार्ह आहे.

४. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी कर्मसिद्धांताविषयी केलेले मार्गदर्शन

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

४ अ. प्रत्येक कर्माला परिणाम असून चुकीच्या कर्माचे फळ ‘प्रारब्ध’ म्हणून भोगावे लागणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सांगितलेला ‘प्रारब्ध’ आणि ‘क्रियमाण’, म्हणजेच ‘कर्मांचा सिद्धांत’ हा नियम लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक कर्माला निश्चित परिणाम असतो आणि मागील जन्मातील चांगल्या किंवा चुकीच्या कर्मांवरून वर्तमान जन्मातील प्रारब्ध ठरते. व्यक्तीच्या प्रकृतीनुसार साधनामार्ग वेगळा असतो. प्रत्येकाला त्याची क्षमता, संस्कार आणि व्यक्तीमत्त्व यांच्यानुसार साधना करावी लागते. मनुष्यजन्म हा अत्यंत दुर्मिळ आहे. परमेश्वराने आपल्याला हे विशिष्ट स्वरूप दिले आहे की, आपण एक विशिष्ट कार्य पूर्ण करू शकू. मागील जन्मी केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ संचित असून चुकीच्या कर्मांचे फळ ‘प्रारब्ध’ म्हणून भोगावे लागते.

४ आ. मनुष्याचा सर्वाधिक देवाणघेवाण कुटुंबियांशी असणे : आपला सर्वाधिक देवाणघेवाण कुटुंबियांशी असतो. ज्या कुटुंबात आपण जन्म घेतो, त्या कुटुंबातील लोकांचे आपण देणेकरी असतो. आपल्या मुलांकडून आपण काही घेतले असेल, तर त्यांना देण्यासाठी आपण जन्म घेतो; आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिणी या सगळ्यांमध्ये अधिक देवाणघेवाण हिशोब असतो. म्हणूनच आज आपण जे काही सुख-दु:ख भोगतो, ते आपल्या कर्मांचा परिणाम आहे. हे मार्गदर्शन आपल्याला सनातन संस्थेच्या सत्संग आणि प्रवचन यांतून मिळाले आहे. ती सगळी परतफेड करण्यासाठीच आपण जन्म घेत असतो आणि म्हणूनच याला ‘कर्माचा सिद्धांत’ म्हटले जाते.

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हे तत्त्व आम्हाला समजले की, प्रत्येक कर्माचे परिणाम निश्चित असतात. मागील जन्मात आपण चांगली कर्मे केली असतील, दानधर्म केला असेल, पुण्यकर्म केले असेल, तर त्याचे फळ आपल्याला या जन्मात लाभते; पण जर आपण कुणाला फसवले असेल, त्रास दिला असेल, अन्याय केला असेल, तर तो त्रास तुम्हाला परतफेड करण्यासाठी ती व्यक्ती या जन्मात तुमच्या आयुष्यात पुन्हा येते.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

लेखक : डॉ. रवींद्र प्रभुदेसाई (वय ६२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), व्यवस्थापकीय संचालक, पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि., ठाणे.

भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/970600.html