#IndianShareMarket : डॉनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार करामुळे मुंबई शेअर बाजारात शेअर्सची घसरण !

अमेरिकेसह जगभरातल्या शेअर बाजारांवर डॉनल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कराचे परिणाम !

मुंबई – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कर धोरणाचे गंभीर परिणाम आशियाई शेअर बाजारांमध्ये दिसून आले. ७ एप्रिलला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजार तब्बल ४ सहस्र अंकांनी कोसळला. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीचीही मोठी पडझड झाली असून तो थेट २१ सहस्र ८०० अंकांच्या खाली गेला आहे. बँकिंग, तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल या नेहमी गुंतवणूकदारांना हात देणार्‍या क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर शेअर्सची विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात कमालीची अस्थिर परिस्थिती निर्माण झाली. अमेरिकेसह जगभरातल्या शेअर बाजारांवर डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार कराचे परिणाम दिसू लागले आहेत.

हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रीड, भारती एअरटेल, आयटीसी, एशियन पेंट्स, नेसले इंडिया, बजाज फिनसर्व्ह, टायटन, कोटक महिंद्रा, अल्ट्रा सिमको, मारुती यांच्या शेअर्समध्ये पहिल्या सत्राच्या आरंभीलाच मोठी घसरण दिसून आली.