PM Modi In Tamilnadu : तमिळ भाषेचा अभिमान असणार्‍यांनी किमान स्वाक्षरी तरी तमिळ भाषेत करावी ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तमिळ भाषा आणि वारसा जगभरात पोचावा, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचेही केले सुतोवाच !

पंतप्रधान नरेंद्र मोदी

रामेश्वरम् (तमिळनाडू) – तमिळ भाषा आणि वारसा जगभरात पोचावा यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. रामेश्वरम्मध्ये आशियातील पहिल्या ‘व्हर्टिकल लिफ्ट’ रेल्वे पुलाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘कधीकधी मला फार आश्चर्य वाटते. माझ्याकडे तामिळनाडूच्या काही नेतेमंडळींची पत्रे येतात; पण त्यांतील एकावरही तमिळ भाषेत स्वाक्षरी केलेली नसते. तमिळ भाषेचा अभिमान असणार्‍यांनी किमान स्वाक्षरी तरी तमिळ भाषेत करावी. गेल्या १० वर्षांत तमिळनाडूला देण्यात येणार्‍या निधीमध्ये तिप्पट वाढ केलेली असतांनाही त्यांचे रडगाणे चालूच आहे.’’

राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून तमिळनाडू विरुद्ध केंद्र सरकार असा थेट सामना पहायला मिळत आहे. या नवीन शिक्षण धोरणातील तीन भाषा धोरणाला तमिळनाडूने प्रखर विरोध केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात तीन भाषा शिकण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यातील किमान दोन भाषा या भारतीय असाव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे. यावर तामिळनाडूने आक्षेप घेतला आहे.

संपादकीय भूमिका

  • तमिळ भाषेचाच नाही, तर प्रत्येक भारतीय भाषेचा अभिमान असणार्‍यांनी त्यांची स्वाक्षरी मातृभाषेत केली पाहिजे; मात्र असे होतांना दिसत नाही, ही खेदाची गोष्ट आहे !
  • केंद्र सरकारने प्रत्येक भारतीय भाषा आणि तिचा वारसा जगभरात पोचण्यासाठी प्रयत्न करावा, असेच भारतियांना वाटते !