
जुन्नर (पुणे), ६ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी, तालुका जुन्नर (जिल्हा पुणे) येथील समाधी मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही श्रीराम जन्मोत्सव भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

६ एप्रिल या दिवशी सकाळी प्रभु श्रीरामचंद्रास पवमान अभिषेक, तसेच प.पू. भक्तराज महाराजांच्या समाधीची नित्य नैमित्तिक पूजा आणि अभिषेक करण्यात आला. प.पू. भक्तराज महाराजांचे नातजावई श्री. ओंकार कुलकर्णी आणि नात सौ. रेवा कुलकर्णी या नवदांपत्याने प.पू. भक्तराज महाराजांच्या समाधीवर अभिषेक केला. याचे पौरोहित्य श्री. पेठकर यांनी केले.
अभिषेकानंतर पुणे येथील कीर्तनकार ह.भ.प. गौरी महेश खांडेकर यांनी श्रीरामजन्माची सुश्राव्य कीर्तन सेवा केली. कीर्तनासाठी कांदळी पंचक्रोशीतील श्रीरामभक्त, तसेच प.पू. भक्तराज महाराजांचे भक्तगण उपस्थित होते. श्रीरामजन्म आणि नंतर श्रीरामाचा पाळणा झाल्यानंतर आरती करण्यात आली. महाप्रसाद आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या भजनाने श्रीराम जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली.

समाधीचे पूजन करतांना प.पू. भक्तराज महाराजांचे नातजावई श्री. ओंकार कुलकर्णी आणि नात सौ. रेवा कुलकर्णी