अमृत महोत्सव समारंभात अधिवक्ता एस्.के. जैन यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान !

(डावीकडून) मंत्री चंदक्रांत (दादा) पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर (अण्णा) मोहोळ, , मंत्री सौ. पंकजा मुंडे, राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, तसेच अन्य मान्यवर

पुणे, ६ एप्रिल (वार्ता.) – पुणे येथील ज्येष्ठ अधिवक्ता आणि विधीज्ञ श्री. सोहनलाल कुंदनमल तथा एस्.के. जैन यांच्या अमृत महोत्सवानिमित्त (७५ व्या वाढदिवसानिमित्त) ५ एप्रिल या दिवशी त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवक्ता जैन यांना शाल, श्रीफळ, वेलदोड्याचा हार आणि पुणेरी पगडी, तसेच मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या कार्याचा मागोवा घेणारी चित्रफीत दाखवली. कार्यक्रमाच्या आरंभीला प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्री. कृष्णकुमार गोयल यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, उद्योजक, विधीज्ञ, तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजचा सत्कार माझा नसून संघाच्या मुशीतून सिद्ध झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे ! – अधिवक्ता एस्.के. जैन

मनोगत व्यक्त करतांना अधिवक्ता एस्.के. जैन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रांत संघचालक आणि प्रख्यात विधीज्ञ श्री. बाबाराव भिडे यांच्याकडून मला वकिलीचे धडे मिळाले. त्यामुळे आजचा हा सत्कार माझा नसून संघाच्या मुशीतून सिद्ध झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे. जसा स्वयंसेवक हा समर्पण भावनेने कार्य करतो. त्याचप्रमाणे मीही एक स्वयंसेवक आहे. समाजाने मला पुष्कळ काही दिले आहे. ते ऋण फेडण्याचा मी केवळ प्रयत्न करत आहे. या सन्मानासाठी मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एस्.के. जैन हे समाजासाठी समर्पण भावनेने कार्य करत आहेत. आपण मालक नाही, तर विश्वस्त आहोत, या विचाराने त्यांनी आजवर अनेक संस्थांचा कार्यभार अध्यक्ष या नात्याने सांभाळला आणि त्या संस्थांचे कार्य वाढवले आहे. आज जैन यांचा होणार सन्मान ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक जण आज त्यांच्यासाठी या कार्यक्रमाला आलेले आहेत. यातच त्यांचा मोठेपणा दिसून येतो.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेही एस्.के. जैन यांचा सन्मान !

अधिवक्ता एस्.के. जैन यांचा सन्मान करतांना (डावीकडे) श्री. पराग गोखले, (उजवीकडे) श्री. कृष्णाजी पाटील

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. पराग गोखले, श्री. कृष्णाजी पाटील यांनी जैन यांचा शाल, नारळ आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान केला, तसेच त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी सनातन संस्थेचे साधकही उपस्थित होते. या वेळी उपस्थित असलेल्या भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांचीही हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी भेट घेतली.

यासह मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर (अण्णा) मोहोळ यांनीही जैन यांच्याविषयी गौरवास्पद भाषण केले. कार्यक्रमाच्या शेवटी अमृतमहोत्सव समितीचे श्री. गजेंद्र पवार यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

उपस्थित मान्यवर !

खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव (अण्णा) तापकीर, महाराष्ट्राचे महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी अन् मान्यवर उपस्थित होते.