अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी शंतनु कुकडे गरीब हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचे प्रकरण

पुणे – येथे शंतनु सॅम्युएल कुकडे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी एका बंगल्यात डान्सबार चालवत असल्याचे वृत्त समोर आले होते. शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी आरोप केला होता की, मुलींचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी शंतनु याला विदेशातून निधी येतो. शिवसेनेचे रवींद्र धंगेकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी गरीब हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी शंतनु कुकडे याच्यावर समर्थ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही नोंद झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर अजित पवार आणि त्यांचा पक्ष यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय वर्तुळातून टीका होऊ लागल होती; मात्र आता शंतनु कुकडे राष्ट्रवादीचा पदाधिकारीच नसल्याचे समोर आले आहे. शंतनु याने २६ डिसेंबर २०२४ या दिवशी मानसिक स्थिती चांगली नसल्याचे कारण देत पक्षाचा सदस्य आणि उपाध्यक्षपदाचे त्यागपत्र दिले होते.
काय आहे प्रकरण ?
शंतनु कुकडे याने पुणे शहरातील नाना पेठ येथे मुलींना समवेत घेऊन डान्सबार चालू केला आहे. त्यामधील एका मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून शंतनु कुकडे याच्यासह ५ जणांवर गुन्हा नोंद आहे. शंतनु याच्या अधिकोषातील खात्यात विदेशातून निधी येतो, अशी माहिती मिळाली आहे. तो गोरगरीब जनतेला आमीष दाखवून त्यांचे धर्मपरिवर्तन करत असतो. रात्री २-३ वाजेपर्यंत मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक लावलेले असतात. त्याचा स्थानिक लोकांना त्रास होतो; म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आणि पोलिसांकडे स्थानिकांनी तक्रार केली आहे. |