वाढती वाहन संख्या : एक धोक्याची घंटा !

यावर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात ८६,८१४ नवीन वाहनांची नोंदणी झाली. यात पुण्यामध्ये ११०५६, तर पिंपरी-चिंचवडमध्ये ६६४८ नवीन वाहने नोंदली गेली. प्रत्येक शुभ मुहूर्तावर हा आकडा वाढतच जात आहे. एकेकाळी ‘सायकलींचे शहर’ म्हणून देशभरात ओळख असलेल्या पुणे शहराचा आज ‘रहदारीचे शहर’ म्हणून देशात तिसरा क्रमांक लागतो. सर्व नागरिकांनी या समस्येचा गंभीरपणे विचार करायची आवश्यकता आहे.

१. वाढत्या वाहनसंख्येमुळे होणारी वाहतूक समस्या

वाढलेले उत्पन्न, कर्जाची सहज उपलब्धता, नातेवाईक – मित्र परिवारात मिरवायची हौस ही मोठी वाहने घेण्यामागची काही महत्वाची कारणे आहेत. खरी आवश्यकता म्हणून चारचाकी घेण्याचे प्रमाण पुष्कळ अल्प आहे. आज पुण्यासारख्या शहरात घरटी किमान एक चारचाकी आणि किमान २ दुचाकी हे वाहनांचे प्रमाण सर्रासपणे पहायला मिळते. प्रत्येक घरात एवढी वाहने आणि तीही नियमित वापरली जात असतील,  तर प्रदूषण अन् रहदारी यांची केवढी समस्या उभी रहाते, ते आपण पहातच आहोत. चारचाकी वाहन विकत घेतांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला असलेली थांब्यांची मर्यादा, स्वतःच्या वाहनाने वाचणारा वेळ, तुलनेने परवडणारे इंधन, स्वतःच्या सोयीने फिरता येणे, वाहनातून नेता येणारे सामान, वाहन उभे करण्यासाठी (पार्कींगला) त्यामानाने लागणारी कमी जागा हे मुद्दे ‘स्वत:चे वाहन सर्व बाजूंनी सोयीचे पडते’, असा विचार करायला कारणीभूत ठरतात. असे असले, तरी एक लक्षात घेतले पाहिजे की, हाच विचार प्रत्येक  चारचाकी वाहन विकत घेणारा करत असतो. परिणामी यांचे प्रमाण इतके आहे की, वर जे मुद्दे सोयीचे म्हणून पाहिले जातात, तेच मुद्दे एवढ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी केल्यावर गैरसोयीचे ठरतात. प्रत्येक वेळी लांबच्या लांब वाहनांच्या रांगा, शहरातून बाहेर पडून महामार्गावर पोचण्यासाठी लागणार पुष्कळ वेळ, महामार्गावरील गर्दीमुळे गावी जाणार्‍यांचे होणारे हाल किंवा आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी सहलीसाठी निघालो; पण रस्त्यातच वेळ गेला, अशा अनेक बातम्या आपण नियमित ऐकतो. याचे कारण म्हणजे सगळेच जण स्वतःची चारचाकी वाहने बाहेर काढतात.

श्री. अनिकेत विलास शेटे

२. प्रदूषण टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पर्याय 

वाहनांची वाढत जाणार्‍या संख्येच्या प्रमाणात शहरातील रस्ते, राज्य मार्ग अन् राष्ट्रीय महामार्ग यांचे प्रमाण वाढत नाही. त्यामुळे वाहने घेतांना स्वतःच्या आयुष्यातील किती वेळ आपण रस्त्यावर रहदारीमध्ये उभे रहाण्यात व्यय करणार आहोत आणि प्रदूषणात स्वतःची फुफ्फुसे किती खराब करून घेणार आहोत, याचा विचार सर्वांनी करणे आवश्यक आहे. जिथे शक्य असेल, तिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला प्राथमिकता दिली पाहिजे. त्यामुळे रस्त्यावरील रहदारीचे प्रमाण, वायूप्रदूषण आणि इंधन व्यय यांचे प्रमाण पुष्कळ न्यून होईल. शहरात नोकरीसाठी वाहन घेऊन जातांना ‘कार पुलींग’ (एकाच ठिकाणी किंवा एकाच रस्त्यावर जाणार्‍यांनी एकाच चारचाकी वाहनातून एकत्र जाणे)चा पर्याय कार्यवाहीत आणू शकतो.

३. वाढत्या वाहनसंख्येवर बंधन घालण्यामागील महत्त्व

पुण्यातील वाहनांची संख्या इतक्या वेगाने वाढत आहे की, रस्त्यावर चालायची भीती वाटते. शहरातील फूटपाथ हे नावालाच आहेत. तिथे फळवाले, पाणीपुरीवाले, भाजीवाले आणि इतर व्यावसायिक यांनी हातगाड्या लावलेल्या असतात. जिथे थोडाफार फूटपाथ मोकळा असतो, तिथे मुख्य रस्त्यावरील रहदारी चुकवण्यासाठी त्यावरून दुचाकीस्वार जात असतात. अशा वेळी पादचार्‍यांनी चालायचे कुठून ? असा प्रश्न उभा रहातो. आपण वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणार असू, तर त्याचा त्रास हा सर्वांना होणारच आहे. सध्या पार्कींगची गंभीर समस्या पुण्यासारखी शहरे भोगत आहेत. जुन्या इमारती आणि बैठी घरे येथे पार्कींग सोय नसल्यामुळे बर्‍याच नागरीकांच्या गाड्या या रस्त्यावरच उभ्या असतात. शहरातील वाढत्या रहदारीचे हेही एक कारण आहे.

पुण्यात वाढणारी आणि आताची लोकसंख्या नवीन वाहनांच्या संख्येत भर घालतात. कुणी किती वाहने घ्यावीत, यावर राज्यात वा देशात कसलेच बंधन नाही. ‘मला परवडते; म्हणून मी गाडी घेतली’, हा दृष्टीकोन यापुढे चालणार नाही. आताच जागे होऊन सर्वांनी वैयक्तिक वाहने वापरण्यावर स्वत:हून काही बंधने घालून घेतली नाही, तर उद्या नाईलाजाने सरकारला याविषयी कठोर कायदे केल्याविना गत्यंतर रहाणार नाही.

– श्री. अनिकेत शेटे, चिंचवड, जिल्हा पुणे. (१.४.२०२५)