
कर्णावती (गुजरात) – गेल्या वर्षी प्राणप्रतिष्ठेपर्यंत अयोध्येतील श्रीराममंदिराचा तळमजला बांधून झाला होता. यानंतर दीड वर्षांत मंदिराचा दुसरा आणि तिसरा मजला, घुमट आणि शिखर यांचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होईल. जूनपर्यंत पूर्ण मंदिर बांधून होईल. या मजल्यांवर भगवान शिव, श्रीगणेश आदींची मंदिरेही असतील, अशी माहिती या मंदिराचे वास्तूविशारद चंद्रकांत सोमपुरा यांनी दिली.
सोमपुरा यांनी सांगितले की, दुसर्या मजल्यावर राम दरबार बनवला आहे. तेथे भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्ती स्थापन केल्या जातील. या मूर्ती जयपूरमध्ये घडवल्या जात आहेत. त्या पांढर्या दगडापासून सिद्ध करण्यात आल्या आहेत. त्या एवढ्या जिवंत वाटत आहे की, भाविकांना साक्षात् प्रभु श्रीरामाच्या दरबारात आल्यासारखे वाटेल. राम दरबारात प्रत्येक मूर्तीची उंची ५ फुटांपर्यंत ठेवण्यात आली आहे.
४५० खांब अन् प्रत्येकावर १६ मूर्ती !
राम दरबारात बन्सीपहाडपूरच्या दगडाचा वापर करण्यात आला आहे. फरशींसाठी मकरानाचे संगमरवर आहे. प्रत्येक खांबावर अनुमाने १६ मूर्ती कोरल्या आहेत आणि असे एकूण ४५० खांब आहेत. त्यांवर दिग्पालांची मूर्ती साकारली आहे.
राम दरबारामध्ये जाण्यासाठी पायर्या आणि उद्वाहन !
श्रीराममंदिराच्या गर्भगृहात श्रीरामलल्लांच्या दर्शनानंतर भक्त दुसर्या मजल्यावर राम दरबाराच्या दर्शनास जाऊ शकतील. त्यासाठी १४ ते १६ फूट रुंद पायर्या आहेत. विकलांग भाविकांसाठी मागच्या बाजूने एक उद्वाहनही (लिफ्टही) आहे. मंदिराच्या तिसर्या मजल्यावर मूर्ती स्थापित नाही. हा मजला गुजरातच्या वेरावलच्या सोमनाथ मंदिराप्रमाणे आहे.