
पुणे – महापालिकेच्या बांधकाम विभागाने २ सहस्र ६०० कोटी रुपये, तर मिळकतकर विभागाने २ सहस्र ३५५ कोटी रुपये इतक्या महसुलाची महापालिकेच्या तिजोरीत भर घातली आहे. मागील वर्षीपेक्षा या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाने १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवला आहे. मिळकतकर विभागाने अधिकाधिक मिळकतकर जमा होण्यासाठी विशेष पथके, महिलांची पथके, बँड पथके सिद्ध केली होती. तांत्रिक अडचणी असलेल्या अनेक प्रकरणांवर निर्णय घेत नागरिकांना मिळकतकर भरण्यास प्रोत्साहन दिले होते. कर भरण्यासाठी नागरिकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्यासह कर भरण्यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून दिली होती. बांधकाम विभागाने ३ सहस्र ३५९ बांधकामांना अनुमती दिली होती, त्यातून बांधकाम विभागाने २ सहस्र ६०१ कोटी ८८ लाख रुपयांचा महसूल मिळवला.
पुण्यामधील बांधकाम अनुमतीची यंत्रणा सुटसुटीत असल्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळाले आहे. येथील रहाणीमानाचा दर्जाही सुधारत आहे, असे पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले