Trump Tariffs Announcement : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतावर लादला २७ टक्के व्यापार कर !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांना नवीन कर आकारले आहेत. यात भारताचाही समावेश असून भारतातून आयात होणार्‍या वस्तूंवर २७ टक्के समन्यायी व्यापार कर (रेसिप्रोकॉल टेरीफ) आकारण्यात आला आहे. ट्रम्प प्रशासनाने २ एप्रिलपासून नवे व्यापार कर लागू करण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत नव्या करांची घोषणा केली.

चीन, व्हिएतनाम आणि तैवान यांच्यापेक्षा भारतावर अल्प कर !

आशिया खंडातील अन्य देशांच्या तुलनेत काही प्रमाणात भारतावरील कर अल्प असला, तरी अनेक अशियायी देशांपेक्षा तो अधिकच आहे. चीनवर ३४ टक्के, व्हिएतनामवर ४६ टक्के, थायलंडवर ३६ टक्के, इंडोनेशियावर ३२ टक्के, पाकिस्तानवर २९ टक्के कर लागू करण्यात आला आहे. त्याच वेळी आशियातील जपानवर २४ टक्के, दक्षिण कोरियावर २५ टक्के,  तैवान ३२ टक्के आणि मलेशियावर २४ टक्के कर लावण्यात आला आहे. युरोपीयन युनियनवर २० टक्के, तर ब्रिटनवर ३२ टक्के कर आकारण्यात येणार आहे.

भारताला लाभही होणार !

अमेरिकी बाजारपेठेत भारताला चीन आणि व्हिएतनाम या दोन्ही देशांकडून मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर याचा भारताला एका अर्थाने लाभच होणार असल्याचे म्हटले जात आहे.

मोदी चांगले मित्र असतांनाही भारत आमच्याकडून ५२ टक्के व्यापार कर आकारतो ! – ट्रम्प

डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, भारताच्या पंतप्रधानांचा नुकताच दौरा आटोपला. ते माझे फार चांगले मित्र आहेत; पण मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही चांगले मित्र आहात; पण तुम्ही आम्हाला चांगली वागणूक देत नाही.’ ते आमच्यावर ५२ टक्के व्यापार कर आकारतात; पण आपण मात्र त्यांच्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून जवळपास शून्य कर आकारत आलो.

व्यापारी कराचा कोणत्या उत्पादनांवर परिणाम होणार ?

अमेरिकेने वाढवलेल्या व्यापारी करानंतरही तेथे भारतीय कपडे आणि चपला इतर देशांपेक्षा स्वस्त असतील, ज्यामुळे त्यांची विक्री वाढू शकते. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने आणि रत्ने आणि दागिने यांच्यावर व्यापारी कराचा परिणाम होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त ऑटो पार्ट्स आणि ॲल्युमिनियम उत्पादनांवर व्यापारी कर लागू होणार नाही.

भारत प्रथम शुल्काचे विश्लेषण करेल ! – केंद्र सरकार  

भारताचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

भारताचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, डॉनल्ड ट्रम्प यांच्यासाठी अमेरिका प्रथम आहे आणि मोदी यांच्यासाठीही भारत प्रथम आहे. आपण प्रथम कराचे विश्लेषण करू, नंतर त्याचा परिणाम काय होईल ? याचे मूल्यांकन करू आणि त्याला कसे सामोरे जायचे ?, ते पाहू.