Allahabad HC On Conversion : धर्मांतर केवळ हृदय परिवर्तन आणि श्रद्धा यांद्वारेच होऊ शकते !

  • अलाहाबाद उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

  • फसवणूक आणि दबावाखाली केलेले धर्मांतर अवैध अन् गंभीर गुन्हा !

अलाहाबाद उच्च न्यायालय

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – धर्मांतर केवळ हृदय परिवर्तन आणि श्रद्धा यांद्वारेच होऊ शकते. फसवणूक आणि दबावाखाली केलेले धर्मांतर अवैध अन् गंभीर गुन्हा आहे, अशा शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने धर्मांतराच्या प्रकरणावर टीपणी केली. ‘अशा प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षांमधील कराराच्या आधारे खटला रहित करता येत नाही’, असेही न्यायालयाने या वेळी स्पष्ट केले. लग्नाच्या नावाखाली खोटे बोलून आणि बलात्कार करून धर्मांतर केल्याच्या प्रकरणी आरोपीला कोणताही दिलासा देण्यास नकार देत खटला रहित करण्याची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

उच्च न्यायलयाने म्हटले की, जेव्हा प्रौढ व्यक्ती शुद्ध अंतःकरणाने आणि स्वतःच्या इच्छेने महंमद पैगंबर यांच्यावर विश्वास ठेवते, तेव्हाच इस्लाम स्वीकारणे खरे मानले जाऊ शकते. इस्लामच्या तत्त्वांनी प्रभावित होऊन त्याचे मन खरोखरच पालटले असावे. स्त्रीचे शरीर हे तिचे मंदिर आहे आणि पवित्रता हा त्याचा पाया आहे. तिला अजिबात धक्का लावता येत नाही. बलात्काराच्या घटना जीवनाचा प्रतिष्ठित श्वास रोखतात.

काय आहे प्रकरण ?

उत्तरप्रदेशातील रामपूर येथे तौफिकचा मेहुणा महंमद अयान याने राहुलच्या नावाने फेसबुकवर एक खाते सिद्ध केले. त्याद्वारे त्याने ह्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. नंतर तिला कळले की, राहुल हिंदु नसून मुसलमान आहे. त्यानंतर अयान याच्यासह त्याचा मेहुणा तौफिक आणि रियाज यांच्याविरुद्ध बलात्कार अन् धर्मांतर करण्यास भाग पाडले, असा गुन्हा नोंदवण्यात आला; मात्र नंतर आरोपी आणि पीडित महिला यांच्यात समझोता झाला. तिने सांगितले की, तिने स्वतःच्या इच्छेने धर्मांतर केले होते आणि कुणाच्या तरी प्रभावाखाली गुन्हा नोंदवला होता. ती आरोपीसमवेतच रहात आहे. महिलेने खटला रहित करण्याचीही विनंती केली.

यावर न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकरणांमध्ये तोडगा काढण्याची चर्चा कल्पनेपलीकडे आहे. या प्रकरणात धर्मांतर श्रद्धेसाठी केले गेले नव्हते, तर लग्नाचा आधार बनवण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी केले गेले होते. हे सद्भावनेने केले जात आहे, असे अजिबात मानले जाऊ शकत नाही.

संपादकीय भूमिका

या जगात इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर झाला, तर भारतातील ईशान्य भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रसार आमीष दाखवून झाला, ही वस्तूस्थिती कुणीही नाकारू शकत नाही. भारतात या दोन्ही गोष्टी आज चालूच आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद आहे !