देशविरोधी उग्रवादी, आतंकवादी यांना लगाम घालणारे मुत्सद्दी अधिकारी : लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) !

आजपासून वाचा विशेष सदर !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्याप्रमाणे मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक हिंदु धर्म अन् राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. निधर्मीवादी सरकारांकडून, तसेच प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून होणारा त्रास सहन करत ते निःस्वार्थ भावाने केवळ राष्ट्र-धर्मरक्षणासाठी दिवसरात्र संघर्ष करत आहेत.

आज राष्ट्रविरोधी शक्ती निधर्मीवाद्यांच्या पाठिंब्याने बलवान होऊन हिंदुविरोधी, तसेच राष्ट्रविरोधी षड्यंत्रे करत असतांना आपल्या मनात ‘हिंदूंचे आणि राष्ट्राचे पुढे काय होणार ?’, अशी चिंता वाटते. त्या वेळी हिंदुत्वाच्या आणि राष्ट्राच्या रक्षणासाठी लढणार्‍या या मावळ्यांच्या, शिलेदारांच्या संघर्षाची उदाहरणे वाचल्यास निश्चितच आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल. त्याचसाठी अशा शिलेदारांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणारे ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ हे सदर आजपासून चालू करत आहोत. या माध्यमातून भारतात सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांची सर्वांना माहिती होईल अन् त्या अनुषंगाने कार्य करण्यासाठी प्रेरणाही मिळेल ! – संपादक

पुणे येथील लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) (वय ८२ वर्षे) हे एक अत्यंत सन्मानित आणि अनुभवी लष्करी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि धोरणकर्ते आहेत. त्यांनी ४ दशके भारतीय लष्करात सेवा केली आहे. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा, संरक्षण नियोजन आणि आतंकवादविरोधी कारवाया यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. आजही ते विविध विश्वविद्यालयांमध्ये अध्यक्षपदांवर असून ते युवकांचे प्रबोधन करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. आज त्यांच्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेऊया.

लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त)

१. लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे

अ. लष्करी सेवा : वर्ष १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी (काश्मीर), वर्ष १९७१ च्या युद्धाच्या वेळी (पश्चिम क्षेत्र) आणि वर्ष १९९९ च्या कारगिल युद्धाच्या वेळी, तसेच ज्यावर चीन, दक्षिण तिबेट असा दावा करत आहे, अशा अरुणाचल-चीन सीमेवरील भागात सुरक्षेविषयी व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व त्यांनी सांभाळले होते.

आ. सीमा सुरक्षा : अरुणाचल प्रदेश, म्यानमार, भूतान आणि बांगलादेश या देशांच्या सीमेच्या काही भागांमधील सीमासुरक्षा व्यवस्थापनाचे उत्तरदायित्व त्यांनी पार पाडले.

इ. देशविरोधी उग्रवादी गटांच्या विरोधात कारवाई : आसाम, नागालँड, मणीपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि ईशान्य भारतातील इतर भागांमध्ये बंडखोरांशी लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले. त्यांना गुजरात आणि उत्तरप्रदेश येथे जातीय हिंसाचार नियंत्रित करण्याचा अनुभव आहे.

ई. ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ आणि आतंकवादविरोधी मोहीम : त्यांनी पंजाबमधील ‘ऑपरेशन ब्लू स्टार’मध्ये (‘ऑपरेशन ब्लू स्टार’ म्हणजे खलिस्तान चळवळीच्या विरोधात राबवलेली लष्करी मोहीम) भाग घेतला. नंतर पंजाबमध्ये ‘ब्रिगेडियर’ पदावर, काश्मीरमध्ये ‘मेजर जनरल’ पदावर आणि आसाम अन् ईशान्य भारत येथील इतर भागांमध्ये ‘लेफ्टनंट जनरल’ अशा विविध पदांवर असतांना आतंकवादविरोधी मोहिमा राबवल्या.

नवी देहली येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांनी लष्करी मोहिमांचे (चीन आणि दक्षिण आशियाशी संबंधित) उपमहासंचालक, अतिरिक्त महासंचालक आणि रणनीतीविषयी नियोजनाचे महासंचालक म्हणून उत्तरदायित्व सांभाळले आहे.

उ. भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमावादावर चर्चा : भारत-चीन सीमा विवादावर संयुक्त कार्यगट आणि तज्ञ गटांचे ते सदस्य होते. काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या शासनकाळात झालेल्या शांतता आणि ‘शांतता करारा’च्या मसुदा पथकाचे ते सदस्य होते. सीमा मुद्यांवर चीनसह वाटाघाटींमध्ये त्यांनी भाग घेतला आहे, तसेच सियाचिन-ग्लेशियर विवादावर पाकिस्तानसमवेतच्या चर्चेत सहभाग घेतला.

ऊ. संरक्षण धोरण आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य : लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) यांनी भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य अन् धोरणात्मक भागीदारी कार्यक्रमांत महत्त्वाची भूमिका निभावली आहे.

ए. आतंकवाद निर्मूलन : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान येथे प्रशिक्षण घेतलेल्या १ सहस्र २६७ आतंकवाद्यांना हिंसा सोडून सामान्य जीवन जगण्यास भाग पाडले. दुसर्‍या महायुद्धानंतर कदाचित् जगातील हा उच्चांक असेल. धार्मिक मूलतत्त्ववादाची शिकवण असणार्‍या आतंकवाद्यांनी हिंसा आणि नासधूस करण्याचे सोडले.

युवकांनी विविध विषयांचा अभ्यास करून संधीचे रूपांतर देशकार्यासाठी करावे !  

लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त)

राष्ट्राच्या सद्यःस्थितीत युवकांचे महत्त्व पुष्कळ आहे. आज आपल्या देशातील तरुणपिढीला भारतासह विविध देशांमध्ये पुष्कळ संधी आहे. युवकांनी विविध शैक्षणिक उपक्रम शिकून अभ्यास करावा. आज महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर लक्ष ठेवावे अन् त्यातून शिकावे. शिकून मिळालेल्या संधीचे रूपांतर त्यांनी देशकार्यासाठी करावे. जगात आज सर्वाधिक विश्वविद्यालये (विद्यापिठे) भारतात आणि त्यातही पुण्यात सर्वाधिक आहेत. पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे माहेरघर आहे. पुण्यात शिक्षणाच्या विविध संधी आणि विविध प्रकारची महाविद्यालये, तसेच विद्यापिठे आहेत, त्यामुळेच पुण्याला ‘सांस्कृतिक आणि विद्येची नगरी’ म्हणतात. पुण्याप्रमाणेच याच प्रकारची महाविद्यालये आज गोवा, केरळ, कर्नाटक, ओडिशा, उत्तर भारत, अशा विविध ठिकाणी निर्माण होणे आवश्यक आहे. मी आजही अनेक विश्वविद्यालयांमध्ये अध्यक्ष आहे. मी माझा वेळ तरुणांना शिक्षित करण्यासाठी व्यय करत आहे अन् पुढे करत रहाणार आहे. आपण सर्वांनी आपले राष्ट्र उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करूया !

– लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त)

२. लेफ्टनंट जनरल (डॉ.) डी.बी. शेकटकर (निवृत्त) यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

अ. भारतीय सैन्यामध्ये बजावलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी त्यांना भारताच्या तत्कालीन राष्ट्रपतींकडून वर्ष १९८१ मध्ये ‘विशिष्ट सेवा पदक (व्ही.एस्.एम्.)’ वर्ष १९९७ मध्ये ‘अतिविशिष्ट सेवा पदक (ए.व्ही.एस्.एम्.)’ आणि वर्ष २००२ मध्ये ‘परमविशिष्ट सेवा पदक (पी.व्ही.एस्.एम्.)’ या पुरस्कारांनी गौरवान्वित केले आहे.

आ. त्यांना काही विद्यापिठांकडून ‘डॉक्टरेट’ (विद्यावाचस्पती) पदवीनेही सन्मानित केले आहे. त्यांनी वाणिज्य शाखेतील पदवी मिळवली असून सरंक्षण विषयामध्ये ‘एम्.एस्.सी.’ आणि ‘एम्.फील.’ या पदव्या संपादन केल्या.

आ १. यासह पुणे येथील ‘सिम्बायोसिस विद्यापिठा’तून त्यांनी व्यवस्थापन शास्त्रामध्ये ‘२१ व्या शतकात यशस्वी होण्यासाठी आवश्यक नेतृत्वगुण’ या विषयावर पहिली ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली.

आ २. त्यानंतर त्यांनी ‘संरक्षण आणि रणनीती अभ्यास’ या अंतर्गत ‘साम्यवादी आघाडीचा आतंकवाद आणि त्याचा भारताच्या सुरक्षेवरील परिणाम’ या विषयावर दुसरी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापिठातील ‘संरक्षण आणि रणनीती अभ्यास’ विभागाचे प्रमुख प्रा. विजय एस्. खरे यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

आ ३. त्यानंतर ‘सामाजिक माध्यमांच्या संदर्भात २१ व्या शतकातील मानसिक युद्ध’ या विषयांमध्ये तिसरी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली आहे. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापिठाने त्यांना ही पदवी प्रदान केली. ३ डॉक्टरेट पदव्या मिळवणारे ते बहुतेक पहिले लष्करी अधिकारी असावेत.

आ ४. ‘पर्यावरणशास्त्र आणि पर्यावरण अन् शस्त्रे आणि उपकरणे’ या विषयात त्यांनी पदव्युत्तर पदविका मिळवली आहे.

३. शैक्षणिक आणि बौद्धिक योगदान

अ. त्यांनी सुरक्षा, आतंकवाद, अंतर्गत सुरक्षा आणि बुद्धीमत्ता या विषयांवर १७ पुस्तके सह-लेखन केली आहेत. ब्लूमिंग्टन येथील ‘इंडियाना विद्यापिठा’च्या ‘सेंटर फॉर अमेरिकन अँड ग्लोबल सिक्युरिटी’ने अमेरिकेत एक पुस्तक प्रकाशित केले आहे.

आ. पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापिठातील ‘संरक्षण आणि रणनीती अभ्यास’ विभागाच्या ‘छत्रपती शिवाजी अध्यासना’चे ते अध्यक्ष आणि प्रमुख प्राध्यापक होते.

इ. ‘सिम्बायोसिस विद्यापिठा’मध्ये प्राध्यापक, तसेच सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. पुणे विद्यापिठाच्या संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यास विभागात ते अध्यक्ष, प्राध्यापक होते आणि  त्यांनी सिम्बायोसिस विद्यापिठाचे सल्लागार म्हणून काम केले.

ई. आजही ते भारतातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या सल्लागार समित्या आणि व्यवस्थापन मंडळांशी संलग्न आहेत, तसेच ते भारताच्या ‘एकात्मिक सुरक्षा मंचा’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नवी देहली येथील संयुक्त युद्ध केंद्राचे ते प्रतिष्ठित सदस्य आहेत. ते वर्ष २०१९ ते २०२४ या काळात ‘सिक्कीम केंद्रीय विश्वविद्यालया’चे ‘कुलपती’ होते.

उ. त्यांनी भारत सरकारच्या तज्ञ समितीचे (ज्याला ‘शेकटकर समिती’ असेही म्हणतात) अध्यक्षपद भूषवले. या समितीच्या माध्यमातून त्यांनी ‘संरक्षण व्यवस्थापन सुधारणा आणि संरक्षण अर्थसंकल्प संतुलन’ यांविषयी शिफारसी केल्या.

ऊ. ते ‘फोरम फॉर इंटिग्रेटेड सिक्युरिटी ऑफ इंडिया (फिन्स)’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते ‘सेंटर फॉर जॉईंट वॉरफेअर, नवी देहली’ येथे प्रतिष्ठित ‘फेलो’ आहेत. ते सल्लागार परिषद आणि ‘गव्हर्निंग कौन्सिल’मधील शैक्षणिक संस्थांशी संबंधित कार्य करत आहेत.

वयाच्या ८२ व्या वर्षीही ते त्यांची ऊर्जा आणि वेळ युवा पिढीला २१ व्या शतकातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज करण्यात व्यय करतात !