|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर पाकिस्तानने प्रगतीच्या बाबतीत भारताला मागे टाकले नाही, तर माझे नाव पालटा, असे विधान पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डेरा गाजी खान येथे जमलेल्या मोठ्या जनसमुदायाला संबोधित करतांना केले. ‘आपण पाकिस्तानला एक महान राष्ट्र बनवू आणि भारताला मागे टाकू, असेही ते म्हणाले. त्यांनी शपथ घेतली की, पाकिस्तानचे भविष्य महानतेसाठी निश्चित आहे आणि देशाला समृद्धीकडे नेऊ.
शाहबाज शरीफ यांनी दावा केला की, जेव्हा त्यांचे सरकार सत्तेवर आले, तेव्हा देशातील महागाई ४० टक्के होती, जी आज केवळ २ टक्क्यांवर आली आहे.
या महिन्याच्या प्रारंभी शाहबाज शरीफ यांनी भारतासमवेत शांततापूर्ण चर्चेची इच्छा व्यक्त केली होती आणि पाकिस्तान वादग्रस्त काश्मीर वादासह सर्व सूत्रे संवादाद्वारे सोडवण्यास सिद्ध असल्याचे म्हटले होते.
संपादकीय भूमिकापाकिस्तान आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असतांना अशा प्रकारची तोंडांची वाफे दवडणारी वाक्तव्ये करून शरीफ पाकिस्तानी जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे या जनतेलाही ठाऊक आहे ! |