गेले २ दिवस वागातोर आणि हणजूण येथे न्यायालयाचा आदेश डावलून ध्वनीप्रदूषण चालूच

म्हापसा, २७ जानेवारी (वार्ता.) – प्रजासत्ताकदिन आणि आधीचा दिवस असे २ दिवस वागातोर आणि हणजूण येथे अनेक क्लबमधून रात्रीच्या वेळी ध्वनीप्रदूषण चालूच होते आणि यामुळे मनस्ताप झाल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. विशेष म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने खुल्या जागेत रात्री १० वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवण्यावर बंदी घातलेली आहे; मात्र याचे पालन न करणार्‍यांवर कारवाई करण्यास प्रशासन, पोलीस आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना अपयश आल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशावरून ध्वनी देखरेख समिती नेमण्यात आलेली आहे. या समितीचे सदस्य देवानंद शिरोडकर प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘मी माझ्या घरातून ध्वनीप्रदूषण होत असल्याचे ऐकले; मात्र पोलिसांच्या साहाय्याविना मी ते कसे थांबवणार ?’’

वागातोर येथील रहिवासी डेसमंड डिसोझा म्हणाले, ‘‘अनेक वेळा तक्रारी करूनही हणजूण येथील आयरिश हॉटेल आणि हिल टॉप येथे पहाटेपर्यंत संगीत वाजवले जात होते.’’ स्थानिकांनी आता उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पोलिसांकडून कठोर कार्यवाही आणि सहकार्य यांची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

पोलिसांना हा आवाज ऐकू येत नाही कि त्यांचे क्लबवाल्यांशी आर्थिक हितसंबंध आहेत ?