|
श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी प्रयागराज

प्रयागराज, १७ जानेवारी (वार्ता.) – आंध्रप्रदेशातील तिरुपतीप्रमाणे तीर्थराज प्रयाग येथेही श्री बालाजीच्या भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. तिरुपती देवस्थान स्वत: यात लक्ष घालून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लवकरच उत्तर देश शासनाशी संपर्क साधणार असल्याची महत्त्वाची माहिती तिरुपती देवस्थानकडून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला देण्यात आली.
सध्या प्रयागराज येथे महाकुंभपर्वापुरती प्रयागराज प्राधिकरणाकडून तिरुपती बालाजी देवस्थानसाठी ५ एकर भूमी देण्यात आली आहे. या भूमीवर २.८ एकर जागेवर श्री बालाजीचे तात्पुरते मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिर परिसरात एकाच वेळी २ सहस्र भाविक राहू शकतील, अशी व्यवस्था आहे. या मंदिरात नियमित सहस्रो भाविक श्री बालाजीच्या दर्शनासाठी येत आहेत. कुंभमेळ्यात श्री बालाजीच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आल्याने अनेक भाविकांनी अत्यानंद व्यक्त करत प्रयागराज येथे श्री बालाजीचे कायमस्वरूपी भव्य मंदिर उभारण्याची मागणी केली आहे. उत्तरप्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यांतील भाविकांनीही प्रयागराजसारख्या तीर्थक्षेत्री श्री बालाजीचे मंदिर उभारावे, अशी मागणी तिरुपती देवस्थानकडे केली आहे. त्यामुळे तिरुपती देवस्थानकडूनही या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.
उत्तरप्रदेश शासनाने मंदिरासाठी भूमी देऊन सहकार्य करावे ! – १००८ श्री श्री विद्याधीश तीर्थस्वामी, मठाधिपती, पलिमारू मठ, उडुपी, कर्नाटक
कर्नाटकमधील उडुपी येथील श्रीमन्मध्वाचार्य मूळ महासंस्थान श्री ऋषीकेश अष्टतीर्थपीठाच्या श्री पलिमारू मठाचे मठाधिपती १००८ श्री श्री विद्याधीश तीर्थस्वामी यांनी १६ जानेवारी या दिवशी महाकुंभपर्वातील श्री बालाजी मंदिरात येऊन दर्शन घेतले. या वेळी तिरुपती येथील श्री बालाजी मंदिर वैकुंठाची प्रचीती देते, त्याप्रमाणे प्रयागराज येथे श्री बालाजीचे मंदिर झाल्यास येथे येणार्या भाविकांना तिरुपतीची प्रचीती येईल. त्यामुळे प्रयागराज येथे लवकरात लवकर श्री बालाजीचे मंदिर साकार व्हावे. उत्तरप्रदेश शासनाने यासाठी भूमी देऊन आवश्यक ते सहाकार्य करावे, असे मनोगत व्यक्त केले.