प्रतिदिन ३ सहस्र चष्म्यांचे वाटप ! – नेत्रकुंभाचे महाप्रबंधक सत्यविजय सिंह

प्रयागराज, १८ जानेवारी (वार्ता.) – महाकुंभनगरीत सेक्टर ६ येथील नेत्रकुंभाला लोकांचा पुष्कळ चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत १९ सहस्र लोकांची नेत्रपडताळणी करण्यात आली आहे. प्रतिदिन ४ सहस्र लोकांची नेत्रपडताळणी होते, तर ३ सहस्र चष्म्यांचे विनामूल्य वितरण करण्यात येते, अशी माहिती नेत्रकुंभाचे महाप्रबंधक सत्यविजय सिंह यांनी ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.
सत्यविजय सिंह पुढे म्हणाले की, नेत्रकुंभाचा परिसर १० एकरमध्ये पसरला आहे. यामध्ये ‘सक्षम’ संस्था, भाऊराव न्यास, ‘रज्जू भय्या सेवा न्यास’, ‘हंस फाऊंडेशन’, ‘एन्मो’ ही डॉक्टरांची मोठी संस्था इत्यादींच्या सहकार्याने चालू आहे. उत्तरप्रदेश शासनाने आम्हाला रहाणे, विद्युत् व्यवस्था इत्यादी मूलभूत सुविधा पुरवत आहे. नेत्रकुंभाचे मुख्य कार्य वर्ष २०१९ च्या अर्धकुंभात चालू झाले. तेव्हाही त्याचा चांगला प्रतिसाद दिसून आला. त्या वेळी २ लाख २ सहस्र लोकांची पडताळणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे १ लाख ५५ सहस्र चष्म्यांचे वितरण करण्यात आले होते. तेव्हा लक्षात आले की, देशात नेत्ररोगाने प्रभावित लोकांची संख्या अधिक आहे. वर्ष २०२५ च्या नेत्रकुंभात आम्ही ५ लाख लोकांची पडताळणी करण्याचे ध्येय ठेवले आहे. ३ लाख चष्मे गरजूंना विनामूल्य वितरित करण्यात येतील. नेत्ररोगांशी संबंधित काम करणार्या देशभरातील २१९ संस्थांशी आम्ही संयुक्तपणे काम करत आहोत. प्रतिदिन आमचे ४० डॉक्टर बाह्य रुग्ण विभागात (ओपीडीत) बसतात. आम्ही रुग्णांच्या आजारानुसार त्यांना आमच्याशी संबंधित मोठ्या रुग्णालयांत पाठवतो. रुग्ण भारतातील ज्या राज्यातील असेल, तेथील संबंधित संस्थेकडे आम्ही पाठवतो आणि त्याला तेथे विनामूल्य सेवा मिळेल.
विनामूल्य चष्म्यांचे वितरण
राजकोट, गुजरात येथील ‘बाबा रणछोडदास चॅरिटेबल ट्रस्ट’द्वारे चष्म्यांचे वितरण रुग्णांना विनामूल्य करण्यात येते. याच संस्थेकडून महाकुंभमेळ्यात प्रतिदिन १५ सहस्र भाविकांना महाप्रसाद देण्यात येतो.