श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, प्रयागराज
प्रयागराज, १८ जानेवारी – येथे महाकुंभपर्वात १८ जानेवारी या दिवशी श्री पंचदशनाम जुना आखाड्यात २ सहस्रांहून अधिक संन्याशांनी नागा साधू होण्याची दीक्षा घेतली. श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर अनंत श्री विभूषित स्वामी अवधेशानंदजी गिरि यांनी या सर्वांना दीक्षा दिली. गंगा नदीच्या काठावर या सर्व संन्याशांना सामूहिकपणे नागा साधूंची दीक्षा देण्यात आली. यापुढे सर्व कुटुंबाचा त्याग करून हे सर्व नागा साधू हिंदु धर्माचा प्रसार-प्रचार, रक्षण आणि विश्वकल्याण यांसाठी कार्यरत रहाणार आहेत.
स्वतःचे केले पिंडदान
सकाळी ११.३० वाजेनंतर गंगा नदीच्या काठावर या दीक्षा विधीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे प्रमुख या संन्याशांना दीक्षेसाठी दीक्षास्थळी घेऊन आले. दीक्षा घेणार्या सर्व संन्याशांचे प्रथम मुंडन करण्यात आले. अंगावरील सर्व वस्त्रांचा त्याग करून सर्व संन्याशांनी केवळ लंगोट धारण केली. कमेरेला किंवा हातातील दोरा आदी सर्व बंधने या वेळी तोडण्यात आली. दीक्षा घेणारे सर्व संन्यासी ‘हर हर महादेव’ असा अखंड नामजप करत होते. या वेळी दीक्षा घेणार्या सर्व संन्याशांनी स्वत:च्या पिंडदानासह कुटुंबियांचेही पिंडदान केले. त्यानंतर सर्वांना पंचगव्य, भस्म, चंदन आदी १० विधींनी युक्त स्नान घालण्यात आले. येथील विधी झाल्यावर सर्व संन्यासी श्री पंचदशनाम जुना आखाड्यामध्ये गेले. तेथे सत्याचे प्रतीक मानल्या जाणार्या धर्मध्वजाच्या साक्षीने श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे पीठाधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंदजी गिरि यांनी नागा साधूंची दीक्षा दिली. दीक्षा घेतल्यानंतर सर्व नागा साधूंनी धर्मध्वज, पीठाची गादी आणि इष्ट देवता यांना वंदन करून आशीर्वाद घेतला. नागा साधू म्हणून दीक्षा घेतल्यानंतर या सर्वांचे वैयक्तिक आयुष्य उरणार नसून त्यांचे संपूर्ण जीवन हिंदु धर्माचे रक्षण, संवर्धन आणि मानवकल्याण यांसाठी असणार आहे.
या वेळी शैवांच्या सातही आखाड्यांच्या साधूंना दीक्षा देण्यात आली. दीक्षा घेणार्या संन्याशांमध्ये बालकांसह वृद्धांचाही समावेश होता.
१ सहस्र युवती होणार नागा संन्यासिनी !१९ जानेवारी या दिवशी जुना पंचदाशनाम आखाड्याच्या वतीने १ सहस्र युवतींना नागा संन्यासिनींची दीक्षा दिली जाणार आहे. शैव आखाड्यांच्या सातही आखाड्यांतील युवतींना ही दीक्षा दिली जाणार आहे, अशी माहिती मौढी मठाच्या मंहत साध्वी उभा भारती यांनी दिली. |
प्रयागराज महाकुंभपर्वात २५ सहस्र संन्यासी नागा साधूंची दीक्षा घेणार !
प्रयागराज महाकुंभमध्ये विविध आखाड्यांच्या एकूण २५ सहस्र संन्याशांना नागा साधूंची दीक्षा दिली जाणार जाईल, असे अनुमान आहे. प्रयागराज येथे नागा साधूंची दीक्षा घेणार्यांना ‘राजराजेश्वरी नागा’ म्हणून ओळखले जाते. मौनी अमावास्येच्या पूर्वी विविध आखाड्यांच्या संन्याशांना नागा साधूंची दीक्षा देण्याचा सोहळा पूर्ण होईल. दीक्षा घेतलेल्या सर्व नागा साधूंना २८ जानेवारी या दिवशी मौनी अमावास्येच्या दिवशी त्रिवेणी संगमामध्ये अमृत स्नान करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे.