स्नेहसंमेलनातील अश्लीलता !

प्रतिकात्मक छायाचित्र

डिसेंबरमध्ये बर्‍याच शाळांमध्ये स्नेहसंमेलन साजरे करण्यात येते. यामध्ये विद्यार्थी त्यांच्यातील विविध कलाविष्कार सादर करतात. यामध्ये नृत्य, कथाकथन, विनोद, गायन, वादन इत्यादी प्रकारांचा समावेश असतो. बहुतांश ठिकाणी नृत्याच्या सादरीकरणाचे प्रमाण अधिक असते. काही शाळांमध्ये लोककला, लावणी, भावभक्तीपर, बालगीते अशा स्वरूपांत नृत्यांचे आयोजन केले जाते. हे प्रकार निश्चितच कौतुकास्पद आहेत; पण काही शाळांमध्ये या प्रकारांच्या व्यतिरिक्त हिंदी चित्रपटांतील अश्लील आणि बीभत्स स्वरूपाचे वर्तन असणार्‍या एखाद्या गाण्यावर विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी यांचे नृत्य बसवले जाते. काही वेळा तर अगदी चिमुकल्या, म्हणजे ५ – ६ वर्षे वयोगटांतील मुलांनाही त्यावर नाचावे लागते. इतक्या लहानग्यांना तर गीतातील शब्दांच्या बोलांचे आकलन होणे, ही तर दूरचीच गोष्ट आहे ! त्या मुलांच्या आई-वडिलांनाही आपले पाल्य ‘अशा’ गाण्यावर नाचले, याचीच प्रौढी वाटत असते.

ते त्याचे छायाचित्र काढण्यात मग्न असतात. हे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्याविषयी कुणालाही काही आक्षेपार्ह वाटत नाही, हे त्यामागील दुर्दैव आहे ! काही वेळा मोठ्या वयाच्या विद्यार्थ्यांचेही अशाच स्वरूपात नृत्य बसवले जाते. त्यांना ‘अश्लील’, ‘बीभत्स’, ‘अंगविक्षेप’, ‘मादक’ अशा सर्वच नृत्यप्रकारांमागील अर्थ समजत असतो. त्या गाण्यांचे बोल कोणत्या अर्थाचे आहेत किंवा त्यांमागील द्विअर्थ काय आहे, याचीही त्यांना समज असते. अशा गाण्यांवर नृत्य करण्यातून त्यांनी भविष्यात अश्लील वर्तन केल्यास त्याला उत्तरदायी कोण ? शाळा कि पालक ? ‘दोघेही तितकेच उत्तरदायी आहेत’, असे म्हणता येईल ! कारण शाळेतील शिक्षकांनी नृत्य निवडण्याविषयी काही धोरणे आखायला हवीत. प्रत्येक नृत्याविष्काराच्या माध्यमातून हिंदु संस्कृती आणि परंपरा यांचे जतन अन् संवर्धन होत आहे ना, हे पहायला हवे. जग ज्या अनैतिकतेच्या मार्गावर धावत आहे, त्या मार्गाकडे न नेता विद्यार्थ्यांना खर्‍या अर्थाने सुजाण करणे, हे शिक्षकांचे नैतिक कर्तव्य आहे. अश्लील आणि उत्तेजक नृत्यांमध्ये सहभागी होण्यापासून पालकांनीही मुलांना वेळीच रोखायला हवे. वेळप्रसंगी पालकांनी शिक्षकांची कानउघाडणी करायला हवी.

एका शाळेत काही विद्यार्थ्यांनी एका भुताच्या गाण्यावर नृत्य केले होते. त्यांची तोंडे भुताप्रमाणे रंगवण्यात आली होती आणि त्यांनी भुताप्रमाणे वेशभूषा परिधान केली होती. अशी विकृत पात्रे देऊन मुलांना नृत्य करण्यास सांगून शिक्षक काय साध्य करत आहेत ? शाळा हे ज्ञान मंदिर आहे. त्या स्थळाचे पावित्र्य टिकवून ठेवणे, हे सर्वस्वी शिक्षकांचे दायित्व आहे. हे लक्षात घेतल्यासच ज्ञानमंदिरातून प्रज्ञावंत निर्माण होतील.

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.