अहिल्यानगर शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारे थडगी त्वरित हटवावीत !

कारवाई करा अन्यथा दर्ग्यासमोर हनुमान मंदिर उभारण्याची सकल हिंदु समाजाची चेतावणी !  

(थडगी म्हणजे मुसलमानांचा मृतदेह पुरल्याचे ठिकाण)

निवेदन देताना हिंदुत्वनिष्ठ

अहिल्यानगर – शहरातील मुख्य रहदारीच्या रस्त्याच्या मध्यभागी मुसलमानांच्या थडग्यांमुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे. माळीवाडा, चितळे रोड, बालिकाश्रम रोड अशा भागांमध्ये रस्त्यांच्या मध्यभागी थडगी उभारण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. येत्या ८ दिवसांत कारवाई न झाल्यास सदर ठिकाणी हनुमान मंदिर उभारू, अशी चेतावणी सकल हिंदु समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन हिंदुत्वनिष्ठ नेते सागर बेग यांच्यासह हिंदु समाज बांधवांच्या वतीने मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना देण्यात आले.

रस्त्यांच्या मध्ये असलेल्या धार्मिक स्थळांविषयी कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे रस्त्याच्या मध्यभागी वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या थडग्यांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली, तसेच नगर शहरातील सकल हिंदुत्वनिष्ठ समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिका केवळ मंदिरांवरच कारवाई करते ! – सागर बेग, हिंदुत्वनिष्ठ नेते

या वेळी सागर बेग म्हणाले की, महापालिका केवळ मंदिरांवरच कारवाई करते. सिद्धार्थनगर येथील मंदिर अडथळा ठरत नसतांनाही हटवण्यात आले. त्यामुळे महापालिकेने आता या अनधिकृत थडग्यांवर कारवाई करावी अन्यथा आम्ही या थडग्यांसमोर रस्त्यावरच मंदिरे बांधू, अशी चेतावणी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अवैध पशूवधगृहे आहेत, ती पाडण्यात यावीत, असे पत्र पोलिसांनी आयुक्तांना दिलेले आहे. त्यावरही आयुक्तांनी अजून कारवाई केलेली नाही.

संपादकीय भूमिका

हिंदूंना अशी चेतावणी द्यावी लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद ! हिंदुत्वनिष्ठांनी अशी कृती करण्यापूर्वीच प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, हीच अपेक्षा !