कुंभक्षेत्रातील मुतार्‍या उघड्या : पुरुषांना करावी लागत आहेत उघड्यावर लघुशंका !

उघड्यावर असलेल्या मुतार्‍या

प्रयागराज, ८ जानेवारी (वार्ता.) – प्रयागराज मेळा प्राधिकरणाकडून कुंभक्षेत्रात येणार्‍या भाविकांसाठी मुतार्‍यांची व्यवस्था करण्यात आली आहे; मात्र शेकडो मुतार्‍या उघड्या ठेवण्यात आल्याने कुंभमेळ्यात पुरुषांना उघडड्यावर लघुशंका करावी लागत आहे. कुंभमेळ्यासारख्या धार्मिक ठिकाणी ही स्थिती शोभनीय नाही.

या सर्व मुतार्‍या कुंभमेळ्यात वर्दळीच्या ठिकाणी आहेत. मुतार्‍यांपुढे रस्ते, दुकाने असल्याने सर्वत्र भाविकांची कायमच वर्दळ असते. त्यामुळे या मुतार्‍यांना किमान आडोशासाठी कापड लावणे अपेक्षित आहे. वर्ष २०२४ मध्ये झालेल्या माघ कुंभमेळ्याच्या वेळी प्रशासनाने उभारलेल्या मुतार्‍यांना आडोशासाठी कापड लावले होते; मात्र या वेळी तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे भर गर्दीमध्ये उघड्यावर अनेकजण लघुशंका करत असतांनाचे चित्र आढळून येत आहे. प्रशासनाने या सर्व मुतार्‍यांना आडोशाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.