प्रयागराज, ८ जानेवारी (वार्ता.) – कुंभमेळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटर वेंडिग’ (पाणी देणार्या) यंत्रांची ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याला ‘वॉटर ए.टी.एम्.’, असे नाव देण्यात आले आहे. भाविकांना शुद्ध पाणी मिळावे आणि पाण्यासाठी त्यांना वेगळा व्यय करावा लागू नये, या दृष्टीने प्रशासनाने ही सुविधा केली आहे. केवळ १ रुपयाचे नाणे यंत्रात टाकल्यास १ लिटर शुद्ध पाणी (आर्.ओ.) घेता येईल. त्या व्यतिरिक्त क्यू.आर्. कोड (सुविधा उपलब्ध होण्यासाठी डिजिटल कोड) स्कॅन केल्यास त्याद्वारेही पैसे भरून पाणी उपलब्ध होऊ शकेल.
१. कुंभमेळ्यात ३०० ते ५०० मीटर अंतरावर ही यंत्रे बसवण्यात आली आहेत. या यंत्रांमध्ये कूपनलिकेचे पाणी शुद्ध करून ते भाविकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. १२ हून अधिक आस्थापनांनी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात पुढाकार घेतला आहे.
२. येथे पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध होऊ शकत असल्याने प्लास्टिकची बाटली विकत घेण्याचा खर्च तर टळणार आहेच, त्याखेरीज प्लास्टिकमुळे होणारा कचरा आणि पर्यावरणाची हानीही टळू शकेल.
३. २०० हून अधिक ‘वॉटर वेंडिग’ यंत्रे कुंभमेळ्याच्या कालावधीत कार्यरत असणार आहेत.