पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते १८ डिसेंबर या दिवशी सज्जनगड येथील श्री समर्थ रामदासस्वामी यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. सुरेश तथा नाना जाधव उपस्थित होते. श्री समर्थ रामदासस्वामी पादुका प्रचार दौरा आणि भिक्षा फेरी पुण्यात आली असून त्या निमित्त हा पूजाविधी आयोजित केला होता. कार्यक्रमाला श्री रामदासस्वामी संस्थान सज्जनगडचे ‘श्री रामदास स्वामी संस्थान’चे अध्यक्ष आणि अधिकारी भूषण स्वामी, तसेच वेदमूर्ती उपस्थित होते.
समर्थ पादुका प्रचार दौरा आणि भिक्षा फेरी २६ डिसेंबरपर्यंत पुण्ो येथे असणार आहे. कर्म, उपासना, ज्ञान आणि मोक्ष या चतु:सूत्रीवर आधारित कर्मनिष्ठ जीवनप्रणाली या श्रीसमर्थ विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या मुख्य हेतूने रामदासस्वामी संस्थानच्या वतीने प्रतिवर्षी भिक्षा दौरा आयोजित केला जातो. समाजाच्या एकत्रीकरणासाठी उत्सव, महोत्सव साजरे करतांना समाजाच्या प्रत्येक घटकाच्या सहकार्यातून हे साजरे व्हावेत; म्हणून श्रीसमर्थांनी भिक्षेचा दंडक घालून दिला आहे. ३७७ वर्षांनंतरही याची परंपरा कायम आहे.