Shimla Sanjauli Mosque : शिमला : संजौली मशिदीचे ३ अवैध मजले पाडण्यास मशीद समितीकडून आरंभ !

हिंदूंच्या दबावापुढे हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार, महापालिका प्रशासन आणि वक्फ बोर्ड आणि मशीद समिती झुकले !

संजौली मशीद

शिमला (हिमाचल प्रदेश) – येथील संजौली मशिदीचे अवैध बांधकाम पाडण्याचे काम चालू करण्यात आले आहे. मशिदीचे वरचे ३ मजले पाडण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी ५ ऑक्टोबरला दिला होता. संजौली मशीद समितीला हे काम स्वखर्चाने करण्यास सांगण्यात आले आहे. वक्फ बोर्डाची अनुमती घेतल्यानंतर मशीद समितीने २१ ऑक्टोबरला अवैध भाग पाडण्याचे काम हाती घेतले.

शिमल्यातील ही मशीद वर्ष १९४७ पूर्वी बांधण्यात आली होती. तेव्हा तिचे दोनच मजले होते. यानंतर त्यावर आणखी ३ अवैध मजले बांधण्यात आले. या विरोधात १४ वर्षांपासून महापालिका न्यायालयात खटला चालू होता. गेल्या दीड महिन्यापासून हिंदूंनी हे सूत्र लावून धरले. मशिदीविरुद्ध सहस्रो हिंदू एकवटले आणि त्यांनी अवैध बांधकाम पाडण्याची आग्रही मागणी लावून धरली. परिणामी राज्यातील काँग्रेस सरकार, महापालिका प्रशासन आणि मशीद समिती यांना झुकावे लागले. प्रखर हिंदुत्वनिष्ठ कमल गौतम यांच्या नेतृत्वाखाली हे ऐतिहासिक हिंदूसंघटन होऊ शकले.

या प्रकरणी हिमाचल प्रदेशाच्या उच्च न्यायालयातही सुनावणी होणार आहे. स्थानिक लोकांनी ही याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. १४ वर्षांपासून महापालिका न्यायालयात अद्याप निर्णय झालेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मशीद पाडण्याचा आयुक्तांचा आदेशही अंतरिम आहे. ‘उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना लवकरच पूर्ण निर्णय घेण्यास सांगावे’, अशी मागणी हिंदूंनी केली आहे.

मशीद समितीचे अध्यक्ष महंमद लतीफ म्हणाले की, मशीद पाडण्याचे काम चालू केले असून या कामासाठी स्थानिक मुसलमान व्यावसायिकांकडून निधी उभारला जात आहे. महापालिकेच्या आदेशानंतर वक्फ बोर्डाकडूनही त्याची अनुमती घेण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

‘संघे शक्ति कलौ:युगे’नुसार हिंदू संघटित झाले आणि संघटनाची दिशा योग्य असेल, तर काय होऊ शकते?, हे यावरून लक्षात येते.