सिंधुदुर्ग राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या नवीन पुतळ्‍यासाठी ३६ कोटी रुपयांचे प्रावधान !

  • विधीमंडळात ३५ सहस्र कोटी रुपयांच्‍या पुरवणी मागण्‍या सादर !

  • ‘मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी १ सहस्र ४०० कोटी रुपयांचे प्रावधान !

नागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) – राज्‍य विधीमंडळाच्‍या हिवाळी अधिवेशनात १६ डिसेंबर या पहिल्‍या दिवशी संभाव्‍य व्‍यय, नवीन कामे, तसेच अपेक्षित अधिक व्‍यय भागवण्‍यासाठी अतिरिक्‍त प्रावधान यांसाठी एकूण ३५ सहस्र कोटी ७८ लाख ८४ सहस्र ५७ रुपये इतक्‍या रकमेच्‍या पुरवणी मागण्‍या विधानसभेत सादर करण्‍यात आल्‍या. सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील मालवण, राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला होता. आता त्‍याच ठिकाणी भव्‍य दिव्‍य पुतळा उभारण्‍यात येईल, अशी घोषणा तत्‍कालीन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. नवीन पुतळा उभारण्‍यासाठी ३६ कोटी ५१ सहस्र २४ रुपयांचे प्रावधान या पुरवणी मागण्‍यांत करण्‍यात आले आहे.

१. मुंबईत सुसज्‍ज आमदार निवासस्‍थान ‘मनोरा’ उभारणीच्‍या व्‍ययाच्‍या मागणीचाही या पुरवणी मागण्‍यांत समावेश आहे. एकूण २८ खाती आणि महाराष्‍ट्र विधीमंडळ सचिवालय यासंबंधीच्‍या कामांसाठी व्‍यय आणि प्रावधान यांचा या सूचीत समावेश आहे.

२. राज्‍यातील २ कोटींहून अधिक गरजू महिलांनी आवेदन केलेल्‍या आणि विधानसभा निवडणुकीतील प्रचारात अत्‍यंत महत्त्व प्राप्‍त झालेल्‍या एकूण मतदानावरही ज्‍या योजनेचा प्रभाव दिसून आला, त्‍या ‘मुख्‍यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी १ सहस्र ४०० कोटी रुपये इतके अतिरिक्‍त प्रावधान करण्‍याचे ठरवण्‍यात आले आहे, तसेच ‘पंतप्रधान आवास घरकुल योजने’साठी १ सहस्र २५० कोटी रुपयांचे अतिरिक्‍त प्रावधान यासंबंधीच्‍या मागणीचाही समावेश आहे.

मुख्‍यमंत्री अन्‍नपूर्णा योजनेसाठी ५१४ कोटी अतिरिक्‍त निधीचे प्रावधान करण्‍याचे ठरवण्‍यात आले आहे. महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतच्‍या कामासाठी १०० कोटी रुपये अतिरिक्‍त निधीची मागणी आहे. विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांसाठी शालांत परीक्षापुढील शैक्षणिक शिष्‍यवृत्तीसाठी १५० कोटी रुपये, कोरोना महामारीत मृत्‍युमुखी पडलेल्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांच्‍या कुटुंबाला सानुग्रह अनुदानासाठी ६० कोटी रुपये, धनगर समाजातील विद्यार्थ्‍यांना इंग्रजी माध्‍यमांच्‍या शाळेत शिक्षणासाठी ६० कोटी रुपये अतिरिक्‍त प्रावधानाची मागणी करण्‍यात आली आहे.