नागपूर – येथील हिवाळी अधिवेशनांचा आढावा घेणारा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ साकारण्यात यावा, येथील तिन्ही पिढ्यांचा सहभाग असलेले सशक्त संपादक मंडळ या ग्रंथाची दिलेल्या मुदतीत अभ्यासपूर्ण निर्मिती करील, असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी व्यक्त केला. येथील विधानभवनातील राष्ट्रकुल समिती सभागृहात हिवाळी अधिवेशनाचे वृत्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक यांची विशेष बैठक उपसभापती डॉ. गोर्हे यांनी निमंत्रित केली होती. तेव्हा त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत ‘विधान परिषदेतील ऐतिहासिक पाऊलखुणा’ या ग्रंथाच्या परिपूर्ण निर्मितीसाठी ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांच्या अध्यक्षतेखाली संपादकीय मंडळ निश्चित करण्याचा निर्णय सर्वांच्या वतीने घेण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक यांना ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाच्या प्रती देऊन उपसभापती डॉ. गोर्हे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.