‘पती-पत्नीत देवाण-घेवाण हिशोब कसे निर्माण होतात ? ते कधी पूर्ण होतात ? त्यात घडणारी सूक्ष्म प्रक्रिया काय असते ?, इत्यादी प्रश्नांची उत्तरे देवाच्या कृपेमुळे मला प्राप्त झाली आहेत. ती पुढे दिली आहेत.
या लेखाचा काही भाग आपण १६ डिसेंबर या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/863873.html
२. साधना न करणार्या पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब
२ उ. पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब निर्माण होण्याची प्रक्रिया : पती-पत्नीच्या वागण्यातून एकमेकांना सुख किंवा दुःख भोगावे लागते. त्या वेळी त्याच्या चांगल्या किंवा वाईट स्मृती त्या दोघांच्या चित्तात सूक्ष्मरूपाने निर्माण होतात. ‘पतीने पत्नीशी चांगले किंवा वाईट वर्तन करणे’, हे एक कर्म असते. कर्माच्या सिद्धांतानुसार त्याचे चांगले किंवा वाईट फळ निर्माण होते.
पतीने पत्नीला दुःख दिले, तर पतीच्या चित्तात त्या कर्माचे फळ, म्हणजे पाप सिद्ध होते आणि पतीच्या त्या वाईट कर्मामुळे पत्नीच्या चित्तात दुःखाची स्मृती सिद्ध होते. पत्नीच्या चित्तातील ही स्मृती बाहेर पडल्याविना तिचे चित्त शांत होत नाही. ही स्मृती त्याच जन्मात पत्नीकडून राग किंवा अन्य स्वरूपात पतीवर व्यक्त झाल्यास पती आणि पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब त्याच जन्मात पूर्ण होऊ शकतो, तसे न झाल्यास पत्नीला झालेल्या दुःखाचा हिशोब फेडण्यासाठी त्या पती-पत्नीला परत जन्म घ्यावा लागतो.
२ ऊ. पती-पत्नीच्या चित्तातील बहुतेक भाग हा गत आणि चालू जन्मांतील सुख-दुःखाच्या स्मृतींनी भरलेला असणे : ‘पती-पत्नीने एकमेकांची सेवा करणे आणि एकमेकांमुळे होणारे सुख-दुःख’, ही प्रक्रिया त्यांच्या जीवनात अव्याहतपणे चालू असते. पती-पत्नीच्या प्रत्येक कर्मामध्ये अहं असल्याने त्याचे चांगले किंवा वाईट फळ त्यांच्या चित्तात सिद्ध होते. त्यामुळे दोघांच्या चित्तातील बहुतेक भाग हा गत आणि चालू जन्मांतील स्मृतींनी भरलेला असतो.
२ ए. पती-पत्नीतील अनेक जन्मांचा प्रवास त्यांच्या कर्मांनुसार ‘नाते’, ‘लिंग’, ‘वय’ आणि ‘योनी’ यांनुसार पालटत जाणे
२ ए १. नात्यात पालट होणे : पती-पत्नीच्या जीवनात दोघांचे कर्म भिन्न भिन्न असते. त्यांच्यातील शारीरिक आणि मानसिक संबंधात सतत चढ-उतार होत असतात. त्यामुळे चालू जन्मातील पती-पत्नी हे पुढील जन्मात ‘भाऊ-बहीण, आई-मुलगा किंवा भाऊ-भाऊ’, असे नाते घेऊन जन्माला येऊ शकतात. या नात्यात परत त्यांच्या कर्मांनुसार पालट होतात. काही जन्मांनंतर ते दोघे पूर्वीप्रमाणे पती-पत्नी म्हणून एकत्र येतात.
२ ए २. लिंगात पालट होणे : चालू जन्मात पतीची भावनाप्रधानता अधिक वाढल्यास आणि पत्नीची ती कमी झाल्यास पुढील जन्मात पती हा पत्नीच्या रूपात आणि पत्नी पतीच्या रूपात जन्म घेते.
२ ए ३. वयातील अंतरात पालट होणे : चालू जन्मात पतीच्या मनात, ‘हीच पत्नी मला पुढील जन्मी मिळावी’, अशी इच्छा असल्यास आणि त्यांच्यात देवाण-घेवाण हिशोब शिल्लक असल्यास तो पती मृत्यूनंतर सूक्ष्मरूपाने भुवर्लाेकात किंवा पितरलोकात जातो. त्याच्या पत्नीच्या मनात, ‘हाच पती पुढील जन्मी मिळावा’, अशी इच्छा असल्यास आणि त्यांच्यात देवाण-घेवाण हिशोब शिल्लक राहिल्यास पत्नी मृत्यूनंतर सूक्ष्मरूपाने भुवर्लाेकात किंवा पितरलोकात जाते. त्या वेळी त्या पतीला परत पृथ्वीवर जन्म घेण्याची इच्छा होते आणि तो पृथ्वीवर जन्म घेतो. त्यानंतर पत्नीच्या पतीच्या संदर्भातील स्मृती जागृत अवस्थेत येतात, त्या वेळी तीही पृथ्वीवर जन्म घेते. त्या दोघांची कर्मे भिन्न असल्यामुळे पुढील जन्म घेण्याचा त्यांचा काळही भिन्न असतो. त्यामुळे पती-पत्नी यांच्या वयांमधील अंतर चालू जन्मात पालटलेले असते.
२ ए ४. पुरुष किंवा स्त्रीचा चालू जन्मात विवाह न होण्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण : पती-पत्नीतील पतीचा मृत्यू आधी झाल्यावर मृत्यूनंतर तो भुवर्लाेकात किंवा पितरलोकात जातो आणि तो तिच्या पत्नीची परत भेट होण्यासाठी वाट पहात असतो. पत्नीला मृत्यूनंतर लगेच पुनर्जन्म मिळाला; पण सूक्ष्मलोकात असलेल्या तिच्या पतीला काही कारणास्तव पृथ्वीवर जन्म घेता आला नाही, तर ती स्त्री चालू जन्मात विवाह न करता रहाते. चालू जन्मात तिच्या चित्तात मागील जन्मातील तिच्या पतीविषयीच्या सूक्ष्म जाणिवा असतात. तिला तो पुरुष पती म्हणून न मिळाल्यास तिला अन्य कुठल्याही पुरुषाशी विवाह करण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे ती संपूर्ण जीवन अविवाहित रहाते. मृत्यूनंतर तिचा परत जन्म होतो. त्या वेळी तिचा पूर्वीचा पती सूक्ष्मलोकातून त्याच्या कर्मानुसार पृथ्वीवर जन्म घेतो. कालांतराने त्या स्त्रीसमोर तिच्या पूर्वजन्मीचा पती ‘वर’ म्हणून समोर येतो. तेव्हा तिला वाटते, ‘हाच पुरुष माझ्यासाठी पती म्हणून योग्य आहे.’ पती-पत्नीतील पत्नीचा मृत्यू आधी झाला, तरी वरील प्रक्रिया उलट पद्धतीने घडू शकते.
२ ए ५. योनींमध्ये पालट होणे : चालू जन्मात पती-पत्नीने एकत्रितपणे काही पापकर्मे केली असल्यास त्यांना पुढील जन्म प्राणी किंवा पक्षी यांस्वरूपात मिळतो. त्या त्या जन्मातही ते पती-पत्नी नाग-नागीण, घोडा-घोडी, गाय-बैल, अशा पद्धतीने नवनवीन जन्म घेतात. त्यांची पापकर्मे भोगून संपली की, ते परत मनुष्य योनीत पती-पत्नी म्हणून जन्माला येतात. ही प्रक्रिया त्यांची अव्याहतपणे चालू असते.
३. पतीने पत्नीला त्रास दिल्यास निर्माण होणारा देवाण-घेवाण हिशोब
‘पतीने पत्नीचा आयुष्यभर छळ करणे, पतीच्या छळाने कंटाळून पत्नीने आत्महत्या करणे, पतीने पत्नीचा खून करणे, तसेच पतीने अन्य स्त्रीशी संबंध ठेवल्याने पत्नीला दुःख भोगावे लागणे’, अशा प्रसंगी पत्नीच्या मनात पतीविषयी प्रचंड राग, त्वेष आणि वैर निर्माण होऊ लागते. त्यामुळे अशा पत्नीचा मृत्यू झाल्यावर ती स्त्री भूत किंवा राक्षशीण होण्याची शक्यता असते. अशा वेळी ती पत्नी पतीची वैरिणी होते; म्हणजे वैर हा तिचा स्वभाव होतो. अशी पत्नी, म्हणजे वाईट शक्ती पतीला पुढीलप्रकारे त्रास देऊ शकते.
३ अ. अप्रत्यक्षपणे त्रास देणे : पतीने त्रास दिल्याने मृत्यूनंतर पत्नीचे सूडभावनेमुळे वाईट शक्तीत रूपांतर होऊ शकते. ती वाईट शक्ती पतीच्या चालू आणि पुढील जन्मांत सूक्ष्मातून सोबत रहाते. ती वाईट शक्ती ‘पतीला जीवनात कुठल्याही प्रकारे सुख किंवा यश मिळणार नाही’, यासाठी प्रयत्नशील असते. वाईट शक्तीने दिलेल्या त्रासांमुळे ‘पतीच्या कौटुंबिक जीवनात कलह निर्माण होणे, पतीचे मन सदैव अस्वस्थ आणि अशांत रहाणे अन् नवनवीन शारीरिक समस्या निर्माण होणे, त्याचे चालू किंवा पुढील जन्मातील पत्नीशी न पटणे’ इत्यादी समस्या निर्माण होतात.
३ आ. पतीच्या शरिरात सूक्ष्मातून प्रवेश करून त्याचे नियंत्रण मिळवणे : ती वाईट शक्ती पतीच्या शरिरात सूक्ष्मातून प्रवेश करून त्याचे नियंत्रण मिळवू शकते. त्यामुळे पतीला अनेक जन्मांमध्ये प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे पतीला जीवन नकोसे होते. वाईट शक्तीच्या प्रभावामुळे त्याचे स्वतःच्या जीवनावर नियंत्रण नसते. वाईट शक्तीच्या इच्छेनुसार पतीची प्रत्येक कृती घडत असते.
३ इ. पतीने चालू किंवा पुढील जन्मात विवाह केलेल्या स्त्रीच्या शरिरात प्रवेश करून त्रास देणे : पतीने पत्नीच्या मृत्यूनंतर विवाह केल्यास अथवा पुढील जन्मात त्याच्या जीवनात पत्नी म्हणून अन्य स्त्री आल्यास वाईट शक्ती त्या स्त्रीच्या शरिरात प्रवेश करते. त्यामुळे पती-पत्नीत मोठ्या प्रमाणात कलह निर्माण होतात, पतीला पत्नीकडून सुख न मिळता दुःख मिळते. परिणामी पतीचे संपूर्ण जीवन दुःखी होते.
३ ई. पतीच्या घरी मूल म्हणून जन्माला येऊन त्रास देणे : वाईट शक्तीला पतीच्या किंवा त्याच्या पत्नीच्या शरिरात प्रवेश करता न आल्यास वाईट शक्ती त्यांच्या घरी मुलगा किंवा मुलगी म्हणून जन्माला येते. ते अपत्य आयुष्यभर त्या पती-पत्नीला त्रास देते. त्यामुळे पती-पत्नीचे जीवन दुःखमय होते.
३ उ. देवाण-घेवाण हिशोब पूर्ण झाल्यावर वाईट शक्ती पतीच्या जीवनातून निघून जाणे : वाईट शक्ती देवाण-घेवाण हिशोबानुसार पतीचा एक किंवा अनेक जन्म छळ करते. जेव्हा हा देवाण-घेवाण हिशोब पूर्ण होतो, तेव्हा त्या वाईट शक्तीला समाधान मिळून तिचे मन शांत होते आणि ती त्या पतीच्या जीवनातून निघून जाते.
पत्नीने वरीलप्रकारे पतीला त्रास दिल्यास हीच प्रक्रिया उलट पद्धतीने घडते.
४. पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब साधनेच्या अभावी कधीच पूर्ण न होणे
पत्नीने पतीची सेवा केली, तेवढीच सेवा पतीने पत्नीची करायला हवी, तसेच पतीने पत्नीला जेवढे सुख-दुःख दिले, तेवढेच पत्नीने पतीला सुख-दुःख द्यायला हवे, तरच दोघांमधील देवाण-घेवाण हिशोब पूर्ण होतो; कारण ‘साधना करत नसणे आणि अहं असणे’, यांमुळे पती-पत्नीला प्रत्येक कर्माचे फळ भोगावे लागते.
वरील सर्व गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब प्रत्येक जन्मी अपूर्ण रहातो. त्यामुळे पुढे पती-पत्नीतील जन्म-मृत्यूचा एकत्रित प्रवास अव्याहतपणे चालूच रहातो.
५. साधना करणार्या पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब
५ अ. साधना न करणारे पती-पत्नी हे साधनेकडे वळण्यामागील कारण : आधीच्या युगांत आरंभी पती-पत्नीला एकमेकांपासून पुष्कळ सुख मिळत होते. त्यांना पुढील काही जन्मांमध्ये एकमेकांपासून सुखाच्या समवेत दुःखही मिळाले. त्यानंतर काही काळाने दोघांना एकमेकांपासून मोठ्या प्रमाणात दुःखच होऊ लागले. अशा वेळी एका जन्मात पती-पत्नीच्या मनात विचार येतात, ‘आता पुरे. यातून आपण सुटले पाहिजे. साधनेविना काही पर्याय नाही.’ त्या वेळी पती-पत्नीच्या जीवनात त्या किंवा पुढील जन्मात गुरु येतात आणि ते पती-पत्नीला साधनेचा मार्ग दाखवतात.
५ आ. पती-पत्नीने साधना केल्याचा लाभ
१. पती-पत्नीने जोमाने साधना केल्यास चालू जन्मात त्या दोघांचे मागील जन्मांतील देवाण-घेवाण हिशोब लवकर पूर्ण होण्यास साहाय्य होते.
२. नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होणे टाळता येऊ शकते.
३. जीवनात काही चुका झाल्यास त्यावर प्रायश्चित्त घेतल्यास साधक पती-पत्नीच्या चित्तात आमूलाग्र पालट होण्यास साहाय्य होते.
४. साधक पती-पत्नीने सतत साधना करत राहिल्याने त्यांचे एकमेकांविषयीचे अपेक्षांचे प्रमाण न्यून होते आणि निरपेक्षता हा गुण वृद्धींगत होतो. त्यामुळे संसारातील विविध विषयांतून मायेचा गुंता निर्माण न होता त्यांची साधना सुरळीतपणे चालू रहाण्यास साहाय्य होते.
५. साधक पती-पत्नीचे सतत देवाचे स्मरण चालू असल्यास विविध कठीण प्रसंगांतही त्यांना स्थिर आणि आनंदी रहाणे जमू लागते.
६. पती-पत्नीने साधना केल्यामुळे त्यांना गुरु आणि देवता यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्यामुळे त्यांना असह्य झालेले प्रारब्ध सुसह्य होण्यास साहाय्य मिळते.
७. साधक पती-पत्नीची जन्म-मृत्यूच्या दीर्घ फेर्यांतून कायमची सुटका होऊन जलद गतीने मोक्षाकडे वाटचाल चालू होते आणि दोघांच्या जीवनाचे सार्थक होते.
५ इ. साधक पती-पत्नीने संसार करतांना ‘साधना’ हा केंद्रबिंदू न ठेवल्यास होणारी हानी : साधक पती-पत्नीने संसार करतांना ‘साधना’ आणि ‘ईश्वरप्राप्ती’ हे केंद्रबिंदू न ठेवल्यास चालू जन्मात त्यांच्यात नवीन देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतात आणि ते फेडण्यासाठी दोघांना पुनर्जन्म प्राप्त होतो.’
(समाप्त)
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.७.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |