अश्वत्थ मारुतीच्या मंदिराविषयी आलेल्या अनुभूती

‘साधारण ४ मासांपूर्वी आम्ही केरी, फोंडा येथे कुलदेवीच्या मंदिरात गेलो होतो. तेथील पुजार्‍यांशी बोलतांना, त्यांनी मंदिरापासून साधारण २०० मीटर अंतरावर असलेल्या अश्वत्थ मारुतीच्या मंदिराची महती सांगितली. या मंदिरात उजवीकडे दक्षिणाभिमुख मारुतीची मूर्ती, तर डावीकडे विधीवत स्थापन केलेला अश्वत्थ वृक्ष आहे. ‘हे स्थान जागृत असून येथील अश्वत्थ मारुतीची परिक्रमा केल्यास लाभ होतो’, असे त्यांनी सांगितले. आम्ही कुलदेवी श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिरात अनेकदा जातो; परंतु या अश्वत्थ मारुतीचे दर्शन घेण्याचा योग आजपर्यंत आला नव्हता. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते हेच खरे ! प्रत्येक सप्ताहातील सोमवार आणि बुधवार हे दोन दिवस याप्रमाणे २१ दिवस अश्वत्थ वृक्षाला २१ प्रदक्षिणा घालण्याचा निश्चय करून आम्ही आषाढी एकादशी, म्हणजे १७.७.२०२४ या दिवशी बुधवारी परिक्रमेला आरंभ केला. या कालावधीत आम्हाला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पोंडा गोवा येथील श्री मारुती मंदिर

१. चांगल्या अनुभूती

१ अ. मारुतिरायांविषयी आलेल्या अनुभूती

१ अ १. परिक्रमा चालू असतांना प्रत्येक परिक्रमेच्या दिवशी मारुतिरायाने आम्हाला वानराच्या रूपात दर्शन दिले.

सौ. श्रुति सहकारी

१ अ २. बालमारुतीने वानराच्या पिल्लाच्या रुपात दर्शन देणे आणि त्याला पाहून हनुमान चालिसेतील ओळींचे स्मरण होणे : १८.९.२०२४ या दिवशी मंदिरात जायला निघण्यापूर्वी मी सहज खिडकीबाहेर पाहिले. तेव्हा घरालगत असणार्‍या वृक्षावरील एका वानराच्या पिल्लाने आमचे लक्ष वेधून घेतले. सहसा वानराची पिल्ले त्यांच्या आईच्या आसपासच खेळत असतात; परंतु हे पिल्लू एकटेच खेळत-बागडत होते. ते अत्यंत तेजस्वी दिसत होते. त्याच्या केसांचा रंग सोनेरी भासत होता आणि ते इतर वानरांपेक्षा फार वेगळे वाटत होते. त्या पिल्लाला पाहिल्यावर मला हनुमान चालिसातील जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहुँ लोक उजागर ।

अर्थ : ‘श्री हनुमान जी की जय हो ! आपका ज्ञान और गुण अथाह है । हे कपीश्वर ! आपकी जय हो !  स्वर्ग लोक, भूलोक और पाताल लोक इन तीनों लोकोंमें आपकी कीर्ति है ।’

या ओळी आठवल्या आणि ‘बालमारुतिरायानेच आम्हाला दर्शन दिले’, असे वाटले.

१ अ ३. २३.९.२०२४ या दिवशी भल्या पहाटे घराशेजारीच वानराचा ध्वनी ऐकू आला, तसेच परिक्रमेहून येतांना एक वानर आमच्या गाडीसमोरून उड्या मारत गेले.

१ अ ४. मारुतिरायाने लहान मुलाच्या रूपात दर्शन देणे

श्री. नितीन सहकारी

१ अ ४ अ. एका लहान मुलाने त्याच्या बाललीलांनी श्री. आणि सौ. सहकारी यांचे लक्ष वेधून घेणे : २५.९.२०२४  हा परिक्रमेचा शेवटचा दिवस होता. ‘आज मारुतिराया कोणत्या रूपात दर्शन देणार ?’, याची उत्कंठा आमच्या मनात होती. नेहमीप्रमाणे घराशेजारील झाडावर किंवा वाटेतही त्याने दर्शन दिले नाही. अंदाजे १२.३० वाजता आम्ही देवळात पोचलो. देवळाच्या बाहेरच एक ८ – १० वर्षांचा मुलगा देवळाचे लोखंडी फाटक उघडण्याचा प्रयत्न करत होता; परंतु उंची अल्प असल्याने त्याला ते जमत नव्हते. मी फाटक उघडून दिल्यावर तो देवळात गेला आणि उड्या मारून उंचावर टांगलेल्या घंटा वाजवण्याचा प्रयत्न करू लागला. श्री. नितीन यांनी त्याला उचलून घेतले आणि घंटा वाजवण्यास साहाय्य केले. त्यामुळे त्याला पुष्कळ आनंद झाला आणि तो उड्या मारू लागला. त्यानंतर अनुमाने ५ – ६ मिनिटे त्याच्या बाललीलांनी आम्हा दोघांना आनंदात न्हाऊ घातले. त्या वेळी मला यशोदामैया आणि बाळकृष्णाची आठवण झाली. प्रदक्षिणा घालतांना तो कधी आमच्या पुढे, तर कधी मागे जात होता. अवचित पुढे जाऊन लपतही होता. त्याचे मुखाने ‘हुं..हुं’ असा आवाज काढत उड्या मारणे सतत चालूच होते. या कालावधीत मी त्याला एक केळे दिले आणि ते त्याने आनंदाने खाल्ले.

१ अ ४ आ. प्रदक्षिणेच्या मार्गात असलेल्या लाकडी देव्हार्‍यात तो लहान मुलगा आशीर्वादाच्या मुद्रेत बसल्यावर ‘मारुतिरायांचे दर्शन झाले’, असे वाटून श्री. आणि सौ. सहकारी यांचा भाव जागृत होणे : आमच्या ६ प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत त्याच्या या लीला चालल्या. सातवी प्रदक्षिणा चालू झाली, तेव्हा तो अकस्मात् प्रदक्षिणेच्या मार्गात असलेल्या लाकडी देव्हार्‍यात मांडी घालून बसला. त्याचा उजवा हात आशीर्वाद मुद्रेत होता, तर दुसरा हात देण्याच्या मुद्रेत होता. मुखावर हास्य आणि आनंद असे संमिश्र भाव होते. त्या वेळी ‘त्या मुलाच्या रूपात साक्षात मारुतिरायाच आम्हा उभयतांच्या भेटीला आले आहेत’, असे वाटून आमचा भाव जागृत झाला. आम्ही दोघांनी त्याला भक्तीभावाने नमस्कार केला. अशाप्रकारे आमच्या ७ प्रदक्षिणा पूर्ण झाल्या. आता त्याला जायचे होते; पण फाटक उघडता येत नसल्याने तो कठड्यावर चढला होता. श्री. नितीन यांनी त्याला फाटक उघडून दिले. त्यानंतर तो निघून गेला.

१ आ. परिक्रमेदरम्यान अश्वत्थ वृक्षाची महती सांगणार्‍या श्लोकाची प्रचीती येणे 

त्या मंदिरात अश्वत्थ वृक्षाची महती सांगणार्‍या श्लोकाची प्रत टांगलेली होती. आम्ही परिक्रमा करतांना या श्लोकाचे उच्चारण करायचो.

मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणे ।
अग्रतः शिवरूपाय वृक्षराजाय ते नमः ।।

अर्थ : (ज्याच्या) मुळाशी ब्रह्मदेव, मध्ये श्रीविष्णु आणि अग्रावर शिव यांचा वास असतो, अशा वृक्षराज अश्वत्था, तुला नमस्कार असो.

१ आ १. ब्रह्मतत्त्वाची अनुभूती : परिक्रमेच्या पहिल्या दिवशी मला अश्वत्थाच्या मुळाशी ऋषींप्रमाणे वाटणार्‍या तेजस्वी पुरुषाचे दर्शन झाले.

१ आ २. विष्णुतत्त्वाची अनुभूती : परिक्रमेच्या प्रत्येक दिवशी परिक्रमा चालू असतांना अधूनमधून मोराचा केकारव ऐकू यायचा. याद्वारे कृष्णाची, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या श्रीविष्णूच्या अस्तित्त्वाची साक्ष मिळायची.

१ आ ३. शिवतत्त्वाची अनुभूती : परिक्रमेच्या २१ व्या दिवशी, म्हणजे बुधवार, २५.९.२०२४ या दिवशी बालकाच्या रूपातील बालमारुतीने अश्वत्थ मारुतीला शिवमंदिरात घालतात, त्याप्रमाणे अर्धप्रदक्षिणा घातली. या प्रकारे त्या स्थळी शिवतत्त्वाची साक्ष मिळाली.

१ आ ४. श्लोकातील प्रत्येक चरणाची अनुभूती परिक्रमेच्या त्या त्या टप्प्यांवर येणे : या तीन अनुभूतींद्वारे अश्वत्थ वृक्षाच्या श्लोकाच्या सत्यतेची प्रचीती आली. ब्रम्हदेवाचे (ऋषींप्रमाणे वाटणार्‍या तेजस्वी पुरुषाचे) दर्शन ‘मूलतो’, म्हणजेच परिक्रमेच्या मुळाशी (पहिल्या दिवशी) झाले. मोराच्या केकारवाच्या रूपात श्रीविष्णूच्या अस्तित्वाची प्रचीती ‘मध्यतो’ म्हणजे परिक्रमेच्या मधल्या दिवसात आली. आणि परिक्रमेच्या ‘अग्र’ म्हणजेच २१ व्या दिवशी बालमारुतीने घातलेल्या अर्धप्रदक्षिणेच्या रूपात शिवतत्त्वाच्या अस्तित्वाची साक्ष मिळाली.

१ इ. अन्य अनुभूती : प्रत्येक परिक्रमेच्या वेळी एक कुत्रा देवळाच्या पायर्‍यांवर येऊन बसायचा आणि आमची परिक्रमा पूर्ण झाल्यावर तो निघून जायचा. तो आमच्याकडे अशा प्रकारे पहायचा जणूकाही याला काही सांगायचे आहे. त्याला पाहिल्यावर ‘ते दत्ताचे श्वान आहे’, असा आम्ही भाव ठेवायचो. शेवटच्या दोन दिवशी आम्ही त्या कुत्र्यासाठी बिस्कीटे घेऊन गेलो. आम्ही काही वेळ थांबून त्याची वाट पाहिली; परंतु तो आलाच नाही. आमच्या अल्पमतीनुसार ‘तो आमच्याकडे खाऊसाठी पहात आहे’, असे वाटून आम्ही त्याला खाऊ घेऊन गेलो; परंतु त्याला त्याची आवश्यकता नव्हती. ‘एकदा का एखाद्याला देव मानले की, आपण त्यानुसार भाव ठेवायला हवा. तिथे आम्ही न्यून पडलो’, असे आम्हाला वाटले. ‘देवाला कशाचीच उणीव नसते, तो केवळ भावाचा भुकेला असतो’, हे यातून शिकायला मिळाले.

या दैवी अनुभूती दिल्याबद्दल ईश्वरचरणी आणि गुरूचरणी कोटीशः कृतज्ञता !

२. आलेल्या अडचणी

२ अ. मागून कुणीतरी धक्का दिल्याप्रमाणे खाली पडणे : अश्वत्थ मारुति मंदिराचे गर्भगृह मंडपापासून एक पायरी उंचावर आहे आणि तिथेच परिक्रमेला जागा आहे. एके दिवशी परिक्रमा पूर्ण झाल्यावर मी (सौ. श्रुति सहकारी) खाली मंडपात उतरून प्रार्थना करत होते. त्या वेळी मला मागून कुणीतरी ढकलल्याप्रमाणे मी खाली पडले. माझे दोन्ही गुडघे आणि हात जमिनीला टेकले. मारुतिरायाच्या आणि अश्वत्थ देवतेच्या कृपेने मला लागले नाही.

२ आ. परिक्रमा चालू असतांनाच सौ. सहकारी यांच्या आईचा अस्थिभंग झाल्याने परिक्रमा करण्यास अडचणी येऊ लागणे : परिक्रमा चालू असतांना माझी आई (सौ. श्रुति सहकारी यांच्या आई, वय ८६ वर्षे) घसरून पडली आणि तिचा अस्थिभंग झाला. त्या वेळी नेमके तिच्या समवेत कुणी नसल्याने तिच्या साहाय्यासाठी जावे लागे. या परिक्रमा दुपारच्या जेवणाआधी पूर्ण करायच्या असल्याने थोडी धावपळ व्हायची. एवढ्या अडचणी येऊनही त्या पूर्ण करण्याची ओढ वाटायची आणि त्यातून निराळाच आनंद अनुभवता आला.’

– सौ. श्रुति सहकारी (वय ५८ वर्षे) आणि श्री. नितीन सहकारी (वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (७.१०.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक