‘बहुधा पत्नीच्या आधी पतीचे निधन होते. तेव्हा त्याच्या पत्नीने त्याची सेवा केलेली असते. याउलट पुढे पत्नी आजारी पडल्यावर त्याला तिची सेवा करता येत नाही. त्यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब असाच असतो का ?’ – डॉ. आठवले (८.७.२०२३)
‘पती-पत्नीत देवाण-घेवाण हिशोब कसे निर्माण होतात ? ते कधी पूर्ण होतात ? त्यात घडणारी सूक्ष्म प्रक्रिया काय असते ?, इत्यादी प्रश्नांची उत्तरे देवाच्या कृपेमुळे मला प्राप्त झाली आहेत. ती पुढे दिली आहेत.
१. विवाहाच्या वेळी पुरुष स्त्रीपेक्षा वयाने अधिक असण्यामागील कारण
पुरुषांमध्ये स्त्रियांच्या तुलनेत भावनाप्रधानता अल्प असते आणि सारासार बुद्धीमत्ता अधिक असते. तो कुटुंबाचा प्रमुख असतो. ‘कुटुंबव्यवस्था सुरळीतपणे चालावी’, यासाठी सनातन धर्मानुसार विवाहाच्या वेळी पुरुषाचे वय स्त्रीपेक्षा अधिक असते. त्यामुळे बहुतेक वेळा पतीचा मृत्यू पत्नीच्या आधी होतो. आयुष्यभर पत्नीने पतीची सेवा केलेली असते; परंतु पत्नी पुढे रुग्णाईत झाल्यावर पतीला तिची सेवा करता येत नाही. अशा प्रसंगी त्यांच्यातील देवाण-घेवाण हिशोबाच्या संदर्भातील विश्लेषण पुढे दिले आहे.
१ अ. पूर्वी पत्नी पतीला ‘देव’ किंवा ‘गुरु’ मानत असल्याने त्यांच्यात देवाण-घेवाण हिशोब निर्माण न होता पत्नीला मृत्यूनंतर मुक्ती मिळत असणे : पूर्वीच्या स्त्रिया पतीव्रता होत्या. त्या पतीची सेवा ‘देव’ किंवा ‘गुरु’ या भावाने निःस्वार्थपणे करत होत्या. त्यातून अशा स्त्रियांची आध्यात्मिक प्रगती व्हायची. पत्नीने मनोभावे केलेल्या पतीच्या सेवेमुळे तिला देवाचा आशीर्वाद प्राप्त होऊन ती पतीच्या देवाण-घेवाण हिशोबातून मुक्त होत होती आणि ती मृत्यूनंतर जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त व्हायची. पती पत्नीकडे देवी रूपात पहायचा. त्यामुळे तोही मृत्यूनंतर मुक्त व्हायचा.
१ आ. कलियुगात पती-पत्नी साधना करत नसल्याने पतीचा मृत्यू आधी झाला, तरी पती-पत्नीची इच्छा, अपेक्षा आणि अहं यांमुळे त्यांच्यात देवाण-घेवाण हिशोब शिल्लक राहिलेला असणे : कलियुगात बहुतेक पती-पत्नी साधना करत नाहीत. त्यामुळे पत्नीला पतीच्या सेवेबाबत कर्तेपणा, म्हणजे अहं असतो, तसेच तिला पतीकडून बर्याच अपेक्षाही असतात. पतीच्या मृत्यूनंतरही पत्नीच्या मनात ‘पतीकडून आणखी सुख मिळायला हवे होते आणि माझ्या अंतसमयी पतीने माझी सेवा करावी’, अशी तीव्र इच्छा असते. पतीच्या मनात मृत्यूपूर्वी पत्नीला सोडून जाण्याचे दुःख असते. त्यामुळे पतीचा मृत्यू आधी झाला, तरी पती-पत्नीतील इच्छा, अपेक्षा आणि अहं यांमुळे त्यांच्यातील देवाण-घेवाण हिशोब शिल्लक राहिलेले असतात. त्यामुळे ते फेडण्यासाठी पती-पत्नी लवकरच पुनर्जन्म घेतात.
२. साधना न करणार्या पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब
२ अ. पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब पूर्वीच्या युगांपासून चालू असणे : कलियुगात पती-पत्नीतील असलेल्या देवाण-घेवाण हिशोबाची निर्मिती ही त्रेता किंवा द्वापर या युगांपासून चालू झालेली असू शकते. त्याचे विश्लेषण पुढे दिले आहे. त्रेता युगात आरंभी स्त्री आणि पुरुष यांच्यात विवाह झाला. तेव्हा त्या दोघांची ‘साधना असणे आणि वृत्ती सात्त्विक असणे’ यांमुळे त्यांच्यात मोठ्या प्रमाणात सुख किंवा दुःख यांची देवाण-घेवाण झाली नाही. परिणामी त्यांच्यात देवाण-घेवाण हिशोब फारसा निर्माण झाला नाही.
२ आ. त्रेतायुगात देवाण-घेवाण हिशोब फारसा निर्माण झाला नाही, तरी दोघांमध्ये संबंधांची गोडी निर्माण झाल्याने त्यांचे पुढील अनेक जन्म एकत्र घेण्याच्या प्रक्रियेला आरंभ होणे : त्रेतायुगात आरंभी पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब थोडा होता; परंतु सहवासामुळे पती-पत्नीचे एकमेकांवरील प्रेम वृद्धींगत होऊ लागले. त्यामुळे त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक संबंधांची गोडी उत्पन्न झाली. ही गोडी अवीट वाटल्याने पती-पत्नीमध्ये पुढील जन्मीही विवाहाद्वारे एकत्र येण्याची इच्छा निर्माण झाली. कालांतराने त्या दोघांच्या मृत्यूनंतर त्यांच्या इच्छेनुरूप पुढील जन्मात परत ते एकत्र आले आणि पती-पत्नी या नात्यात रमले. त्या जन्मात त्या पती-पत्नीचे साधनेचे प्रमाण अल्प झाले आणि ते शारीरिक अन् मानसिक संबंधाची गोडी आणखी अनुभवू लागले. त्यातून त्यांच्यातील देवाण-घेवाण हिशोबांत आणखी वाढ होऊ लागली.
२ इ. त्रेतायुगातील पती-पत्नीचा प्रवास कलियुगापर्यंत चालू असण्याची शक्यता असणे : त्रेतायुगातील पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब पूर्ण न होता तो प्रत्येक जन्मात आणखी वाढू लागला. त्यामुळे त्रेतायुगात चालू झालेला पती आणि पत्नीचा जन्म-मूत्यूचा प्रवास पुढील जन्म घेत कलियुगांपर्यंत चालू राहिलेला असू शकतो.
२ ई. पती-पत्नी यांच्यात देवाण-घेवाण हिशोब निर्माण कसे होतात ?
१. पती-पत्नीच्या वागण्यातून एकमेकांना सुख किंवा दुःख भोगावे लागते. दोघांतील अहंमुळे त्यांच्या कर्मांची चांगली किंवा वाईट फळे सिद्ध होतात.
२. पती-पत्नीतील शारीरिक संबंधांतून एकमेकांना सुख किंवा दुःख भोगावे लागते. त्यात अहंमुळे त्या कर्मांची फळे सिद्ध होतात.
वरील कारणांमुळे दोघांमध्ये देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतात.
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.७.२०२३) (क्रमश:)
|