मुंबई, ९ डिसेंबर (वार्ता.) – अधिवेशनाच्या काळात मुंबई किंवा नागपूर येथे विधीमंडळाच्या आवारात राजकीय पक्षाचे कार्यकर्ते करत असलेल्या गर्दीविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अप्रसन्नता व्यक्त केली.
मागील काही वर्षांपासून विधीमंडळाच्या इमारतीमधील मोकळ्या जागेतून चालायला जागा नसते. पूर्वी विधीमंडळाची अशी अवस्था नव्हती. अलीकडे १ आमदार २५ जणांना आणतो. विधीमंडळाच्या आवारात गर्दी झाली, तर दर्जेदार काम करता येणार नाही. मंत्र्यांच्या दालनामध्ये इतकी गर्दी असते की, आतमध्ये जाता येत नाही. विधीमंडळात बाजारासारखे वातावरण असते, अशी उद्विग्नता देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.