विधानसभा अध्‍यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांचा अर्ज !

मुंबई – महाराष्‍ट्र विधानसभा अध्‍यक्षपदासाठी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज केला आहे. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्‍या उपस्‍थितीत ८ डिसेंबर या दिवशी राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज विधीमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांच्‍याकडे सुपूर्द केला. विधानसभा अध्‍यक्षपदासाठी ८ डिसेंबरच्‍या दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज देण्‍याची वेळ होती; मात्र अन्‍य कुणाचाही अर्ज न आल्‍यामुळे विधानसभा अध्‍यक्षपदी अधिवक्‍ता राहुल नार्वेकर यांची निवड होण्‍याची शक्‍यता आहे.

या वेळी प्रसारमाध्‍यमांच्‍या प्रतिनिधींसमोर राहुल नार्वेकर म्‍हणाले, ‘‘भाजपमध्‍ये पदाचे दायित्‍व हे वय किंवा त्‍याचा अनुभव यांवरून ग्राह्म धरले जात नाही, तर गुणवत्तेवर निवड केली जाते.’’