सांगली, ८ डिसेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील औदुंबर श्रीदत्तक्षेत्री ८ डिसेंबर या दिवशी अनंतकोटी ब्रह्मांडनायक इंदूरनिवासी, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (बाबा) आणि त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज (रामजीदादा) यांच्या पादुकांचा दर्शन सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला गोवा, मुंबई, पुणे, सांगली येथील भक्त उपस्थित होते.
७ डिसेंबर या दिवशी सायंकाळी औदुंबर दत्तक्षेत्री श्री नरसिंह सरस्वती महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या समोर प.पू. बाबांच्या भक्तांची भजन सेवा भावपूर्ण वातावरणात झाली. त्यानंतर प.पू. बाबांचे भक्त श्री. प्रसाद जोशी यांच्या येथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. ८ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता औदुंबर येथील नारायण स्वामी मठ येथून प.पू. बाबा आणि प.पू. रामजीदादा यांच्या पादुकांचा पालखी सोहळा अन् मिरवणूक भावपूर्ण वातावरणात झाली.
औदुंबर येथील कृष्णा नदीमध्ये दोन्ही पादुकांना स्नान घालण्यात आले. त्यानंतर श्री. प्रसाद जोशी यांच्या कार्यालयामध्ये प.पू. बाबांचे गोवा येथील भक्त श्री. आणि सौ. देसाई अन् श्री. आणि सौ. प्रसाद खाडे (सांगली) यांनी दोन्ही पादुकांचे विधीवत् पंचोपचार पूजन केले, तर श्री. प्रसाद जोशी यांनी पौरोहित्य केले. अनेक भक्तगणांनी या भंडार्याचा लाभ घेतला.
या सोहळ्याला ‘श्री सद़्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’चे अध्यक्ष श्री. शरद बापट, विश्वस्त श्री. गिरीश दीक्षित आणि श्री. दिलीप (तात्या) भोसले यांसह अनेक भक्तगण उपस्थित होते.