शौचालयातून घोरपडीची सुटका !
भिवंडी – येथील एका कार्यालयात आढळलेल्या घोरपडीला तिच्या अंड्यासमवेत वाचवण्यात आले. सध्या घोरपडीवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. ही घोरपड कार्यालयात बरेच दिवस वावरत होती. एकदा ती शौचालयाच्या ठिकाणी जातांना दिसली. बचाव पथकाने तेथून तिला बाहेर काढले. तेव्हा ती बेशुद्ध अवस्थेत आढळली.
_______________________________________________________
राज कुंद्रा ‘ईडी’च्या चौकशीला दुसर्यांदा अनुपस्थित !
मुंबई – उद्योगपती राज कुंद्रा ४ डिसेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशीला उपस्थित नव्हते. ईडीने त्यांना दुसर्यांदा समन्स पाठवले होते. आता ईडी त्यांना तिसरे समन्स पाठवण्याची शक्यता आहे.
______________________________________________________
पनवेल महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई !
पनवेल – पनवेल महानगरपालिकेने बेकायदा हातगाड्यांवर तोडकामाच्या कारवाईला प्रारंभ केला आहे. अनधिकृतरित्या बांधलेल्या झोपड्या, दुकानांबाहेरील अनधिकृत सामान यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. कळंबोली वसाहतीमध्ये १२ हातगाड्या, तर पनवेल शहरातील उरण नाका येथील ७ हातगाड्या जप्त करून त्या तोडण्यात आल्या.
__________________________________________________
बुलेट ट्रेनसाठी पहिला ‘स्लॅब’ सिद्ध !
मुंबई – मुंबई बुलेट ट्रेन स्थानकाचा पहिला काँक्रीट बेस स्लॅब ३० नोव्हेंबर या दिवशी भूमीपासून अंदाजे ३२ मीटर खोलीवर टाकण्यात आला आहे. हा स्लॅब १० मजली इमारतीच्या समतुल्य इतक्या खोलीवर आहे. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये केवळ बीकेसी हे एकमेव भूमीगत स्थानक आहे. हा स्लॅब ३.५ मीटर खोल, ३० मीटर लांब आणि २० मीटर रुंद आहे. स्थानकासाठी टाकल्या जाणार्या एकूण ६९ स्लॅबपैकी हा पहिला स्लॅब आहे.
_____________________________________________________
मेट्रो स्थानकांवरील स्वच्छतागृहांची अॅपद्वारे माहिती !
मुंबई – मुंबई मेट्रो ७ आणि २ ए मार्गावरील ३० मेट्रो स्थानकांवर सार्वजनिक स्वच्छता पुरवण्यासाठी मुंबई मेट्रोने ‘टॉयलेट सेवा अॅप’ यांच्या सहकार्याने स्वच्छता उपक्रम राबवला आहे. अॅपद्वारे मेट्रो स्थानकांवरील ‘टॉयलेट’ची माहिती प्रवाशांना मिळेल. प्रवासी ‘टॉयलेट’विषयीच्या समस्या ‘अॅप’द्वारे नोंदवतील. ‘टॉयलेट’ सेवेचा लाभ घेण्यासाठी क्यू.आर्.कोड स्कॅन करून ‘टॉयलेट सेवा अॅप’ डाऊनलोड करा, असे आवाहन ‘महा मुंबई मेट्रो ऑपरेशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ने केले आहे.
______________________________________________________