सध्या बांगलादेशामध्ये सत्ता पालटामुळे तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह अशी आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक केली जाणे याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तेथे असलेल्या हिंदूंचे रक्षण करणे, हे भारताचे नैतिक दायित्व आहे. या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. ‘बांगलादेशातील हिंदूंची दयनीय स्थिती’ या लेखमालिकेद्वारे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
३० नोव्हेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांकांची स्थिती सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न, बांगलादेशाचा प्रवास वहाबी मूलतत्त्ववादाकडे ?, वर्ष १९७१ च्या युद्धात ३५ लाखांहून अधिक हिंदूंचा वंशविच्छेद, बांगलादेशातील हिंदूंनी २२ लाख एकर मालमत्ता गमावली आणि हिंदूंच्या भूमीची सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी सामुदायिक चोरी केली’, यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/859030.html
७. बांगलादेशामधील हिंदूंच्या विरोधात झालेल्या हिंसाचारामध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ कट्टरपंथी संघटनेचा सर्वांत मोठा वाटा !
बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात झालेल्या हिंसाचारामध्ये ‘जमात-ए-इस्लामी’ या कट्टरपंथी संघटनेचा सर्वांत मोठा वाटा होता. याखेरीज अनेक युवकही या हिंसाचारात सामील झाले. ज्यांचे मुख्य काम होते हिंदूंच्या घरातून सामान पळवायचे, त्यांच्या बायकांवर अत्याचार करायचे आणि या हिंसाचारामध्ये स्वतःचा लाभ करून घ्यायचा; मात्र ‘जमात-ए-इस्लामी’चा हिंदू विरोधातील हिंसाचार हा अत्यंत जुना आहे. याचा प्रारंभ होतो वर्ष १९७१ पासून. ज्या वेळेला पाकिस्तानी सैन्याने ‘जमात-ए-इस्लामी’च्या साहाय्याने वर्ष १९७१ च्या युद्धापूर्वी
४० लाख तत्कालीन पूर्व पाकिस्तानी नागरिकांना मारले, ज्यामध्ये ३० लाख हे पूर्व पाकिस्तानमधील हिंदु होते आणि १० लाख लोक हे ‘अवामी लीग’ या पक्षाचे समर्थक होते.
वर्ष १९७१ नंतर अनेक वेळा बांगलादेशामध्ये वेगवेगळ्या कारणाने हिंसाचार झाला आणि त्यामध्ये सर्वाधिक लक्ष्य केले गेले ते, म्हणजे तिथे असलेल्या हिंदूंना. त्यामुळे आपण ‘जमात-ए-इस्लामी’च्या इतिहासावर थोडी चर्चा करूया.
८. ‘जमात-ए-इस्लामी’ची स्थापना आणि तिचा वादग्रस्त इतिहास
‘जमात-ए-इस्लामी’ ही एक धार्मिक आणि राजकीय संघटना आहे, ज्याचा प्रभाव दक्षिण आशियात विशेषतः पाकिस्तान, भारत, आणि बांगलादेशात दिसून येतो. या संघटनेचा इतिहास वादग्रस्त असून अनेक विवाद आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये या संघटनेचा सहभाग आहे. विशेषतः बांगलादेशातील अशांतता आणि तेथील राजकीय घटनांमध्ये या संघटनेची महत्त्वाची भूमिका असल्याचे दिसते. ‘जमात-ए-इस्लामी’ची स्थापना वर्ष १९४१ मध्ये मौलाना अबुल आला मौदूदी यांनी लाहोर येथे केली होती. संघटनेचे मुख्य ध्येय ‘इस्लामी राज्याची स्थापना करणे’, हे होते. त्यांनी इस्लामी कायद्याच्या आधारे समाज आणि शासन चालवण्याचे विचार मांडले. या संघटनेचा प्रारंभ धार्मिक विचारप्रणाली आणि राजकीय दृष्टीकोन यांच्या आधारावर झाली. ‘जमात-ए-इस्लामी’चा इतिहास वादग्रस्त घटना यांनी भरलेला आहे. वर्ष १९७१ मध्ये बांगलादेशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी ‘जमात-ए-इस्लामी’ने पाकिस्तानच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. बांगलादेशातील अनेक व्यक्तींनी या संघटनेवर मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोपही केले आहेत.
९. बांगलादेशातील अशांततेत जमात-ए-इस्लामीचा सहभाग
बांगलादेशातील अशांततेत ‘जमात-ए-इस्लामी’ आणि तिची विद्यार्थी संघटना ‘छात्रशिबिर’ यांचा सहभाग महत्त्वाचा राहिला आहे. विशेषतः वर्ष २०१३ मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जेव्हा या संघटनेच्या नेत्यांच्या विरोधात युद्धाविषयीचे गुन्हे सिद्ध झाले, त्या वेळी बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. या हिंसाचारात ‘जमात-ए-इस्लामी’च्या कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचे अनेक माध्यमांनी दाखवले आहे.
१०. जमात-ए-इस्लामीला बांगलादेश सरकारने कसा प्रतिसाद दिला ?
बांगलादेशातील हसीना यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने ‘जमात-ए-इस्लामी’च्या अनेक नेत्यांवर न्यायालयीन कारवाई केली. अनेक नेत्यांना युद्धगुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. वर्ष २०१३ मध्ये बांगलादेशातील न्यायालयाने ‘जमात-ए-इस्लामी’ला राजकीय पक्ष म्हणून बेकायदेशीर ठरवले, ज्यामुळे या संघटनेच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या.
११. जमात-ए-इस्लामीविषयी शेख हसीना यांची भूमिका
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी जमात-ए-इस्लामीच्या विरोधात कठोर भूमिका घेतली. त्यांनी या संघटनेच्या हिंसक आणि विवादास्पद कारवायांच्या विरोधात कटाक्षाने पावले उचलली. हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जमात-ए-इस्लामीच्या अनेक नेत्यांना न्यायालयीन कारवाईत अडकवले. जमात-ए-इस्लामीचे बांगलादेशातील पतन वर्ष २०१० पासून चालू झाले. न्यायालयीन निर्णय, नेत्यांची फाशी आणि संघटनेच्या विरोधातील जनआंदोलन यांमुळे संघटनेचा प्रभाव न्यून झाला. यासह सरकारने जमात-ए-इस्लामीच्या विविध शाखांना बंद करण्याचे आदेश दिले.
१२. जमात-ए-इस्लामीचा राजकीय प्रभाव
जमात-ए-इस्लामीचा राजकीय प्रभाव वर्ष १९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यानंतर न्यून झाला आहे; परंतु काही काळासाठी त्यांनी त्यांच्या राजकीय अस्तित्वाला जपले होते. त्यानंतर न्यायालयीन निर्णय आणि तत्कालीन सरकारच्या कठोर धोरणांमुळे त्यांच्या राजकीय कारवायांवर मर्यादा आल्या. ‘जमात-ए-इस्लामी’चा जागतिक प्रभाव त्यांच्या धार्मिक विचारधारांमुळे असून त्यांच्या हिंसक कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या विचारधारेवर टीका होत आहे.
१३. येत्या ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ८ टक्क्यांवरून शून्य टक्क्यावर येण्याची शक्यता
आता येणार्या काळामध्ये आणि बांगलादेशामधील आगामी सरकारमध्ये ‘जमात-ए-इस्लामी’चा राजकीय प्रभाव हा अत्यंत महत्त्वाचा असेल; कारण शेख हसीनांच्या विरोधात असलेली ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ पूर्णपणे ‘जमात-ए-इस्लामी’च्या प्रभावाखाली आहे. यामुळे असे मानले जाते की, येणार्या काळात बांगलादेशामधील हिंदूंचे भवितव्य अतिशय कठीण होणार आहे. भारत सरकारने बांगलादेशामधील परिस्थितीवर लक्ष ठेवून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे अन्यथा आगामी ५ वर्षांमध्ये बांगलादेशी हिंदूंची संख्या ही सध्याच्या ८ टक्क्यांवरून ० (शून्य) टक्क्यावर येईल.
१४. भारताने विविध स्तरांवरून बांगलादेशावर दडपण आणणे जरुरीचे !
बांगलादेशात लोकशाही स्थिरावून सामाजिक आणि धार्मिक स्थिरता येणे, हे भारतासाठी हितावह आहे. भारताने साहाय्य करतांना अखंड सावधान राहून अल्पसंख्यांकांचे संरक्षण होत आहे का ? हे पहाणे आवश्यक आहे. ‘बांगलादेशात अल्पसंख्यांकांचा छळ झाला, तर त्याचे परिणाम आपल्या भारतासमवेतच्या संबंधांवर होतील आणि ते आपल्याला परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीनेही हानीकारक आहे’, याची जाणीव बांगलादेशाला व्हायला हवी. ‘अल्पसंख्यांकांचे संरक्षण व्हावे’, यासाठी भारताने सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेशावर दडपण आणणे जरुरीचे आहे.
१५. बांगलादेशाच्या भूमीत दुसरे पाकिस्तान निर्माण होऊ नये, याची खबरदारी भारताने घ्यावी !
अल्पसंख्यांकांचा छळ मानवतेच्या दृष्टीने अन्यायकारक आहेच, तसेच तेथे छळ झाला, तर ते निर्वासित म्हणून भारतातच आश्रयास येतात आणि त्याचा भारताच्या आर्थिक, राजकीय अन् सामाजिक अशा वििवध स्रोतांवर परिणाम होतो. ‘पाकिस्तान आणि बांगलादेश येथील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येकडे दुर्लक्ष’, या विषयावर राष्ट्रीय पातळीवर व्यापक चर्चा होण्याची आवश्यकता आहे. भारत सरकारने बांगलादेशातील परिस्थितीवर लक्ष ठेवून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करायला पाहिजे. बांगलादेशाच्या भूमीत दुसरे पाकिस्तान निर्माण होऊ नये, याची खबरदारीही यापुढील काळात भारताला घ्यावी लागणार आहे.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (१३.११.२०२४)
संपादकीय भूमिका‘बांगलादेश आणि पाकिस्तान येथील हिंदूंचे रक्षण व्हावे’, यासाठी भारताने सरकारी किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरून बांगलादेशावर दडपण आणणे आवश्यक ! |