गोपाळ गणेश आगरकर
‘यथा चित्तं तथा वाचो यथा वाचस्तथा क्रियाः ।
चित्ते वाचि क्रियायां च साधूनामेकरुपता ।।
अर्थ : जसे मन असते तशी वाणी असते, जशी वाणी असते तसे कार्य होते. सज्जनांचे मन, वाणी आणि कार्य यांमध्ये एकरूपता असते.
एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात जे ख्यातनाम समाजसुधारक होऊन गेले, त्यांच्यापैकी आगरकर एक होते. त्यांचा जन्म १८५६ साली झाला. त्यांना अवघे ३९ वर्षांचे आयुष्य लाभले. या अल्पावधीत त्यांनी मोठी कामगिरी केली. अठराविश्वे दारिद्र्य असूनही ते ना ना कष्ट सोसून ‘एम्.ए.’ झाले.
त्या वेळचे पदवीधर पदवी प्राप्तीनंतर सरळ सरकारी नोकरीकडे धाव घेत आणि अलोट पैसा मिळवीत; पण राष्ट्रभक्तीची प्रज्वलित ज्योत अंतःकरणात तेवत असलेल्या आगरकरांनी इतर पदवीधरांचा मार्ग पत्करला नाही. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी काढलेल्या ‘न्यू इंग्लिश हायस्कूल’ला ते अगदी तुटपुंज्या पगारावर नोकरीत रुजू झाले आणि राष्ट्रीय शिक्षणदानाचे कार्य त्यांनी चालू केले. काही दिवसांनी ‘फर्ग्युसन कॉलेज’ही काढण्यात येऊन बरेच दिवसांपर्यंत ते त्याचे प्राचार्य (प्रिन्सिपल) होते. काही काळपर्यंत आगरकर अन् टिळक यांनी खांद्यास खांदा लावून राष्ट्रीय शिक्षणाचे कार्य चालविले. सामान्य जनतेस शिक्षण देण्यासाठी वर्ष (इ.स.) १८८१ मध्ये ‘केसरी’ आणि ‘मराठा’ (वृत्त)पत्रे काढण्यात आली. लो. टिळक हे ‘मराठा’ पत्राचे संपादक होते अन् आगरकर हे ‘केसरी’चे संपादक होते. पुढे या दोघांचे सूत न जमल्यामुळे आगरकरांनी ‘केसरी’ सोडला आणि दोन्ही पत्रांचे संपादकत्व लो. टिळकांनी आपल्याकडे घेतले. आगरकरांनी नंतर वर्ष (इ.स.) १८८८ मध्ये जनजागृती करिता ‘सुधारक’ हे पत्र काढले. आगरकरांचा अंत (निधन) वर्ष (इ.स.) १८९५ मध्ये झाला.
आगरकरांनी ‘केसरी’ अन् ‘सुधारक’ या दोन्ही पत्रांतून बरेच निबंध लिहिले. त्यांनी शेक्सपिअरच्या ‘हॅम्लेट’ या नाटकाचे केलेले ‘विकार विलसित’ हे भाषांतर उत्कृष्ट वठलेले आहे. ज्याप्रमाणे त्यांनी सामाजिक रुढींवर लेख लिहिले, त्याचप्रमाणे त्यांनी जहाल असे राजकीय स्वरूपाचे लेखही लिहिले. ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार !’, हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. ‘साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी’ असे त्यांचे थोडक्यांत वर्णन करता येईल.
आगरकर समाज सुधारक होते, तरी ‘सुधारणा म्हणजे जबरदस्ती नव्हे’, ही गोष्ट त्यांना पटली होती. एकदा त्यांच्या वर्गातील वेलणकर नावाचा विद्यार्थी त्यांना म्हणाला, ‘‘मी काल जोगेश्वरीच्या देवळात आपल्या पत्नींना देवीपुढे नाकदुर्या (अर्थ – अतिशय नम्रपणाची विनवणी) काढतांना पाहिले. हे त्यांचे वागणे आपल्या मताशी विसंगत आहे.’’
आगरकरांनी त्या विद्यार्थ्यास मोठे मार्मिक उत्तर दिले. ते म्हणाले,‘‘मी तिला सुधारणेचे विचार सांगत असतो; पण ‘तिच्या मनात फरक होऊन हे नवे विचार तिला पटले नाहीत, तोवर तिच्या वर्तन स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा मला हक्क आहे’, असे मी समजत नाही. सुधारणा म्हणजे जबरदस्ती नव्हे !’’
आगरकरांचे अंतःकरण उदार आणि उदात्त होते. ढोंगी लोकांचे ढोंगसोंग चव्हाट्यावर आणतांना त्यांनी कोणाची भीड धरली नाही, ही गोष्ट खरी असली, तरी त्यांच्या लिखाणात द्वेष, तिरस्कार, असत्य आणि चिडखोरपणा या गोष्टी आढळून येत नाहीत.
सारांश आदर्श अध्यापक, आदर्श निबंधकार, आदर्श संपादक आणि आदर्श समाजसुधारक म्हणून आगरकरांची कीर्ती चिरंजीव राहील, यात तीळमात्र संदेह नाही !’