इंग्लंडमध्ये विविध ठिकाणी कीर्तन आणि नाट्यसंगीत सादरीकरणानिमित्त गौरव !
पुणे – राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे यांनी नारदीय कीर्तन परंपरेच्या शैलीमध्ये अनेक विषयांवर कीर्तन करून इंग्लडमधील मराठी आणि हिंदी भाषेतील रसिकांना मंत्रमुग्ध केले. कीर्तन म्हणजे काय ? ते समाजप्रबोधनासाठी आजही किती प्रभावी माध्यम आहे ? याचे मार्गदर्शन केले. परदेशातील त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याविषयी त्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय कीर्तनसम्राट कै. गोविंद स्वामी आफळे आणि कै. (सौ.) सुधा गोविंद आफळे यांच्या स्मृतीनिमित्त सदाशिव पेठेतील नारद मंदिर येथे भागवत दर्शन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनकार बाळकृष्ण चोथवे (नांदेड) यांच्या हस्ते चारुदत्तबुवा आफळे यांचा सन्मान करण्यात आला.
विविध ठिकाणी कीर्तन आणि नाट्यसंगीत सादरीकरण !
चारुदत्त आफळेबुवा यांनी इंग्लड येथील ‘महाराष्ट्र मंडळ, लंडन’ येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे चरित्र, क्रॉयडन मराठी सर्कल येथे शक्ती गाथा, ‘रिडींग हिंदु टेम्पल’ येथे हिंदी भाषेत भगवान श्रीकृष्णलीलेविषयी सांगितले. साईबाबा मंदिर मिल्टन किन्स येथे श्रीराम कथा सांगून श्रीरामाचे व्यक्तीमत्त्व कसे समाजहितासाठीच होते ? हे सांगितले. मराठी मंडळ, केंट येथे भारतीय संस्कृतीची विजय गाथा, मराठी कॉव्हेंट्री येथे संतांच्या शिकवणुकीतून बोध घेऊन आजच्या काळात पालकत्व कसे असावे ? या विषयावर कीर्तन, स्लाव्ह मित्र मंडळ येथे ‘आद्य शंकराचार्य ते विवेकानंद’, असे सनातन संस्कृतीविषयी मार्गदर्शन केले.