राज्यात बहुमताने महायुतीची सत्ता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – राज्यातील जनतेने महायुतीचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पाहिला आहे. राज्याची दशा कुणी केली आणि राज्याला दिशा कुणी दाखवली, हे नागरिकांना ठाऊक आहे. आम्ही राज्याच्या विकासाला प्राधान्य दिले. महाराष्ट्राला शक्तीशाली राज्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने येईल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदान केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी ११ ते ११.३० या वेळेत ठाणे येथील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.
२९ टक्के उमेदवार कलंकित, ४१२ उमेदवारांविरुद्ध खून-बलात्कारासारखे गंभीर गुन्हे नोंद !
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार अपक्षांसह विविध पक्षांचे एकूण ४ सहस्र १३६ उमेदवार रिंगणात आहेत. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ने (ADR) यापैकी २ सहस्र २०१ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांची पडताळणी करून अहवाल सिद्ध केला आहे. त्यानुसार जवळपास २९ टक्के म्हणजेच ६२९ उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यापैकी ४१२ जणांवर खून, अपहरण, बलात्कार असे गंभीर गुन्हे नोंद आहेत. ५० उमेदवारांवर महिलांशी संबंधित गुन्ह्यांचे आरोप आहेत.
३८ टक्के उमेदवार कोट्यधीश !
‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ (ADR) नुसार, ८२९ म्हणजेच ३८ टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. गेल्या निवडणुकीत हा आकडा ३२ टक्के होता. त्यांच्याकडे सरासरी ९.११ कोटी रुपयांची मालमत्ता आहे, तर भाजपच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता ५४ कोटी रुपये आहे. २६ उमेदवारांनी आपली संपत्ती शून्य असल्याचे घोषित केले आहे.
कोपरी-पाचपाखाडी (ठाणे) येथे पैसे आणि मद्य वाटपप्रकरणी केदार दिघे यांसह ८ जणांवर गुन्हा !
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवली, त्या ठाणे जिल्ह्यातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांसह अन्य ८ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सौ. वर्षा भोसले यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
१९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १.४५ ते २ या कालावधीत कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातील अष्टविनायक चौक येथे सचिन गोरीवले नावाच्या व्यक्तीच्या गाडीत काही मद्याच्या बाटल्या, तसेच २ सहस्र रुपये असलेली २६ पाकिटे सापडली आहेत. या प्रकरणी तक्रारदार सौ. वर्षा भोसले यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर मतदारसंघातही मनसेकडून भाजपकडून मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
निवडणुकीला गालबोट लावणार्या घटना
१. जळगाव – जामोद मतदारसंघात स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास आक्रमण केले. या आक्रमणात प्रशांत डिक्कर घायाळ झाल्याने त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.
२. गडचिरोली – येथील मतदान प्रक्रिया नक्षलप्रवणतेच्या कारणास्तव दुपारी ३ वाजताच संपली.
३. नागपूर – येथे काही ठिकाणी ई.व्ही.एम्.यंत्र बंद असल्याची मतदारांनी तक्रार केली, तर काही ठिकाणी यंत्रात बिघाड झाल्याने मतदानाला विलंब झाला. त्यामुळे काही कामगार निघून गेले. उत्तर नागपूर येथील कस्तुरबानगर मतदान केंद्रातील ई.व्ही.एम्. यंत्र सकाळी २ घंटे बंद होते.
४. नाशिक आणि मालेगाव येथील मतदान केंद्रांवर ई.व्ही.एम्. यंत्रात बिघाड झाला.
५. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघातील घटांबरी येथे २ गटांत झटापट झाली.
६. यवतमाळ मतदार संघातील लोहारा परिसरात राहणार्या एकाच परिवारातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रावर असल्याने मतदान करण्यासाठी त्यांची धावपळ झाली. मतदार राहत असलेल्या परिसरातील जवळच्या मतदान केंद्रावर एकाच कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असायला पाहिजेत, अशी व्यवस्था जिल्हा निवडणूक अधिकार्यांनी करावी, अशी मागणी मतदारांनी केली.
धुळे येथे ९८ कोटी रुपयांची १० सहस्र किलो चांदी पकडली !
धुळे येथे निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकाने १० सहस्र किलो चांदी पकडली असून तिचे मूल्य अंदाजे ९८ कोटी रुपये आहे. चौकशीनंतर ही चांदी बँकेची असल्याचे लक्षात आले असून याची चौकशी चालू आहे. येथे एका मतदान केंद्रावर भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.
शिर्डीत परराज्यातील विद्यार्थ्याच्या मतदानाचे वृत्त चुकीचे ! – निवडणूक आयोग
शिर्डी (जिल्हा अहिल्यानगर) येथील विखे पाटील महाविद्यालयामध्ये बाहेरच्या राज्यातून येणार्या विद्यार्थ्याने मतदान केले आहे, असा आरोप करण्यात आला; पण हे वृत्त चुकीचे असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
शिर्डीत बनावट मतदान !- काँग्रेस नेत्याचा आरोप
शिर्डी येथील काँग्रेसचे नेते श्रीनिवास बीव्ही यांनी सामाजिक माध्यमांवर एका मुलीचा व्हिडिओ प्रसारित केला असून तिने शिर्डीत बनावट मतदान केले आहे, असा आरोप केला. मुलगी धुळे येथील आहे. शिर्डी ते धुळे हे अंतर ३०० कि.मी. आहे.
श्रीमंतांचा लोकशाहीकडे बघण्याचा दृष्टीकोन उदासीन असल्यामुळे मतदानाचे प्रमाण अत्यल्प !
अब्जाधीश उद्योगपती हर्ष गोयंका यांची गर्भश्रीमंत मतदारांवर टीका !
मुंबई – श्रीमंतांचा लोकशाहीकडे बघण्याचा उदासीन दृष्टीकोन असल्यामुळे मतदानाचे प्रमाण अत्यल्प रहातेे, अशी टीका अब्जाधीश उद्योगपती आणि ‘आर्.पी.जी.’ समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी मुंबईतील उच्चभ्रू भागात होणार्या अल्प मतदानावरून गर्भश्रीमंत मतदारांवर ‘एक्स’द्वारे केली आहे. ‘मुंबईतील श्रीमंत लोक लोकशाही सुदृढ करण्याऐवजी स्वतःच्या चैनीच्या जीवनशैलीला अधिक महत्त्व देतात’, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले,…
१. मलबार हिलमधील स्त्री-पुरुष आज मतदान करणार नाहीत; कारण त्यांच्या मर्सिडीज आणि बीएम्डब्ल्यू या आलिशान गाड्यांचे चालक त्यांचे वाहन मतदान केंद्रापर्यंत नेऊ शकतील कि नाही ? यावर त्यांचा वाद चालू असेल.
२. मतदान केंद्रावर जातांना त्यांचे महागडे, डिझायनर बूट खराब होण्याची शक्यता आहे. मनीष मल्होत्राने डिझाईन केलेल्या कपड्यांवर ‘गुची सनग्लासेस’ जुळत (मॅच) आहेत का, यात त्यांची तारांबळ उडू शकते.
३. ‘क्विनोआ’ सॅलड खाता खाता ते व्हॉट्सअॅपवरच योग्य उमेदवार कसा असावा, यावर खल करत असतील.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान !
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात अत्यंत चुरशीने मतदान झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांत सायंकाळी ५ पर्यंत ६७.९७ टक्के मतदान झाले होते. कागल मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ७४.३३ टक्के, तर शाहूवाडी मतदारसंघात ७०.४० टक्के मतदान झाले. नवमतदारांमध्ये उत्साह होता. कोल्हापूर शहर उत्तर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार श्री. राजेश क्षीरसागर यांनी, तर गारगोटी मतदारसंघातून शिवसेनेचे श्री. प्रकाश आबीटकर यांनी विजयाचा दावा केला आहे. कोल्हापूर शहर दक्षिण मतदारसंघात भाजपचे श्री. अमल महाडिक आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्यात, कागल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समरजित घाटगे यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
कागल शहर आणि पिराचीवाडी येथे मतदान केंद्र ३६ आणि ३७ येथे खोट्या मतदानाचा प्रयत्न झाला. तो आमच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. घटनाबाह्य पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न पालकमंत्री हसन मुश्रीफ करत आहेत. ते आम्ही खपवून घेणार नाही, अशी चेतावणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी दिली. ‘पिराचीवाडी येथील केंद्रांवर खोट्या मतदानाचा प्रकार घडला नाही’, असे मतदान अधिकार्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात ‘खोटे मतदान झाल्याच्या तक्रारी आल्या; मात्र पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य नसून खोटे मतदान झालेले नाही, असे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
परळी येथे मतदान यंत्रांची तोडफोड !
परळी विधानसभा मतदारसंघात दुपारी १२ च्या सुमारास तालुक्यातील घाटनांदनूर येथील सोमेश्वर विद्यालय आणि जिल्हा परिषद शाळेचे केंद्राध्यक्ष मुंडे यांना काही युवकांनी मारहाण करत ४ यंत्रांची तोडफोड केली. यानंतर केंद्राध्यक्ष मुंडे यांना आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.
मिरज, सोलापूर या शहरांमध्ये अनेक मतदान केंद्रांवर मुसलमान महिला आणि पुरुष मतदार मोठ्या प्रमाणात रांगा लावून मतदान करतांना आढळले.
पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधील काही घडामोडी !
१. कोल्हापूर उत्तरमधील विक्रम हायस्कूल येथील मतदान केंद्रातील ‘व्हीव्हीपॅट’ काही काळासाठी तांत्रिक अडचणीमुळे सकाळी ७.३० वाजता बंद पडले होते. ते काही वेळेत दुरुस्त करून परत सुरळीत मतदान चालू करण्यात आले.
२. ऑलिंपिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याने राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथे मतदान केले.
३. कोल्हापूर जिल्ह्यात ८० सहस्रांहून अधिक ज्येष्ठ नागरिक मतदार आहेत. त्यांपैकी ४ सहस्र ४३० मतदारांनी गृहमतदानाद्वारे मतदान केले. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सकाळी पहिल्या घंट्यामध्ये ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असणार्या ज्या मतदारांनी मतदान केले त्यांना निवडणूक विभागाने प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
४. नांदगाव मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचे समर्थक पैसे वाटत असल्याचा आरोप करण्यात आला. मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. ‘भुजबळ यांना कांदे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली’, असा आरोप भुजबळ यांच्या समर्थकांनी केला आहे.
५. पुण्यात कोथरूड मतदारसंघात लहान मुलांना मतदान करण्यासाठी घेऊन येणार्यांसाठी पाळणाघर सुविधा उपलब्ध करून दिली होती. येथे लहान मुलांना सोडून महिला मतदानासाठी जात होत्या.
६. बाणेर-बालेवाडी येथील रिक्शा संघटनांनी २५० रिक्शांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला, नवमतदारांना विनामूल्य रिक्शा सेवा पुरवली.
सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.०९ टक्के मतदान झाले होते. सोलापूर दक्षिण मतदारसंघात उद्धव ठाकरे पक्षाकडून उमेदवार देण्यात आला आहे; मात्र काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. उद्धव ठाकरे यांनी जागा वाटपात या मतदारसंघावर केलेला दावा चुकीचा असून पूर्वीपासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे असल्याचे सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले.
सांगली
सांगली जिल्ह्यात सायंकाळी ५ पर्यंत ६३.२८ टक्के मतदान झाले. येथे शहरात भाजपचे विद्यमान आमदार श्री. सुधीर गाडगीळ यांनी सलग २ वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले असून ते तिसर्यांदा निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
सातारा येथे सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४.१६ टक्के मतदान !
सातारा, २० नोव्हेंबर (वार्ता.) – सातारा जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदारसंघांत सकाळी ७ वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे मतदान पार पडले; मात्र जिल्ह्यात खंडाळा तालुक्यात एका मतदाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६४.१६ टक्के मतदान पार पडले.
पुणे जिल्ह्यात सायंकाळी ५ पर्यंत ५४.०९ टक्के मतदान
पुणे – जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांमध्ये सायंकाळी ५ पर्यंत ५४.०९ टक्के मतदान झाले. बारामतीतील महात्मा गांधी बालक मंदिर या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला. उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी ‘खोटे मतदान होत आहे’, ‘मतदारांना घड्याळाचे शिक्के असलेली चिठ्ठी दिली जात आहे’, असा आरोप केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अजित पवार म्हणाले, ‘‘माझा कार्यकर्त्यांवर विश्वास आहे. खोट्या मतदानाची पडताळणी निवडणूक आयोग करील. तक्रारीमध्ये तथ्य नाही.’’
१. कोथरूडमध्ये मतदारसूचीत नरेंद्र मोदी, अमित शहा, राहुल गांधी, संजय राऊत, शरद पवार यांचे नामसाधर्म्य असलेली नावे आढळल्याने गैरसमज झाला. नरेंद्र धीरजलाल मोदी, राहुल अनिल गांधी, शरद रामचंद्र पवार, अमित अशोक शहा, एकनाथ सोमनाथ शिंदे, अजित आत्माराम पवार, संजय एकनाथ राऊत, आदित्य प्रभाकर ठाकरे, रोहित राजेंद्र पवार अशी ती नावे होती.
२. कोथरूडमध्ये एका केंद्रातील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदारांना १ घंटा ताटकळत उभे रहावे लागले.
३. मतदानानंतर काही व्हीव्हीपॅट यंत्रांमधून मतदानाची पावती येत नव्हती.
४. काही ठिकाणी मतदान केंद्रांवर जाण्यासाठी विनामूल्य रिक्शा आणि दुचाकी यांची व्यवस्था करण्यात आली. सामाजिक संस्था, उद्योग संस्था, गृहनिर्माण संस्था यांनी मतदानानंतर सवलती दिल्या. काही उपाहारगृहांमध्ये खाण्यावर १० टक्के सवलत, ५० रुपयांचे पेट्रोल विनामूल्य, अल्पाहार अशा सुविधा देण्यात आल्या.
शिरोलीत भगव्या टोप्या घालणार्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाकडून रोखण्याचा प्रयत्न ! – सकल हिंदु समाजाकडून निषेध
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथील प्रभाग क्रमांक १ आणि २ च्या परिसरात काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून आले होते. त्यांना पाहिल्यावर तेथील एका पोलीस अधिकार्याने सर्वांना हटकले आणि ‘भगव्या टोप्या चालणार नाहीत’, असे सांगितले. याचा तात्काळ सकल हिंदु समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी ‘मतदानासाठी जर भगव्या टोप्या चालणार नसतील, तर गोल टोप्या आणि बुरखाही चालणार नाही. मुसलमानांना जर वेशभूषा करण्यापासून पोलीस रोखू शकत नसतील, तर हिंदूंना कसे रोखू शकतात ?’, असे ठणकावून सांगितले. यानंतर पोलीस प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली. या प्रसंगी सर्वश्री सतीश पाटील, प्रशांत कागले, दिलीप कौंदाडे, कुमार पाटील यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.