सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्‍या कृपेमुळे चालू झालेल्‍या भक्‍तीसत्‍संगांनी ‘मागील आठ वर्षांमध्‍ये साधकांना काय काय दिले’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन !

साप्‍ताहिक भक्‍तीसत्‍संगाच्‍या ‘अष्‍टवर्षपूर्ती’ निमित्ताने 

‘भाववृद्धी सत्‍संग’ या नावाने आरंभ झालेल्‍या सत्‍संगाचा प्रथम दिवस होता, ५.१०.२०१६ ! या वर्षी नवरात्रीमध्‍ये आश्विन शुक्‍ल चतुर्थीला, म्‍हणजे ७.१०.२०२४ या दिवशी सत्‍संगांच्‍या या शृंखलेला ८ वर्षे पूर्ण झाली, म्‍हणजेच या भक्‍तीसत्‍संगांची ‘अष्‍टवर्षपूर्ती’ झाली. गेल्‍या आठ वर्षांपासून प्रतिसप्‍ताह असलेल्‍या या भक्‍तीसत्‍संगांनी साधकांना भरभरून ज्ञान आणि भक्‍ती यांची भेट दिली. ‘या आठ वर्षांमधील सत्‍संग शृंखलेने साधकांना काय काय दिले ?’, याचे कृतज्ञतापूर्वक अवलोकन केले असता अनेक सूत्रे लक्षात आली. ती सूत्रे लेखरूपात श्री गुरूंच्‍या चरणी समर्पित करत आहे.                    (भाग १)

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

१. सत्‍संगांमुळे साधकांना अष्‍टौप्रहर अनुसंधानात रहाण्‍याची शिकवण मिळणे 

सत्‍संगांमुळे अष्‍टौप्रहर अनुसंधानात रहाण्‍याची शिकवण मिळत आहे. भक्‍तीसत्‍संग सप्‍ताहातून एकदाच होत असला, तरी ‘सत्‍संगांविषयी साधकांच्‍या मनातील ओढ आणि सत्‍संगांमुळे होत असलेले लाभ’ यांमुळे असे वाटते की, ‘या भक्‍तीसत्‍संगांनी आपल्‍या जीवनाच्‍या अष्‍टदिशाच व्‍यापल्‍या आहेत.’ एका दिवसाचे आठ प्रहर असतात. भक्‍तीसत्‍संगांनी साधकांना जीवनातील प्रत्‍येक क्षण आणि अष्‍टौप्रहर भगवंतमय विचारांनी कसा व्‍यापून टाकावा ?’, हे शिकवले. ‘व्‍यक्‍तीगत, कौटुंबिक, तसेच व्‍यष्‍टी साधना आणि सेवा या सर्व स्‍तरांवर भक्‍ती वाढण्‍यासाठी कसे प्रयत्न करता येतील ?’, हे या सत्‍संगांच्‍या माध्‍यमातून शिकायला मिळत आहे. विविध भक्‍तांच्‍या कथांमधून जागृती आणि स्‍वप्‍न या स्‍थितींतही सर्वत्र भगवंताचे स्‍मरण करण्‍याची शिकवण मिळत आहे. लहान लहान कृतींना भावाच्‍या प्रयत्नांची जोड दिल्‍यामुळे साधकांचे अवघे जीवन भावमय होऊ लागले आहे.

२. परात्‍पर गुरुदेव भक्‍तीसत्‍संगांतून साधकांना दिशा देऊन ऊर्जा प्रदान करत असल्‍याने साधकांचे अष्‍टसात्त्विक भाव जागृत होऊ लागणे 

भक्‍ताचा भगवंताप्रती असलेला भाव आठ वेगवेगळ्‍या प्रकारांनी व्‍यक्‍त होतो, त्‍यांनाच ‘अष्‍टसात्त्विक भाव’ असे म्‍हणतात. साधनेच्‍या अनेक मार्गांपैकी केवळ भक्‍तीमार्गाने साधना करणार्‍यांचे अष्‍टसात्त्विक भाव चटकन जागृत होऊ शकतात; कारण केवळ या मार्गातच मनातील भावांना महत्त्व असते. अष्‍टसात्त्विक भाव म्‍हणजेच,

१. भगवंताच्‍या स्‍मरणाने अथवा त्‍याच्‍या अनुभूतीने स्‍तंभ (म्‍हणजे स्‍तंभित होणे)

२. स्‍वेद (म्‍हणजे घाम येणे)

३. रोमांच येणे

४. स्‍वरभंग होणे (स्‍वर गदगदणे)

५. कंपित होणे (देहाला कंप किंवा थरथर सुटणे)

६. वैवर्ण्‍य (म्‍हणजे देहाचा वर्ण पालटणे)

७. अश्रू वहाणे

८. आनंदावस्‍थेत मूर्च्‍छा येणे (बेशुद्ध होणे)

साधनेच्‍या अंतर्गत भाववृद्धीचे प्रयत्न करतांना श्री गुरूंचे आणि भगवंताचे रूप आठवून, त्‍यांचे स्‍मरण करून अथवा त्‍यांच्‍याशी संबंधित कोणत्‍यातरी प्रसंगाच्‍या स्‍मरणाने डोळ्‍यांतून पाणी येते. अष्‍टसात्त्विक भावाच्‍या प्रकारांतील ‘अश्रू वाहणे अथवा अश्रूपात’ हा भावजागृतीचा एक प्रकार आहे. बर्‍याचदा भाव जागृत झाल्‍यामुळे मुखातून शब्‍दच फुटत नाहीत, तर कधी कधी भगवंताच्‍या दिव्‍य रूपाची अनुभूती घेऊन देह थरथर कापू लागतो. देहावर रोमांच येतात. कधी ही अनुभूती सांगतांनाही स्‍वर गदगदून जातो. ही सर्व अष्‍टसात्त्विक भावाची लक्षणे आहेत.

साधकांच्‍या बाबतीत गुरुदेवांची ही कृपाच आहे. साधकांची भक्‍ती अथवा भक्‍तीचे प्रयत्न कितीही अल्‍प पडत असले, तरीही भक्‍तीसत्‍संगांच्‍या माध्‍यमातून गुरुदेव साधकांना सतत दिशा देऊन ऊर्जा प्रदान करतात. त्‍यामुळेच साधकांमधील भाव जागृत होण्‍यास साहाय्‍य होते. या सत्‍संगांमुळे अनेकांना अष्‍टसात्त्विक भाव जागृत होत असल्‍याची अनुभूती घेता येत आहे. अशा प्रकारे भक्‍तीसत्‍संगांनी या आठ वर्षांमध्‍ये साधकांतील अष्‍टसात्त्विक भाव जागृत केले आहेत.

३. ‘विविध देवतांची तत्त्वे ग्रहण कशी करायची ?’ याविषयी भक्‍तीसत्‍संगांत दिशा मिळून अष्‍टदेवतांचे कृपाशीर्वाद प्राप्‍त करता येणे 

विविध सण-उत्‍सव, तसेच व्रते यांच्‍या निमित्ताने त्‍या त्‍या देवता भक्‍तांना आशीर्वाद देण्‍यासाठी पृथ्‍वीवर अवतरित होत असतात. वर्षभर सण आणि व्रते यांच्‍या माध्‍यमांतून विविध देवतांचा कृपाशीर्वाद प्राप्‍त करण्‍याची संधी आपल्‍याला मिळत असते; मात्र ‘हे तत्त्व ग्रहण कसे करायचे ?’, याविषयी भावाच्‍या स्‍तरावर आपल्‍याला दिशा मिळते, ती भक्‍तीसत्‍संगांच्‍या माध्‍यमातून ! ब्रह्मांडात कार्यरत असलेली अष्‍टदेवतांची तत्त्वे आणि त्‍यांचे कृपाशीर्वाद साधकांना मिळावेत, यासाठीच गुरुदेवांची ही दिव्‍य लीला चालू आहे.

३ अ. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी भक्‍तीसत्‍संगांतून ‘देवतांचे सूक्ष्मातिसूक्ष्म तत्त्व कसे ग्रहण करायचे ?’, हे अनुभवायला शिकवणे : ब्रह्मांडातील विविध शक्‍तींचे प्रतिनिधित्‍व करणार्‍या देवता म्‍हणजेच अष्‍टदेवता ! अष्‍टदेवतांच्‍या उपासनेने अल्‍प कालावधीत ईश्‍वराशी एकरूप होणे शक्‍य होते. सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गात हाच सिद्धांत सांगितला आहे. ते ते कार्य आणि परिस्‍थिती यांनुरूप ‘अष्‍टदेवतांपैकी एकेका देवतेला कसे आळवता येईल ?’, हे गुरुदेवांनी शिकवले. त्‍यामुळे साधकांना केवळ एकाच उपास्‍यदेवतेची अनुभूती न येता अष्‍टदेवतांची आणि त्‍यांच्‍या विविध गुणवैशिष्‍ट्यांची अनुभूती येते. या आठ देवता आपल्‍या आंतरिक शक्‍तींचेही प्रतिनिधित्‍व करतात. भक्‍तीसत्‍संग ईश्‍वराचे त्‍याच्‍या गुणवैशिष्‍ट्यांसह वर्णन करून ईश्‍वराविषयी भक्‍ती जागृत करतो. भक्‍तीसत्‍संगाच्‍या माध्‍यमातून गुरुदेव ‘देवतांचे सूक्ष्मातिसूक्ष्म तत्त्व कसे ग्रहण करायचे ?’, हे अनुभवायला शिकवत आहेत. त्‍यामुळे साधकांची केवळ उपास्‍य देवतेपुरती श्रद्धा मर्यादित रहात नाही, तर त्‍यांची अष्‍टदेवतांप्रतीही श्रद्धा वाढते आणि त्‍यांना त्‍या त्‍या देवतांच्‍या तत्त्वाचा लाभ होतो. साधकांना साधना आणि समष्‍टी सेवा करण्‍यासाठी अष्‍टदेवतांचे कृपाशीर्वाद मिळतात.

अशा प्रकारे भक्‍तीसत्‍संगांच्‍या माध्‍यमातून या आठ वर्षांमध्‍ये आपल्‍याला साक्षात् अष्‍टदेवतांचे कृपाशीर्वाद लाभत आहेत. त्‍यामुळेच आपल्‍या सर्वांभोवती अष्‍टदेवतांचे कृपाकवच सिद्ध झाले आहे.

– श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ (२६.९.२०२४)              (क्रमशः पुढील गुरुवारी)