छत्रपती संभाजीनगर येथे निवडणूक कामातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे जेवणाअभावी हाल !

छत्रपती संभाजीनगर – विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्‍यासाठी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. अनेक घंटे काम करूनही अधिकारी आणि कर्मचारी यांना जेवण न मिळाल्‍याने त्‍यांचे हाल झाले. येथील पोलीस कर्मचार्‍यांनी घरातून जेवणाचा डबा मागवला. या प्रकारामुळे कर्मचार्‍यांमध्‍ये अप्रसन्‍नता पसरली आहे.

अधिकार्‍यांनी येथील तहसीलदारांना दूरभाष करून जेवणाची व्‍यवस्‍था होत नसल्‍याची तक्रार केली; मात्र तहसीलदारांनी जेवणाची वेळ सकाळी ११ वाजेपर्यंतच होती, असे सांगितले. गेल्‍या १ घंट्यापासून जेवण नसल्‍याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्‍यांना सांगितल्‍यावर तहसीलदार म्‍हणाले, ‘आम्‍ही तुम्‍हाला २ वेळचे जेवण देणार आहे; मात्र तत्‍पूर्वी सगळे साहित्‍य घेऊन आधी मतदार केंद्र ‘इंस्‍टॉल’ करा. त्‍यानंतर जेवण देऊ’, असे संभाषणातून दिसून आले. तसेच ‘आधी काम करा मग जेवण मिळेल.’ असे दूरभाषवरील संभाषणात लक्षात आले आहे. त्‍यावर ‘आम्‍ही उपाशी जावे का ?’, असा प्रश्‍न कर्मचार्‍याने विचारला; मात्र त्‍यावर कुठलाही प्रतिसाद न देता तहसीलदारांनी संपर्क ‘कट’ केला. (तहसीलदार जेवणासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍याशी अशाप्रकारे वागत असतील, तर अन्‍य वेळी त्‍यांचे वर्तणूक कसे असेल ? यावरून त्‍यांच्‍यावर कुणाचा अंकुश नाही, हेच लक्षात येते ! – संपादक)