१. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या खोलीच्या खिडकीबाहेर चतुर (कीटक) येणे, चतुराने बराच वेळ खोलीत येण्याचा प्रयत्न करणे आणि सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांचा हात चतुर बसलेल्या ठिकाणी जाळीच्या आतील बाजूने ठेवल्यावर ‘चतुर ध्यानावस्थेत आहे’, हे लक्षात येणे
‘९.१२.२०२० या दिवशी रात्री ८ वाजता मी आणि एक साधिका माझ्या खोलीत बसून साधनेविषयी बोलत होतो. तेव्हा खोलीच्या खिडकीच्या बाहेरील बाजूने एक चतुर (कीटक) खोलीत येण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे बराच वेळ आत येण्याचे प्रयत्न चालू होते. त्याच्या पंखांचा ‘फडफड’ असा आवाज येत असल्याने ‘त्याला हाकलावे कि काय करावे ?’, असे वाटून मी खिडकीला असलेल्या जाळीजवळ गेलो. चतुर बसलेल्या ठिकाणी जाळीच्या आतील बाजूने मी माझा हात आडवा धरला (जेणेकरून त्याने तेथून निघून जावे). मी त्याच्यासमोर जाळीच्या आतील बाजूने ५ ते १० सेकंद हात आडवा धरल्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘तो चतुर ध्यानावस्थेत असल्याप्रमाणे शांत बसला आहे.’ त्यानंतर मी साधिकेशी बराच वेळ बोलत होतो. अर्धा ते पाऊण घंट्यानंतर माझ्या लक्षात आले, ‘चतुर तसाच ध्यानावस्थेत बसला आहे. त्याच्या पंखांची फडफड थांबली आहे.’ त्यानंतर ‘तो कधी उडून गेला ?’, हे मला समजले नाही.
२. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या पाठीवर फुलपाखरू बसणे आणि ते खोलीत गेल्यानंतरही त्यांच्या पाठीवर फुलपाखरू बसलेले असणे अन् नंतर खोलीत आलेल्या फुलपाखराच्या अवस्था आणि त्याविषयी घडलेला घटनाक्रम
अ. ‘११.१२.२०२० या दिवशी सकाळी ७.४५ वाजता मी अल्पाहार करत असतांना एका साधकाने मला सांगितले, ‘‘तुमच्या पाठीवर फुलपाखरू बसले आहे.’’ मी अल्पाहार घेत असतांना, भांडी धूत असतांना, जिना चढतांना आणि खोलीत येईपर्यंत ते फुलपाखरू माझ्या पाठीवर बसलेले होते.
आ. शारीरिक त्रास होत असल्याने मला अधिक वेळ बसता येत नसल्याने मला झोपायचे होते. तेव्हा फुलपाखरू माझ्या पाठीवर बसलेे असल्याने माझ्या मनात ‘आता झोपायचे कसे ?’, असा प्रश्न आला. तेव्हा लगेच ते फुलपाखरू उडून खोलीतील खिडकीच्या पडद्यावर जाऊन बसले. त्यामुळे मला सहजतेने झोपता आले. फुलपाखरू दिवसभर त्या पडद्यावरच बसलेले होते. मी दिवसभर त्या पडद्याजवळ असलेल्या पलंगाचा उपयोग करत होतो, तरीही ते फुलपाखरू तेथून उडाले नाही.
इ. मी रात्री झोपण्याच्या सिद्धतेला आरंभ करण्यापूर्वी ते फुलपाखरू भिंतीवर पलंगापासून ६ इंच अंतरावर बसले होते.
ई. मी रात्री झोपण्याची सिद्धता करत असतांना (पलंगावरची चादर झटकणे, उशी ठेवणे इत्यादी करत असतांना) फुलपाखरू न उडता तेथेच बसले होते. मी झोपण्यासाठी गेल्यावर ते पलंगाजवळ असलेल्या आसंदीवर जाऊन बसले.
उ. रात्रीपासून दुसर्या दिवशी सकाळपर्यंत ते आसंदीच्या मागच्या बाजूला तसेच बसून होते.
ऊ. मी पहाटे ५ वाजता उठल्यावर खोलीतील दिवा लावला. तेव्हा फुलपाखरू पलंगावर आले. मी पलंगावर बसून योगासने करत असतांनाही ते उडून गेले नाही. त्यानंतर पावणेसहा वाजता मला मर्दन (मालीश) करण्यासाठी साधक आले. तेव्हा फुलपाखरू उडून पडद्याच्या मागे गेले.
ए. सकाळी पावणेआठ वाजता मी अल्पाहार घेण्यासाठी जातांना माझ्या मनात आले, ‘फूलपाखराने काल दिवसभर काही खाल्ले नाही. आता कसे करायचे ? ते बाहेर गेले, तर बरे होईल.’ नंतर मी खिडकीची जाळी बाजूला करून त्याला बाहेर जाण्यासाठी जागा केली. मी ज्या क्षणी खिडकीची जाळी उघडली, त्या क्षणी फुलपाखरू उडून बाहेर गेले. तेव्हा ‘माझ्या मनातील विचार फुलपाखरू जाणत आहे’, असे मला जाणवले.
ऐ. मी जेव्हा जेव्हा ते फुलपाखरू पहात होतो, तेव्हा तेव्हा मला त्याला नमस्कार करण्याची इच्छा होत होती आणि तशी कृतीही माझ्याकडून ४ – ५ वेळा झाली.
३. सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या खोलीत एक पीस येणे आणि त्याच्याकडे पाहून त्यांना चांगले वाटणे
१३.१२.२०२० या दिवशी पहाटे खोलीची खिडकी बंद करत असतांना खिडकीच्या आतील बाजूला मला पांढर्या रंगाचे पीस दिसले. तेव्हा मी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. नंतर सकाळी८ वाजता मी खिडकी उघडत असतांना ते पीस खोलीच्या आत लादीवर येऊन पडले. ते पीस अतिशय पांढरेेे शुभ्र होते. त्याच्याकडे पाहून मला पुष्कळ चांगले वाटत होते.’
– (सद़्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या पाठीवर बसलेल्या फुलपाखराच्या संदर्भात साधिकेला जाणवलेली सूत्रे !
‘एकदा अल्पाहार करण्याच्या वेळी भोजनगृहात अनेक साधक असूनही फुलपाखरू सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या पाठीवर बसले. ‘प्राणी किंवा पक्षी यांना अधिक सात्त्विक व्यक्ती ओळखता येते’, हेच यातून लक्षात येते. प्राणी किंवा पक्षी यांना सात्त्विक व्यक्तींच्या सान्निध्यात भीती वाटत नाही आणि ते सात्त्विक व्यक्तींकडे आकृष्ट होतात. ‘प्राचीन काळी ऋषिमुनींच्या आश्रमात व्याघ्रादी प्राणीही सहजतेने वावरत असत’, अशा कथा आपण ऐकतो. त्यामागील शास्त्रही हेच आहे. ऋषिमुनींतील सात्त्विकतेमुळे पशू-पक्षी यांच्यातील क्रूरता लोप पावत असे.’
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.