पुणे शहरात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्‍यासाठी १० सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त !

पुणे – शहरात विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्‍यासह कायदा आणि सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍यासाठी पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार अन् पोलीस सह आयुक्‍त रंजनकुमार शर्मा यांच्‍या मार्गदर्शनाखाली १० सहस्र पोलिसांचा बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला आहे. मतदान केंद्रांच्‍या परिसरात प्रतिबंधात्‍मक आदेश लागू रहातील. या आदेशाचे उल्लंघन केल्‍यास कारवाई करण्‍याचे आदेश पोलीस आयुक्‍त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. बंदोबस्‍तात शहर पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी केंद्रीय सशस्‍त्र पोलीस दल (सी.आर्.पी.एफ्.), राज्‍य राखीव पोलीस दल (एस्.आर्.पी.एफ्.), शीघ्र कृती दल (क्‍यू.आर्.टी.) आणि होमगार्ड यांचा समावेश आहे, तसेच आपत्‍कालीन बंदोबस्‍तासाठी स्‍वतंत्र पथके असतील. विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्‍हेंबरला मतदान होत असून २३ नोव्‍हेंबर या दिवशी मतमोजणी होणार आहे.

पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्‍या कार्यक्षेत्रात वडगावशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, पुणे कॅन्‍टोन्‍मेंट, कसबा, हडपसर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, तसेच शिरूर, पुरंदर, भोर या मतदारसंघातील काही भाग येतो.