नारायणगाव (जिल्हा पुणे) – येथील मनोहरबाग (पठार) येथे रहाणारे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे शिष्य (कै.) शशिकांत मनोहर ठुसे यांचा प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रम १८ नोव्हेंबर २०२४ या दिवशी भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. सकाळी ८ ते ९.३० या वेळेत श्राद्ध विधी कै. शशिकांत ठुसे यांचे पुत्र श्री. आदित्य ठुसे यांनी केले. या विधीचे पौरोहित्य श्री. पुरुषोत्तम मधुकर कुलकर्णी (कांदळी) यांनी केले.
सकाळी ९.१५ ते ९.३० पर्यंत उपस्थितांनी श्रीविष्णु सहस्रनाम म्हटले. सकाळी १०.३० पर्यंत कै. शशिकांत ठुसे यांना आवडणारा ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा जप सर्वांनी केला. सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत सौ. रोहिणीताई परांजपे (पुणे) यांचे (जगद्गुरु संत तुकारामांच्या अभंगावर) नारदीय कीर्तन झाले. उपस्थितांपैकी काही जणांनी कै. ठुसे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प.पू. भक्तराज महाराजांचे भक्त, प.पू. काणे महाराजांचे भक्त आणि प.पू. भक्तराज महाराजांचे पुत्र श्री. सुनिल कसरेकर आणि श्री. रवींद्र कसरेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला प.पू. भक्तराज महाराजांचे ज्येष्ठ पुत्र पू. नंदूदादा कसरेकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली. दुपारी १.४५ ते ३ महाप्रसाद ठेवण्यात आला. दुपारी ३ ते ४.३० सद्गुरु सेवा मंडळ, कांदळी यांनी प.पू. भक्तराज महाराजांची प्रासादिक भजने सादर केली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी ठुसे परिवाराकडून कडबा कुट्टी (कापणीचे यंत्र) आणि पिठाची गिरणी कांदळी आश्रमाला भेट देण्यात आली.