‘दीदी’ नको, ‘ताई’ म्हणा ! 

मराठी भाषेला नुकताच अभिजात (समृद्ध) भाषेचा दर्जा मिळाला असला, तरी मराठी बोलतांना त्यात केली जाणारी अन्य भाषांची सरमिसळ ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. मग त्यात हिंदी आणि इंग्रजी शब्द वापरणे ओघाने येतेच ! इंग्रजी ही आपली भाषा नाही. त्यामुळे मराठीमध्ये तिला घुसडवणे, म्हणजे मराठीचा अवमानच करणे होय. तसे करणे खरेतर मराठी भाषिकांनी टाळायला हवे. मराठी जेव्हा हिंदीमिश्रीत होऊ लागते, तेव्हाही तिच्या अभिजाततेला धक्का पोचल्यासारखे होते. अगदी साधेसे उदाहरण घ्यायचे झाले, तर आपल्या मोठ्या बहिणीला आपण ‘ताई’ म्हणतो. अगदी काही दशकांआधी ताई, माई किंवा आक्का असे शब्द प्रचलित होते. माई आणि आक्का तर काळाच्या ओघात नष्ट झाले; पण आता ‘ताई’ची जागा ‘दीदी’ या शब्दाने घेतली आहे. याच्याच जोडीला मोठ्या भावालाही ‘भैय्या’ वा ‘भाई’ असे संबोधले जाते. यामुळे ‘ताई’ आणि ‘दादा’ हे शब्दच जणू हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत कि काय’, असे वाटते. जवळजवळ ९० ते ९५ टक्के मराठी पालकवर्ग आपापल्या मुलांना असेच शिकवत असल्याचे सध्या दिसून येते. ‘दीदी’ किंवा ‘भाई’ हे शब्द हिंदी आहेत. अर्थात् हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे तिचा वापर करण्याला नकार नाही; पण मराठी भाषिकांनीच मराठी शब्द जपले, जोपासले आणि वृद्धींगत केले नाहीत, तर कसे चालेल ? मराठीला सुगीचे दिवस कसे येणार ? मराठीचा अभिमान कसा टिकून रहाणार ? प्रत्येक भाषेत सौंदर्य असते आणि ते त्या त्या शब्दात उतरलेले असते. त्या सौंदर्याचा पुनरुच्चार आपण नाही, तर कुणी करायचा ? मराठी भाषा ही सौंदर्याची खाण आहे. तिचे सौंदर्य आपणच ओळखून जपले पाहिजे.

मराठी भाषिकांना सांगावेसे वाटते की, मराठी बोली आणि मराठी बाणा जपा ! ‘ताई’ या शब्दातील गोडवा ‘दीदी’ या शब्दात कसा येणार ? मोठी बहीण म्हणून ताई किंवा दादा आपल्यावर हक्क गाजवतो, तसेच तितके प्रेमही करतात. म्हणूनच तर मराठीत ‘ताईगिरी’ आणि ‘दादागिरी’ असे उपरोधिक; पण प्रेम व्यक्त करणारे शब्द आहेत. ‘दीदीगिरी’ किंवा ‘भैय्यागिरी’ असे शब्द कुठेच उच्चारले जात नाहीत.

एखाद्या संबोधनासाठी शब्दच अस्तित्वात नसता, तर ठीक होते; पण येथे तर शब्दांची वैविध्यता असतांना दुसर्‍या भाषेच्या कुबड्यांचा वापर का करावा ? न कळत्या वयाचाच प्रारंभ जर हिंदीतून होऊ लागला, तर मुलांच्या वाणीला तसेच वळण लागणार. ‘अमृतातेही पैजा जिंके’, असे म्हणून सर्वजण मराठीचेच गोडवे गातात; म्हणूनच अमृतापेक्षाही श्रेष्ठ ठरणारी मराठी भाषा खर्‍या अर्थाने श्रीमंत आहे. तिची श्रीमंती, सौंदर्य आणि मराठीपण जपणे, हे केवळ मराठी माणसाच्याच हातात आहे.

– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.