विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव होईल ! – विनोद तावडे, राष्ट्रीय सरचिटणीस, भाजप

सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडल्याची टीका

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे

कणकवली – विधानसभा निवडणुकीत मुंबई, ठाणे यांसह संपूर्ण कोकणात ६० हून अधिक जागा महायुतीला मिळणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळणार असून महाविकास आघाडीचा दारूण पराभव होईल. मुख्यमंत्रीपदासाठी किंबहुना सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले. त्याची किंमत त्यांना या निवडणुकीत मोजावी लागेल, असे विधान भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी येथे केले.

जिल्हा दौर्‍यावर आलेले तावडे यांचे कणकवली मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांनी स्वागत केले. त्यानंतर येथील ‘प्रहार भवना’त भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा मेळावा झाला. या वेळी आमदार नितेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार प्रमोद जठार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या मेळाव्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना तावडे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बनावट कथा (फेक नॅरेटिव्ह) प्रसारित केल्या; पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा हा डाव मतदारांनी ओळखला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महायुतीचे दीपक केसरकर, नीलेश राणे आणि नितेश राणे हे तिन्ही उमेदवार विजयी होणार आहेत. वर्ष २०१९ मध्ये आम्ही शिवसेना-भाजप युती करून एकत्रित लढलो. बहुमतही गाठले; परंतु उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला नसता, तर चित्र वेगळे दिसले असते. काँग्रेस पक्षाकडून ‘भाजप सरकार घटना पालटणार’, असे वारंवार सांगितले जात आहे. वस्तूत: यापूर्वी आमचे २ वेळा बहुमतातील सरकार होते. तेव्हाही घटनेत पालट करू शकलो असतो; परंतु आम्हाला तसे करायचे नव्हते.’’