‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथातील त्यांचे छायाचित्र पहात नामजप करत असतांना सांगली येथील श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथातील त्यांच्या छायाचित्राकडे पाहून ‘निर्विचार’ हा नामजप करणे आणि ‘निर्गुणाकडे जात आहे’, असे जाणवणे

श्री. दत्तात्रय कुलकर्णी

‘७.९.२०२४ या श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी मी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथांच्या मालिकेतील ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे गुणदर्शन’ या ग्रंथातील पृष्ठ क्र. ५१ वर असलेले ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे दैवी वैशिष्ट्यांनी युक्त असलेले छायाचित्र’ पहात ‘निर्विचार’ हा नामजप करत होतो. मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रातील डोळ्यांकडे पाहून नामजप करत असतांना माझे ध्यान लागले. त्या वेळी ‘मी निर्गुणाकडे जात आहे’, असे मला जाणवले.

२. सूक्ष्मातून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेले संभाषण

मी नामजप करत सूक्ष्मातून भूवैकुंठ असलेल्या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात पोचलो. मी गुरुदेवांच्या खोलीत त्यांच्या चरणांजवळ बसलो. त्या वेळी आमच्यामध्ये झालेले संभाषण येथे दिले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आज श्री गणेशचतुर्थी आहे. तुम्ही इकडे कसे काय ?

मी : मी सध्या मोठ्या मुलीकडे (सौ. कविता बेलसरे हिच्याकडे) कुडाळ येथे आहे. मी घरातील मूर्तीचीच पूजा केली. मला आनंद मिळाला.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुमची पूजा गणपतीपर्यंत पोचली. तुमचा आताही नामजप चालू आहे. चांगले आहे. आता तुम्हाला सूक्ष्मातील समजायला लागेल.

मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला.

३. सद्गुरु सत्यवान कदम यांना भेटून सूक्ष्म ज्ञानाविषयी मार्गदर्शन घेण्याचे विचार येणे आणि अनुभूतीद्वारे त्याचीच प्रचीती येणे

‘माझा नामजप कधी संपला’, ते माझ्या लक्षातच आले नाही. मी कुडाळ येथे आल्यापासून मला सद्गुरु सत्यवान कदम यांना भेटण्याची संधी मिळाल्यास माझ्या मनात त्यांच्याकडून सूक्ष्म ज्ञानाविषयी मार्गदर्शन घेण्याचा विचार होता. माझा विचार देवापर्यंत पोचल्याची प्रचीतीच या अनुभूतीतून मला आली.

४. नामजप करतांना आनंद मिळत असल्याने बसून अधिक घंटे नामजप होणे

मी नामजप करत असतांना घरातील व्यक्तींनी मला ‘‘दूरचित्रवाणीवर लागलेला श्री गणेशाशी संबंधित कार्यक्रम बघायला या’’, असे २ वेळा सांगितले; पण मी नामजप करण्यात तल्लीन झालो होतो. त्यातच मला आनंद मिळत होता. सध्या मला बसून नामजप करण्यात आनंद मिळत आहे आणि माझा दिवसभरात बसून ३ – ४ घंटे नामजप होत आहे.

५. मी मुलीकडे रहायला आल्यापासून मला ‘परेच्छेने वागणे आणि परिस्थिती स्वीकारणे’ हे बर्‍यापैकी जमायला लागले आहे, तसेच मला काही प्रसंगांत तत्त्वनिष्ठ राहून ईश्वरेच्छेने वागता येत आहे.

‘गुरुदेवांच्या कृपेने मला निर्गुणाकडे जाणे अनुभवता येत आहे’, त्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘मला गुरुदेवांनी आशीर्वाद दिला आहे, तो तेच पूर्ण करून घेणार आहेत’, या भावाने माझे मन कृतज्ञतेने भरून आले आहे.’

– आपला चरणदास,

श्री. दत्तात्रय बाळकृष्ण कुलकर्णी (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ८० वर्षे), गावभाग, सांगली. (७.९.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक