National Sample Survey : देशातील १५ वर्षांवरील २८ टक्के लोकांना साधी बेरीज-वजाबाकी कशी करायची ?, हेही ठाऊक नाही !

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण’च्या वर्ष २०२२-२३ चा अहवाल

नवी देहली – ‘राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण’च्या २०२२-२३ च्या व्यापक वार्षिक सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील अनुमाने ३ लाख कुटुंबे आणि अनुमाने १३ लाख लोकांचा समावेश होता. या सर्वेक्षणात चिंताजनक स्थिती समोर आली आहे. देशातील १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या २८ टक्के लोकांना साधी वाक्ये कशी वाचायची आणि लिहायची ?, तसेच साधी बेरीज-वजाबाकी कशी करायची ?, हेही ठाऊक नाही, असे समोर आले आहे.

१. राजस्थानमधील २७ टक्के लोक आणि मध्यप्रदेशातील २२ टक्के लोक साधी बेरीज-वजाबाकी करू शकत नाहीत.

२. बिहारमधील २४ टक्के लोक आणि उत्तरप्रदेशातील २५ टक्के लोक गणितात कमकुवत आहेत. केरळमध्ये असे लोक केवळ २ टक्के आहेत.

३. या सर्वेक्षणातून  वाहतूक व्यवस्थेविषयी मिळालेल्या माहितीमध्ये शहरांमधील वाहतूक व्यवस्थेत ९३.७ टक्के लोकांना त्यांच्या घरापासून ५०० मीटरच्या त्रिज्येत बस, टॅक्सी, चारचाकी, रिक्शा यांसारख्या कमी क्षमतेची सार्वजनिक वाहतूक उपलब्ध आहे. उच्च-क्षमतेच्या सार्वजनिक वाहतुकीच्या संदर्भात म्हणजे रेल्वे, मेट्रो इत्यादी शहरी लोकसंख्येच्या केवळ ४२ टक्के लोकांकडे एक कि.मी.च्या त्रिज्येत ही सुविधा आहे. ज्या राज्यांमध्ये रेल्वे, मेट्रो सुविधा जवळपास उपलब्ध नाहीत, तेथे खासगी वाहने बाळगणार्‍यांची संख्याही अधिक आहे.

४. देशातील ९५ टक्के लोकांकडे दूरभाष किंवा भ्रमणभाष आहे. ही संख्या शहरांमध्ये ९७ टक्के आणि खेड्यांमध्ये ९४ टक्के आहे. त्याच वेळी देशातील १० टक्के घरांमध्ये संगणक आहेत. शहरांमधील २२ टक्के घरांमध्ये आणि खेड्यांमध्ये ४ टक्के घरांमध्ये ही सुविधा आहे. देशातील १५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या केवळ ६० टक्के लोकांना इंटरनेट कसे वापरायचे ? हे माहीत आहे.

५. देशातील ३८ टक्के लोकांना ऑनलाईन बँकिंगद्वारे व्यवहार कसे करायचे ?, हे ठाऊक  आहे. यात चंडीगडमध्ये ६४ टक्के, तर छत्तीसगड १९ टक्के असे प्रमाण आहे.

संपादकीय भूमिका

हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !