पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा होणार !

आचारसंहितेमुळे निर्णय

श्री विठ्ठल

पंढरपूर – कार्तिक शुक्ल प्रबोधनी एकादशी दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने १२ नोव्हेंबर या दिवशी पहाटे २.२० वाजता श्री विठ्ठल, श्री रुक्मिणीमाता यांची शासकीय महापूजा यंदा आचारसंहितेमुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि मानाचे वारकरी यांच्या शुभहस्ते सपत्नीक करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. याखेरीज शासकीय महापूजेपूर्वी मंदिर समितीकडून होणारी श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणीमातेची पाद्यपूजा, नित्यपूजा अनुक्रमे राजेंद्र शेळके अन् मंदिराचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते होणार आहे.

एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर येथे वारकर्‍यांचा मेळा !

कार्तिक एकादशीला श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी सहस्रो वारकरी राज्याच्या कानाकोपर्‍यातून पंढरपूर येथे आले असून पंढरपूर येथे वारकर्‍यांचा मेळा भरला आहे. सर्वत्र ‘बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल’चा जयघोष ऐकू येत आहे. सध्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी ८ ते १० घंट्यांचा कालावधी लागत आहे. रेल्वेस्थानक, शहरातील मठ, धर्मशाळा, मंदिर परिसर, ६५ एकर परिसर वारकर्‍यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. यंदा राज्यात विधानसभेची निवडणूक होत असल्याने तुलनेत वारकर्‍यांची संख्या अल्प दिसून येत आहे. असे असले तरी वारकर्‍यांचा उत्साह कुठेही अल्प झालेला दिसून येत नाही.