भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांची तक्रार !
मुंबई – मुलुंड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी त्यांच्या जिवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम यांच्या पत्राद्वारे तक्रार केली आहे. कोटेचा यांची खासगी बैठक चालू असतांना
३ अज्ञातांनी त्यात घुसण्याचा प्रयत्न केला होता. कोटेचा हे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे ईशान्य मुंबईचे उमेदवार असतांना प्रचाराच्या वेळी त्यांच्या कार्यालयावर आक्रमण करण्यात आले होते. याविषयीही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे.
मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य !
मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर या दिवशी मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे म्हणून ग्राह्य धरले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यात आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र, निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड आस्थापनांनी कर्मचार्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधान परिषद सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, दिव्यांग व्यक्तींचे विशेष ओळखपत्र यांचा समावेश आहे.
लाडक्या बहिणींसाठी १०० वेळा कारागृहात जाईन ! – मुख्यमंत्री
परभणी – मी ज्या लाडक्या बहिणींसाठी आणि शेतकर्यांसाठी योजना चालू केल्या आहेत, त्यांसाठी मला १०० वेळा कारागृहात जावे लागले, तरी मी जाईन; पण या योजना चालूच ठेवणार. विरोधकांच्या पोकळ धमक्यांना मी घाबरणारा नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे झालेल्या भाषणात केले आहे.
तरुण मतदारांसाठी ‘रॅप’ गाण्यांचा वापर !
मुंबई – तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘रॅप’ (विशिष्ट प्रकारचे संगीत असलेले) गाण्यांची निर्मिती उमेदवारांकडून केली जात आहे. एका रॅप गाण्यासाठी दीड ते अडीच लाख रुपयांपर्यंत खर्च करण्यात येत आहे. प्रचाराशी संबंधित सर्व कलाकृतींची निर्मिती करण्याचे दायित्व काही उमेदवारांचे समाजमाध्यम समन्वयक, तसेच आयटी सेल यांनी घेतली आहे.
पालघर आणि मुंबई येथून कोट्यवधी रुपये जप्त !
पालघर – पोलिसांनी पालघरमधील एका वाहनातून ३ कोटी ७० लाख रुपये रक्कम जप्त करून आरोपीला अटक केली आहे. हे वाहन विक्रमगडच्या दिशेने जात होते. पोलिसांना मुंबईतही २ कोटींहून अधिक रोख रकमेसह १२ जणांना कह्यात घेतले आहे.